देवस्थानने दाखविला समृद्धीचा मार्ग; नागपुरात ग्रामायण सेवा प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:57 AM2018-11-19T10:57:51+5:302018-11-19T10:58:36+5:30

वर्धा जिल्ह्यातील टाकरखेडच्या संत लहानुजी महाराज देवस्थानाने अध्यात्माची शिकवण देण्यासह लोकांच्या रोजगाराचे साधन निर्माण करण्यातही पुढाकार घेतला आहे. गावाच्या समृद्धीचा मार्गच या देवस्थान संस्थेने प्रशस्त केला आहे.

Devasthan showed the path of prosperity; Nagpur Gramayan Service Performance | देवस्थानने दाखविला समृद्धीचा मार्ग; नागपुरात ग्रामायण सेवा प्रदर्शन

देवस्थानने दाखविला समृद्धीचा मार्ग; नागपुरात ग्रामायण सेवा प्रदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देसंत लहानुजी संस्थेचा कर्ममार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकांना धर्म, अध्यात्माचा मार्ग दाखविणाऱ्या मंदिर, देवस्थानाचे अस्तित्व गल्लोगल्ली आहे, मात्र अध्यात्मासोबत कर्म मार्गाचा अवलंब करून लोकांना रोजगारासाठी प्रेरित करणाऱ्या देवस्थानांची संख्या नगण्य आहे. यात वर्धा जिल्ह्यातील टाकरखेडच्या संत लहानुजी महाराज देवस्थानाने अध्यात्माची शिकवण देण्यासह लोकांच्या रोजगाराचे साधन निर्माण करण्यातही पुढाकार घेतला आहे. गावाच्या समृद्धीचा मार्गच या देवस्थान संस्थेने प्रशस्त केला आहे.
मुंडले इंग्लिश मिडियम स्कूलच्या परिसरात सुरू असलेल्या ग्रामायणच्या सेवा प्रदर्शनात ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या विविध संस्थांचे वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यात टाकरखेडचा संत लहानुजी संस्थेचा हा स्टॉलही लक्ष वेधणारा आहे. गांडूळ खत, गांडूळ पाणी, कीटकनाशके, सेंद्रिय ज्वारी आणि फिनाईलच्या वस्तू या स्टॉलवर विक्रीसाठी आहेत. विशेष म्हणजे संस्थेने लोकांच्या सहकार्याने व गोधनाच्या माध्यमातून या सर्व वस्तू संस्थेतच तयार केल्या आहेत. साधारणत: १९७२ साली संस्थेचे अध्यक्ष भैयाजी पावडे व सदस्यांनी गोसंवर्धनाच्या उद्देशाने मंदिराच्या ५० एकराच्या परिसरात गोपालन सुरू केले. पुढे ज्वारीचे पीक घेणे सुरू केले. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी या गोधनापासून मिळालेल्या शेण व गोमूत्रापासून खत तयार केले व त्याचाच उपयोग सुरू केला. या खताची मागणी वाढू लागली व संस्थेने पुढे गावातील शेतकºयांना सहभागी करून घेतले. पुढे गांडूळ खत, फिनाईल व शेतात फवारणीसाठी कीटकनाशक निर्मितीचे काम सुरू करण्यात आले. देवस्थानाद्वारे तयार केलेले खत आणि कीटकनाशके आता मोठ्या प्रमाणात आसपासच्या गावात विक्री केले जात असल्याचे स्टॉलवरील तरुणाने सांगितले. येथेच बायोगॅस संयंत्र बसवून घेण्यात आले असून, यातून गावात जेवणाचा गॅस आणि विजेची गरज भागविली जात असल्याचे त्याने सांगितले. असा हा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे.

दीड हजार महिलांना रोजगार देणारी ‘आरोह’
ग्रामायण प्रदर्शनात फिरताना वारली प्रिंटिंगची नक्षी देऊन तयार केलेल्या महिलांच्या सुरेख कापडी बॅग, पर्स सेट्स, कापडी फाईल व फोल्डर, कॉलेज बॅग्स, लहान बाळांचे कपडे, हॅन्डमेड डायरी, हॅन्डमेड लॅम्पशेड्स आदी वस्तू ठेवलेला स्टॉल सहजच ध्यान आकर्षित करून जातो. हा स्टॉल आहे ‘आरोह’ सेवा संस्थेचा. विशाखा राव यांच्या प्रयत्नातून ही संस्था उभी राहिली. ग्रामीण भागातील गरीब, निराधार व बेरोजगार महिलांच्या शाश्वत उपजीविकेसाठी त्यांना रोजगार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. यातून महिलांना अशा सुरेख बॅग्स व इतर वस्तू तयार करण्याचे व आकर्षक वार्ली प्रिन्टींगचे प्रशिक्षण देऊन नंतर त्यांच्याकडूनच त्या तयार केल्या जातात. त्यांनी तयार केलेला माल संस्थेद्वारे विक्री केला जातो. संस्थेच्या माध्यमातून वाडी, कळमेश्वर, गोंडखैरी व नागपूर ग्रामीण भागातील १५०० महिलांना रोजगार मिळाल्याची माहिती येथे उपस्थित विक्री प्रतिनिधी अर्चना कारेकर यांनी दिली.
प्रदर्शनात एका कडेला लागलेला ‘उमेद’ संस्थेचा स्टॉल. येथे सेंद्रिय पद्धतीने उगवलेले डाळ व हळदीचे पाकीट विक्रीला ठेवले होते. या स्टॉलवर गेल्यानंतर संस्थेची व ती चालविणाऱ्या मंगेशी मून नावाच्या अवलिया व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. मूळच्या वर्धा जिल्ह्यातील मंगेशी या उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या पतीसोबत मुंबईत स्थायिक झाल्या. स्वत:ही नोकरीवर होत्या. मात्र भीक मागणाऱ्या, कचरा वेचणाऱ्या, गुन्हेगारी व व्यसनाधिनतेकडे वळलेल्या भटक्या विमुक्त जमातीतील (पारधी) मुलांसाठी काहीतरी करण्याची जिद्द घेऊन त्यांनी वर्धा येथील वडिलांकडून मिळालेल्या १० एकर शेतीवर उमेद संस्थेच्या माध्यमातून ‘संकल्प वसतिगृहा’ची स्थापना केली. यासाठी त्यांनी स्वत:चे दागिने विकले व पतींनी आठ लाखाचे कर्ज काढून मदत केली. आज या वसतिगृहात ४५ मुले-मुली शिक्षण घेत असून कधीकाळी भीक मागणारे हात अक्षर गिरवू लागली आहेत. या मुलांच्या उपजीविकेसाठी स्वत:च्या शेतात भाज्या व धान्य पिकविण्यास सुरुवात केली व ते धान्य बाजारात नेऊन विक्रीचे कामही त्यांनी केले. याच शेतात पिकलेल्या डाळीचे पाकीट या स्टॉलवर आहेत. मुलांना घरपण मिळावे व सकारात्मक बदल व्हावा, यासाठी शेतात त्यांनी अ‍ॅग्रो टुरीजमही सुरू केले व यातून आर्थिक आधारही त्यांना मिळाला. एका प्रेरणादायी प्रवासाची ओळख ठरलेल्या या स्टॉलची ही संक्षिप्त कथा.

Web Title: Devasthan showed the path of prosperity; Nagpur Gramayan Service Performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.