डॉ. विकास आमटे म्हणतात, आनंदवनने दिली आयुष्याची श्रीमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:37 AM2019-05-27T11:37:06+5:302019-05-27T11:38:37+5:30

अशा सर्व क्षेत्रातील नामवंतांच्या मनात बाबा आमटे व आनंदवनच्या सेवेविषयी प्रचंड आदर आहे. बाबांनी आमच्यासाठी काही केले नाही, पण हा सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती आहे, अशी भावना डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली.

Dr. Vikas Amte says, Anandvan gave the wealth of life | डॉ. विकास आमटे म्हणतात, आनंदवनने दिली आयुष्याची श्रीमंती

डॉ. विकास आमटे म्हणतात, आनंदवनने दिली आयुष्याची श्रीमंती

Next
ठळक मुद्दे मुलाखतीत मिश्किल संवादातून उलगडला सेवेचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आनंदवनात आतापर्यंत ११ लाखाहून अधिक कुष्ठरोग्यांवर उपचार आणि सेवा करण्यात आली. आजही १६०० रुग्ण बेडवर आहेत आणि चार रुग्ण दररोज दाखल होतात. समाजाने दुर्लक्षित केलेल्या या कुष्ठरुग्णांच्या सेवेपेक्षा त्यांना आत्मनिर्भर आणि सन्मानित जीवन देण्यासाठी बाबांनी कार्य केले.
आजही अंध, अपंग, कुष्ठरोगी, परित्यक्त्या असे ३० लाख लोक वेगवेगळ्या प्रकल्पाशी जुळलेले आहेत. म्हणूनच सामाजिक, राजकीय, उद्योग, चित्रपट, साहित्यिक अशा सर्व क्षेत्रातील नामवंतांच्या मनात बाबा आमटे व आनंदवनच्या सेवेविषयी प्रचंड आदर आहे. बाबांनी आमच्यासाठी काही केले नाही, पण हा सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती आहे, अशी भावना डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली.
चिटणवीस सेंटरच्यावतीने ‘कलावंतांच्या मनातील मान्यवर’ या उपक्रमात रविवारी आनंदवनातील बाबा आमटेंचा सेवेचा वारसा चालविणारे डॉ. विकास आमटे यांची मुलाखत घेण्यात आली. रवींद्र दुरुगकर यांची संकल्पना असलेल्या कार्यक्रमात अंजली दुरुगकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी अतिशय मिश्किल उत्तरातून त्यांनी हा सेवेचा प्रवास उलगडला. त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. कुष्ठरोग्यांसोबत राहत असल्याने बालपणी आम्हाला मित्र नव्हते. शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून आनंदवनच्याच शाळेत आमचे प्राथमिक शिक्षण झाले. नागपूरला शिकताना दोन नावाजलेल्या सामाजिक संस्थांमध्ये फार काळ आमचा टिकाव लागला नाही. एका व्यक्तीच्या घरी भाड्याने राहत असताना आमच्याबद्दल कळल्यानंतर आम्हा दोन्ही भावडांना बाहेर काढत अख्खं घर धुवून काढल्याचा प्रसंग त्यांनी नमूद केला. बाबा आमच्या घरातील शेवटचे ब्राह्मण असल्याचे सांगत. त्याकाळच्या महार समाजाप्रमाणे आम्हाला अस्पृश्याप्रमाणे जगणे वाट्याला आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बाबांसोबत आमची आजी, आई या आयांनी आनंदवन चालविल्याचे ते म्हणाले. आम्ही लहानपणापासून बाबांचे हे सेवाकार्य पाहत आलो. याच कार्यात मन रमले. पुढे डॉक्टर झाल्यानंतर दोन्ही भावंडांनी याच कार्यात वाहून घेतल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भारती व त्यांच्या लग्नाचा किस्सा त्यांनी मिश्किलपणे यावेळी सांगितला. आमटे कुटुंबाची तिसरी पिढीही याच सेवेत सहभागी झाली आहे. यवतमाळ, हेमलकसा, सोमनाथ अशा ठिकाणी २८ प्रकल्प सुरू असून, कधी काळी समाजाचा दुर्लक्षित भाग मानले जाणारे कुष्ठरुग्ण आज आत्मनिर्भर होऊन इतर वंचितांसाठी कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
ही पिढी रोडमॅप ठेवून कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अनेक बऱ्यावाईट प्रसंगांचा त्यांनी उल्लेख केला. आनंदवनला बाबा तुरुंग म्हणायचे, मी या तुरुंगाचा जेलर आहे. त्यामुळे सत्कारापेक्षा सत्कार्य महत्त्वाचे आहे. एका दैनिकाचे पत्रकार बाबांना भेटायला आनंदवनात आले आणि येथील कार्य पाहून ‘तुम्हारे हाथो मे सेवा खुशबू है’, असे बाबांना म्हणाले. या प्रेरणेने हेच पत्रकार पुढे ओशो झाल्याचा उल्लेख करीत सुगंध असेल तर तो दरवळेल व लोकांना कळेलच, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे अमित गोन्नाडे यांनी डॉ. आमटे यांचे तैलचित्र रंगविले तर प्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मोरे यांनी त्यांचे व्यंगचित्र रेखाटले. याप्रसंगी कवी मधुप पांडेय व डब्लूसीएलचे एस.पी. सिंह यांनी डॉ. आमटेंवर कविता सादर केली तर लेखिका डॉ. भारती सुदामे व नाट्यकर्मी संजय भाकरे यांनी त्यांच्याविषयीच्या भावना मांडल्या. मुलाखतीदरम्यान सचिन ढोमणे, सुरभी ढोमणे व इतर संगीत कलावंतांनी गजलांचे सादरीकरण केले.

Web Title: Dr. Vikas Amte says, Anandvan gave the wealth of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.