‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:39 AM2018-05-18T10:39:53+5:302018-05-18T10:39:53+5:30

समाज कल्याणाकरिता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास होणे आवश्यक आहे असे मत इन्फोसेप्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे टेक्निकल अ‍ॅडव्हायझर अभियंता स्वप्निल देशमुख यांनी व्यक्त केले.

The development of 'Artificial Intelligence' is essential | ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास आवश्यक

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास आवश्यक

Next
ठळक मुद्देइन्फोसेप्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे टेक्निकल अ‍ॅडव्हायझर अभियंता स्वप्निल देशमुख यांचे मत  ‘वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाज कल्याणाकरिता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात ही प्रणाली अधिक विकसित करण्यासाठी सखोल संशोधन व्हायला हवे, असे मत इन्फोसेप्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे टेक्निकल अ‍ॅडव्हायझर अभियंता स्वप्निल देशमुख यांनी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्युशन आॅफ इंजिनियर्स नागपूर केंद्र व इन्स्टिट्युशन आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ‘वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अ‍ॅन्ड इन्फर्मेशन सोसायटी डे’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी देशमुख यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वांच्या कल्याणाकरिता सकारात्मक उपयोग’ विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आयोजक संघटनांचे पदाधिकारी मिलिंद पाठक, अजय सावटकर, सुरेश रांगणकर व एम. डी. दाते व्यासपीठावर उपस्थित होते.
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे रोजगार हिरावला जाईल अशी भीती व्यक्त केली जाते, परंतु त्यात तथ्य नाही. मनुष्यबळाला अडचणींवर मात करण्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणे हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा उद्देश आहे. गेमिंग इंडस्ट्रिजमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा सर्वाधिक उपयोग केला जात होता. त्यातून या उद्योगक्षेत्राला झालेला फायदा लक्षात घेता इतरांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. वर्तमान काळात बहुतांश ठिकाणी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर होत आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
सुरक्षा, अंतराळ संशोधन, कृषी, आरोग्य विज्ञान, हवामान इत्यादी क्षेत्रात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ समाज कल्याणाचे कार्य करीत आहे. बॉम्ब शोधून काढणारे व ते निकामी करणारे रोबोटस् ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चाच भाग आहे.‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे येणाऱ्या काळात हवामान कसे राहील, याची माहिती मिळते. देशमुख यांनी यासह विविध बाबींकडे यावेळी लक्ष वेधले.

काय आहे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’
कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधारणत: संगणकच असते. ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये यंत्र शिक्षण, त्यांचे बुद्धिमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. या शाखेतील संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य (जसे नियोजन, संयोजन, निदान, उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज व चेहरा ओळखण्याची क्षमता) करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ प्रणाली अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, कॉम्प्युटर गेम्स, संगणक प्रणाली इत्यादीमध्ये वापरली जाते.

Web Title: The development of 'Artificial Intelligence' is essential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.