तांत्रिक अडचणीमुळे रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:30 PM2018-09-18T12:30:43+5:302018-09-18T12:34:19+5:30

सामान्य माणसांच्या गरजांशी जुळलेल्या शासनाच्या विविध विभागांचे डिजीटलाईजेशन करताना या प्रक्रियेत वेळोवेळी होणाऱ्या बदलांमुळे सामान्यांना फटका सहन करावा लागतो.

Due to technical difficulties ration card holders are deprived of grains | तांत्रिक अडचणीमुळे रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित

तांत्रिक अडचणीमुळे रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित

googlenewsNext
ठळक मुद्देओटीपी ठरली डोकेदुखीकर्मचाऱ्यांचाही वाढला मनस्ताप

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामान्य माणसांच्या गरजांशी जुळलेल्या शासनाच्या विविध विभागांचे डिजीटलाईजेशन करताना या प्रक्रियेत वेळोवेळी होणाऱ्या बदलांमुळे सामान्यांना फटका सहन करावा लागतो. अन्न, नागरी पुरवठा विभागाला सध्या अशाच समस्यांचा सामना करावा लागतो आहे. रेशन कार्डधारकांचा डेटा डिजीटल करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी निस्तरण्याचे प्रयत्न सुरू असताना नव्याने आलेल्या ‘वन टाईम पासवर्ड’ (ओटीपी) बेस्ड प्रणालीमुळे गरजू लाभार्थ्यांसह विभागाचीही डोकेदुखी वाढली असून शेकडो कुटुंबांना रेशनच्या धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डिजीटल डेटा केंद्र शासनाने नेमलेल्या एजेन्सीमार्फत पून्हा अद्ययावत करण्याची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेदरम्यान शहरातील अनेक कार्डधारकांची नावे गहाळ झाली होती. अशा शेकडो तक्रारी विभागाच्या विविध झानेमध्ये प्राप्त झाल्या आहेत. तक्रारी व अर्ज करूनही त्यांच्या अडचणी दूर झाल्या नाही व परिणामी सरकारच्या प्राधान्यगटात असूनही अनेक गरीब कुटुंबांना गेल्या सहा-आठ महिन्यांपासून रेशन दुकानात धान्य मिळणे बंद झाले आहे. हा घोळ सुरू असतानाच केंद्र शासनाने पुरवठा विभागासाठी ओटीपी बेस्ड प्रणाली लागू केली आहे.
या प्रणालीत विविध क्षेत्रातील पुरवठा निरीक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांना संगणक ‘लॉग ईन’ करण्यात अडचणी येत असल्याने त्यांचे काम खोळंबत आहे. शहरातील सर्व झोनमध्ये ही समस्या असल्याची माहिती समोर येत आहे. या ओटीपीच्या समस्येमुळे विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मन:स्ताप वाढला असून रेशनकार्डधारकांना समस्या सहन करावी लागते आहे. शहरात आकडेवारीनुसार शासनाच्या प्राधान्य गटात जवळपास ३ लाख रेशनकार्डधारक आहेत. बीपीएलची योजना बंद झाल्याने जुन्या बीपीएल कार्डधारकांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अंत्योदय लाभार्थ्यांची संख्या ३९२०७ एवढी आहे.
ओटीपीच्या डोकेदुखीमुळे शहरातील विविध झोनमध्ये रेशनकार्ड संबंधित कामांचे शेकडो अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे प्राधान्य गटातील शेकडो कुटुंबांना धान्यापासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

काय आहे ओटीपीची अडचण?
नव्याने कार्ड काढणे, बंद झालेले रेशनकार्ड पुन्हा सुरू करणे, कार्डातील नाव कमी करणे किंवा चढविणे, आर.सी. क्रमांक निर्माण करणे किंवा रेशनकार्ड संबंधीच्या इतर गोष्टी विभागात अद्ययावत करण्यासाठी नेमलेले पुरवठा निरीक्षक किंवा अधिकाऱ्यांसाठी वन टाईम पासवर्ड प्रणाली लागू करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी दरवेळी मिळालेला ओटीपी क्रमांक घालूनच लॉग इन करू शकेल. बहुतेक कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक आधारशी जुळले नसल्याने लॉग इन करण्यास अडचणी येत आहेत. अनेकांना ओटीपी जनरेट होण्यास अडचणी येत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

दक्षता समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पूर्व नागपूर (महाल झोन) परिमंडळाच्या रेशन दक्षता समितीच्या सीमा ढोमणे यांनी सांगितले, समितीकडे दररोज अनेक नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. काहींना कार्डवरील नाव कमी करणे किंवा चढविण्यात अडचणी आहेत तर काहींना आर.सी. क्रमांक मिळत नाहीत. रेशन दुकानाच्या बदलीचे कामही सहा सहा महिने होत नाही. विभागाच्या समस्यांमुळे अनेक कुटुंब धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे समितीतर्फे ही समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.

डेटा अद्ययावत करताना लाभार्थ्यांची नावे कमी जास्त होण्याची शक्यता आहे. मात्र अशा लाभार्थ्यांचे प्रमाण एक टक्का असेल. आम्ही रेशन दुकानदरांकडून अशा नाव सुटलेल्या कार्डधारकांची माहिती मागविली आहे. ती विभागाकडे दिली जाईल. लॉग ईनच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आहेत. त्या लवकरच सोडविण्यात येतील. मात्र धान्यापासून कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही.
- सुमेर चवरे, परिमंडळ अधिकारी, पूर्व विभाग

नवीन ओटीपी बेस्ड प्रणालीमुळे तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र प्रलंबित अर्जाचे प्रमाण अत्यल्प आहे. तांत्रिक अडचणींचा निपटारा करून लवकरच ही समस्या सोडविण्यात येईल.
- प्रशांत काळे, अन्न वितरण अधिकारी, नागपूर.

Web Title: Due to technical difficulties ration card holders are deprived of grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार