पोलिसांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 01:05 AM2017-10-21T01:05:54+5:302017-10-21T01:07:06+5:30

देशासाठी बलिदान देणाºया शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ आॅक्टोबरला देशभरात शहीद पोलीस दिन पाळला जातो.

Do not ignore the police's duty | पोलिसांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष नको

पोलिसांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष नको

googlenewsNext
ठळक मुद्देत्यांच्यातील माणूस समजून घ्या : पोलीस आमच्याचसाठी, तरी हल्ले का?

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशासाठी बलिदान देणाºया शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ आॅक्टोबरला देशभरात शहीद पोलीस दिन पाळला जातो. या दिवशी हौतात्म्य पत्करणाºया शहीद पोलिसांचे स्मरण करतानाच आपल्या आजूबाजूला वावरणाºया पोलिसांबद्दलही आपण आदर बाळगण्याची गरज आहे. अलीकडच्या काळात वाढलेले हल्ले चिंतेचा विषय ठरावे. सामान्य माणसाचे संरक्षण करणारे पोलीस खचले तर गुंड वरचढ होतील. तसे होऊ नये यासाठी पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संकल्प नागरिकांनी शहीद दिनी करण्याची गरज आहे.
नेहमीच सर्वत्र दिसणारा, तरीदेखिल नेहमीच अनेकांकडून टाळला जाणारा उपेक्षित घटक म्हणूनही पोलिसांचे नाव निघते. एखाद्या वस्ती किंवा गावात बोटावर मोजण्याएवढे समाजकंटक असतात. दारू, गांजा, तस्करी आणि हाणामारी, लुटमारीतही तेच गुंतलेले असतात. मात्र, त्यांच्यामुळे ती संपूर्ण वस्ती अन् गावही बदनाम होते. ‘अरे तिकडे जाऊ नका, तिकडे गुन्हेगार राहतात’, असे म्हटले जाते. चार दोन डॉक्टर, चार दोन वकील अन् समाजातील सर्वच घटकात चार-दोन व्यक्तींची प्रवृत्ती चांगली नसते मात्र त्या चार दोन कुप्रवृत्तीच्या व्यक्तीमुळे समाजाच्या त्या घटकावरच बदनामीचे शिंतोडे उडतात. सर्वात जास्त बदनामी, उपेक्षा अन् टीकेचा विषय ठरलेला घटक म्हणजे पोलीस. पोलिसांवर बदनामीचे शिंतोडे नव्हे तर, चक्क चिखलच उडवला जात असतो. हे करताना त्याच्या कर्तृत्वाकडे सहजपणे दुर्लक्ष केले जाते. त्याच्या कर्तृत्वापेक्षा त्याच्या चुकांकडे मात्र अनेकांचा डोळा असतो. दुचाकीवर जाताना त्याला एखादा फोन आला असेल अन् तो त्याने कानाला लावला तरी त्याचा फोटो व्हायरल होतो. कोणत्याही विभागात काम करताना कोणत्याही वेळेला वरिष्ठांचा फोन येऊ शकतो अन् तो त्यावेळी अटेन्ड करणे आवश्यकही असते. पोलीस दलात तर ते अत्यावश्यकच आहे. दुचाकीवर होतो म्हणून त्यावेळी मी बोलू शकलो नाही, असा खुलासा नंतर तो देऊ शकत नाही, हे त्याचा मोबाईलवरून फोटो काढणाºयाने ध्यानात घ्यायला हवे.
त्याच्याच कुण्या मित्राला अथवा आप्तस्वकीयाला अपघात झाला असेल, चोरी-लुटमार, घरफोडी झाली असेल किंवा कुठे कोणता गुन्हा घडला असेल, त्याची माहिती ‘त्या’ पोलिसाला कुणी देत असावे. यावेळी तो दुचाकीवर आहे म्हणून त्याने फोन नाही घेतला तर संबंधिताला ते किती नुकसानकारक ठरू शकते, याची फोटो काढून व्हायरल करणाºयांनी कल्पना करायला हवी. अनेक सणोत्सवात पोलीस कर्तव्यामुळे सहभागी होऊ शकत नाही. आनंदोत्सवच काय, त्याच्या परिवारातील कुणाचे दुखले, त्याला रुग्णालयात न्यायचे असेल तरी पोलीस कामी पडू शकत नाही. परीक्षेच्या काळात बहुतांश विद्यार्थ्यांचा अभ्यास त्यांचे आई वडील घेतात. त्याला आवश्यक त्या सूचना करतात.
हल्ल्याचे गुन्हे वाढले
पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. एकूण ५९ गुन्हे गेल्या नऊ महिन्यात उपराजधानीतील विविध पोलीस ठाण्यात नोंदले गेले. गेल्या वर्षी १२ महिन्यात ५६ गुन्हे होते. आता अवघ्या नऊ महिन्यात ५९ गुन्हे दाखल झाले. पोलिसांना मारहाण करण्याच्या गुन्ह्यांची टक्केवारी २५ ते ३० टक्के वाढल्याचे या आकड्यातून स्पष्ट होते. या गुन्ह्यातील यंदाच्या आतापर्यंतच्या खालील पाच घटना पोलिसांना व्यथित करणाºया ठरल्या आहेत.
१) धंतोली : पंचशील चौकात सिग्नल तोडणारी एक स्कूटरस्वार महिला कर्तव्यावरील पोलिसाच्या अंगावर धावून गेली.
२) सीताबर्डी : वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न.
३) गणेशपेठ : दारूच्या नशेत वाहन चालविताना पकडले म्हणून कॉटन मार्केट जवळ एका पोलिसावर प्राणघातक हल्ला.
४) पाचपावली : नियम तोडणाºया मित्राला पकडले म्हणून, एका बड्या घरच्या तरुणीनी पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करून धमकी दिली.
५) इमामवाडा : ड्रंकन ड्राईव्हची कारवाई केली म्हणून वाहतूक शाखेच्या दोन मोटरसायकली जाळल्या.
त्या दिवशी हा प्रकार घडणार नाही
गुन्हेगार पोलिसांवर हात उगारण्याची हिंमत करीत नाहीत. प्रौढ आणि समंजस नागरिकही तसे काही करीत नाही. पोलिसांच्या कर्तृत्वाची अन् स्वत:च्या जबाबदारीची जाण नसलेली मंडळी हा निर्ढावलेपणा दाखवतात, असे आतापर्यंतच्या गुन्ह्यातून पुढे आले आहे. पोलीस हे जनतेच्याच सेवेसाठी आहेत. नागरिक ज्या दिवशी हे समजून घेतील त्या दिवशी पोलिसांवरील हल्ल्याचा प्रकार घडणार नाही.
-शिवाजीराव बोडखे
सहपोलीस आयुक्त, नागपूर
असे व्हायला पाहिजे चुकीचे वर्तन नको
सर्वसामान्य व्यक्तींसोबत पोलिसांनी गुन्हेगारांप्रमाणे वर्तन करायला नको. गुंडांवर, अवैध धंदेवाल्यांवर कडक कारवाई करायला हवी. त्यांच्यावर जरब बसवायलाच हवी. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्याची प्रवृत्ती पोलिसांनी ठेवावी. त्यांच्याशी सभ्य भाषेत बोलावे, सतत लोकात मिसळण्याची, संवाद साधण्याची वृत्ती पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना टाळण्यासाठी मदत करणारी ठरेल.
- हेमंत चांदेवार
ठाणेदार, पो. स्टे. बुटीबोरी.
आम्हाला समजून घ्या
दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी पोलीस स्वत:च्या घरी नव्हे तर रस्त्यावर कर्तव्य बजावताना दिसतो. तुमच्या आनंदावर विरजण पडू नये, म्हणूनच आम्ही कर्तव्यावर असतो. आम्हालाही सर्वांनी समजून घ्यावे.
- नरेंद्र हिवरे
ठाणेदार, पाचपावली, नागपूर.
आम्ही तुमच्याचसाठी
आम्ही जनतेच्या जानमालाच्या रक्षणासाठीच आहोत. अर्थात् आम्ही तुमच्यासाठीच आहोत अन् तुमच्याचसारखे आहो. समाजात काही चुकीचे होऊ नये, गुन्हेगारी घडू नये म्हणून आम्ही कार्यरत आहोत हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे.
- संजय पांडे
ठाणेदार, सोनेगाव पो. स्टे. नागपूर.

Web Title: Do not ignore the police's duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.