बंजारा तांडा शिक्षित व्हावा, सक्षम व्हावा हेच स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 08:49 PM2018-08-28T20:49:12+5:302018-08-28T21:00:45+5:30

तांडा म्हणजे बंजारा समाज, साहित्य आणि संस्कृतीचा आरसा. डोंगर दऱ्याखोऱ्यात, नदीकाठी, दुर्गम भागात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तांडा वसाहतीतील वैभवशाली वारसा लाभलेल्या बंजारा समाजाने स्वत:ची संस्कृती व बोलीभाषा जोपासली आहे. मात्र हा समाज आजही दुष्टचक्रात अडकलेला आहे.

Dream interpretation of Banja Tana is to be educated, to be able | बंजारा तांडा शिक्षित व्हावा, सक्षम व्हावा हेच स्वप्न

बंजारा तांडा शिक्षित व्हावा, सक्षम व्हावा हेच स्वप्न

googlenewsNext
ठळक मुद्देतांडे सामू चालो : पुरोगामी जागराची लोकचळवळलोकमत व्यासपीठ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तांडा म्हणजे बंजारा समाज, साहित्य आणि संस्कृतीचा आरसा. डोंगर दऱ्याखोऱ्यात, नदीकाठी, दुर्गम भागात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तांडा वसाहतीतील वैभवशाली वारसा लाभलेल्या बंजारा समाजाने स्वत:ची संस्कृती व बोलीभाषा जोपासली आहे. मात्र हा समाज आजही दुष्टचक्रात अडकलेला आहे. आधी हजारो वर्षे धर्माने लादलेली अवहेलना पाठीशी आहे. त्यानंतर आलेली इंग्रजी राजवट संपली आणि संविधान लागू झाले तेव्हा वाटलं हा समाज विकासाच्या प्रवाहात येईल. ३१ आॅगस्ट १९५२ ला पं. नेहरू यांनी बंजारा समाजाला इंग्रजांनी लादलेल्या जाचक अटीतून मुक्त केले. मात्रस्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मानवी अधिकारच नाकारलेला हा समाज प्रवाहापासूनही दूर राहिला. या तांड्यापर्यंत शिक्षणाचा, सक्षमतेचा व विकासाचा मार्ग पोहचविण्यात शासन यंत्रणा अपयशी ठरली. महाराष्ट्रात १२३ तांडाबहुल तालुक्यात १७९७० तांडा वसाहती असून दीड कोटीच्यावर लोकसंख्या आहे. मात्र जेथे ७० टक्केलोकांकडे रेशन कार्ड, मतदान कार्ड नाही, तेथे विकासाच्या योजना पोहचणार कशा? अशावेळी तांड्यातील माणसांमध्ये मूलभूत अधिकारांची, शिक्षणाची जागृती निर्माण करून त्यांनाच प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ‘तांडे सामू चालो’ अर्थात तांड्याकडे चला ही लोकचळवळ तरुणांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात सुरू केली आहे. अनेक गोष्टी या संस्थेने चालविल्या असून त्याचा ऊहापोह लोकमत व्यासपीठाच्या माध्यमातून करण्यात आला.
यावेळी तांडे सोमू चालोचे संयोजक एकनाथ पवार, नायक आत्माराम चव्हाण, कारभारी शालिग्राम राठोड, समन्वयक राजेश जाधव, संघटक डॉ. सुभाष जाधव यांच्यासह बंडूभाऊ राठोड, विजेश जाधव, रमेश चव्हाण, अंकुश पवार, अशोक राठोड, संदीप जाधव यांनी प्रातिनिधिक स्वरूपात बंजारा समाजाच्या एकूणच अवस्थेविषयी चर्चा केली.

 तांडे सामू चालो म्हणजे काय?
महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ ही संकल्पना मांडून ग्रामीण विकासाला महत्त्व दिले होते. मात्र गावगाड्यापासून दूर असलेला तांड्यावरचा बंजारा समाज या संकल्पनेत स्पर्शला गेला नाही. त्यामुळे तांड्यातील मूकवेदना व उपेक्षित जीवन जवळून अनुभवलेल्या एकनाथ पवार या सर्जनशील तरुणाने या नवीन संकल्पनेची पायाभरणी लोकमत कार्यालयातूनच केली. खेड्याकडे चला या संकल्पनेपासून ही पूर्णपणे भिन्न आहे. कारण गावाचे व तांड्याचे प्रश्न, संस्कृती वेगळे आहेत. तांड्याचा सन्मान, स्वावलंबन व सक्षमीकरणावर भर आहे. या अभियानाद्वारे तीन वर्षात ३०० तांड्यामध्ये भेटी देऊन लोकांना जागृत करण्याचे काम संस्थेने केले आहे. प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवून शिक्षणाची, विचारांची ज्योत पेटविली जात आहे. तांडे सक्षम करून त्यांना शहराच्या मार्गाने विकासाच्या प्रवाहात आणले जात आहे. यासाठी शेकडो तांडादूत या अभियानात झटत आहेत. तांड्याच्या समस्या, दु:ख, वेदना सरकार दरबारी मांडल्या जात आहेत. या अभियानाच्या प्रयत्नाने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा लोकांच्या मानसिकतेत बदल करून त्यांना आधुनिक प्रवाहात आणणे हा या चळवळीचा उद्देश असल्याची भावना एकनाथ पवार यांनी व्यक्त केली.

तांड्यातील प्रमुख समस्या
आत्माराम चव्हाण यांनी सांगितले की, राज्यभरातील तांडे केवळ समस्यांनीच भरले आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव, शाळाबाह्य विद्यार्थी, महिला सक्षमीकरणाचा अभाव, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण, बेरोजगारी आणि महत्त्वाचे म्हणजे या समाजाला सन्मानाचे जगणे मिळाले नाही. आजही तांडा वस्तीतील ७० टक्के लोकांकडे मूलभूत गोष्टींचे दस्ताऐवज नाही. शिक्षणाची संधी मिळाली नाही आणि शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेपासून बहुतेक तांडे वंचित आहेत.

 काय उपाययोजना करता येईल
शालिग्राम राठोड यांनी सांगितले, बंजारा समाजाच्या विकासासाठी व्यापक पावले उचलण्याची गरज आहे. केंद्र व राज्यस्तरावर तांडा विकास योजना, स्वतंत्र घरकूल योजना, बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्र संशोधन व प्रशिक्षण संस्था, महिलांच्या सक्षमीकरणासाठी कौशल विकास योजना, लघुउद्योग उभारणीस चालना देणे, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधत्व, तांड्याला स्वतंत्र महसुली दर्जा देणे, बंजारा मुलींसाठी जिल्हास्तरावर उच्च दर्जाची शैक्षणिक संस्था, मुलींसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती व वसतिगृहाची स्थापना करणे, तांड्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अभ्यास समिती नेमणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 गुणवंतांसाठी शिष्यवृत्ती योजना
तांडे सामू अभियानाअंतर्गत १० वी व १२ वीच्या वंचित आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आल्याचे बंडू राठोड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. समाजात स्वाभिमान पेरणाऱ्या महापुरुषांच्या ग्रंथविचारांसह राज्यातील तांड्यामध्ये प्राथमिक स्तरावर ५००० संविधान ग्रंथाची भेट दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 स्मार्ट तांडा योजना, मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव
महाराष्ट्रात तांडा वस्ती सुधार योजना राबविली जात आहे, मात्र तांड्यांची विदारक स्थिती लक्षात घेता, या योजना अपुऱ्या ठरत असल्याचे अशोक राठोड म्हणाले. यासाठी केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे योजना राबविणे आवश्यक आहे. प्रायोगिक स्तरावर स्मार्ट तांडा योजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे. अभियानाच्या माध्यमातून केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय समाजाची चिंताजनक स्थिती लक्षात घेता अनेक उपायांसह तांडा विकासाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सोपविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 तांड्यांसाठी स्वाक्षरी अभियान
ग्रामीण आणि दुर्गम भागात तांडा वस्ती सुधार योजना राबविली जात आहे. त्याचप्रमाणे शहरी भागातील तांडा वस्त्यांसाठी सुधाकरराव नाईक नागरी तांडा सुधार योजना राबविण्यात यावी, अशी मागणी आहे. याशिवाय गोरमाटी बोलीला भाषेचा दर्जा मिळावा, मुलींसाठी पदवीपर्यंत शिष्यवृत्ती योजना, वसंतराव नाईक यांना भारतरत्न मिळावे, त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मंजूर झालेल्या २० कोटी निधीतून नागपुरात सभागृहाचे बांधकाम करणे व इतर मागण्यांसाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ. सुभाष जाधव यांनी दिली.

Web Title: Dream interpretation of Banja Tana is to be educated, to be able

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.