जिद्द बाळगणाऱ्या अपंगांना ‘उद्धार’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 08:36 PM2018-03-17T20:36:35+5:302018-03-17T20:37:25+5:30

कुणाचा अपघातात, तर कुणाचा गंभीर आजारामुळे पाय निकामी झालेला. कुणी अंपगत्वच घेऊन जन्माला आलेलं. अर्थिक परिस्थितीची म्हणावी तशी साथ मिळत नसल्याने अपंगत्वाची अवहेलना क्षणाक्षणाला झेलण्याचं नशीब वाट्यास आलेलं. मात्र अशा अवस्थेतही जगण्याची, काही मिळविण्याची जिद्द या अपंगांमध्ये आहे. अशा जिद्द बाळगणाºया अपंगांचा आधार बनून त्यांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याचे सत्कर्म ‘उद्धार’ संस्थेने चालविले आहे.

Determined handicaped supported by 'Udhhar' | जिद्द बाळगणाऱ्या अपंगांना ‘उद्धार’चा आधार

जिद्द बाळगणाऱ्या अपंगांना ‘उद्धार’चा आधार

Next
ठळक मुद्देजयपूर फुट शिबिर : २८ वर्षात ३२०० लोकांना स्वत:च्या पायावर उभे केले

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : कुणाचा अपघातात, तर कुणाचा गंभीर आजारामुळे पाय निकामी झालेला. कुणी अंपगत्वच घेऊन जन्माला आलेलं. अर्थिक परिस्थितीची म्हणावी तशी साथ मिळत नसल्याने अपंगत्वाची अवहेलना क्षणाक्षणाला झेलण्याचं नशीब वाट्यास आलेलं. मात्र अशा अवस्थेतही जगण्याची, काही मिळविण्याची जिद्द या अपंगांमध्ये आहे. अशा जिद्द बाळगणाऱ्या अपंगांचा आधार बनून त्यांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याचे सत्कर्म ‘उद्धार’ संस्थेने चालविले आहे.
कुंजबिहारी व त्यांच्या पत्नी कुमकुम अग्रवाल यांच्या नेतृत्वात या संस्थेने असंख्य अपंगांच्या चेहऱ्यावर आनंद व आयुष्यात नवी आशा फुलविली आहे. विविध शहरात शिबिराच्या माध्यमातून अपंगांना नि:शुल्क सेवा देण्यासाठी त्यांचे कार्य गेल्या २८ वर्षापासून अव्याहतपणे सुरू आहे. सुरुवातीला गरजूंना कुबड्या, व्हिलचेअर व ट्रायसिकल त्यांनी दिल्या. मात्र दुसऱ्यांच्या आधारे बसून राहण्यापेक्षा त्यांना स्वत:च्या पायावर चालता येईल, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. यासाठी त्यांना भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे सहकार्य मिळाले. समितीच्या तज्ज्ञ डॉक्टर व कुशल कारागिरांच्या मदतीने विश्वप्रसिद्ध जयपूर फूटचे शिबिर आयोजित करून अपंगांना कृत्रिम पाय व आवश्यक असेल त्यांना कॅलिपर्स लावण्यात येऊ लागले. अशाप्रकारे इतरांच्या आधाराने जगणाऱ्या  अपंगांना जयपूर फूटद्वारे स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम अग्रवाल दाम्पत्याने केले. कुंजबिहारी अग्रवाल सांगतात, आतापर्यंत कृत्रिम पाय रोपण करून ३२०० पेक्षा जास्त अपंगांच्या आयुष्यात आनंद फुलविला आहे.
संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान महावीर विकलांग सहायता समितीच्या सहकार्याने शनिवारपासून आमदार निवास येथे दोन दिवसाचे जयपूर फूट शिबिर आयोजित क रण्यात आले. यामध्ये पहिल्या दिवशी दीडशेच्या आसपास लोकांनी नोंदणी केली. यानंतर समितीच्या तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी करण्यात आली. कृत्रिम पाय बसविणे शक्य असेल त्यांच्या पायाचे मोजमाप करण्यात आले व कृत्रिम पाय निर्मितीच्या कामाला सुरुवातही करण्यात आली. त्यांना ये-जा करावी लागू नये म्हणून संस्थेतर्फे नि:शुल्क राहण्या, खाण्याची व्यवस्था करण्यात आली असून दुसºयाच दिवशी त्यांना कृत्रिम पाय रोपण करण्यात येणार असल्याचे कुंजबिहारी यांनी सांगितले. ज्यांना जयपूर फूट बसविणे शक्य नाही त्यांना कॅलिपर्स, कुबड्या आणि काठ्या देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
देवकीनंदन यांच्या सेवाकार्याला सलाम 
भगवान महावीर विकलांग सहायता समितीसाठी काम करणारे देवकीनंदन शर्मा तेथे येणाऱ्या  प्रत्येक अपंगाचे लक्ष वेधून घेतात. येणाऱ्या  अपंगांची नोंदणी करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. मात्र ते हाताने नाही तर पायानेच सर्व फॉर्म भराभर लिहून काढतात. १६ वर्षाचे असताना विजेचा जोरदार झटका लागला. त्यात त्यांचा एक हात कापावा लागला तर दुसरा निकामी झाला. समोरचं भविष्य अंधकारमय झालं होतं. मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. पायाने जमिनीवर लिहिण्याचा सराव केला. हा सराव त्यांच्या कामात आला. त्यांनी पायानेच दहावीचा पेपर सोडविला. त्यानंतर थांबणे नव्हतेच. पायानेच पेपर लिहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. पुढे ते समितीच्या सेवाकार्यात लागले ते कायमचेच. गेल्या २८ वर्षापासून ते समितीसाठी काम करीत आहेत. डॉक्टर झालेला त्यांचा मुलगा हिमांशू गेल्या सहा वर्षापासून समितीच्या कुठल्याही शिबिरादरम्यान सेवा देतो. या कुटुंबाचे असे समर्पण प्रेरणा देणारेच आहे.
अपंग सचिनला मिळाली नवी उमेद
नागभिड तालुक्यातील नवखडा येथे राहणारा सचिन शंकर ठाकरे. सात वर्षाचा असताना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोटरसायकलस्वाराने धडक दिली. वडील मजुरी करणारे. घरगुती उपचारात त्याच्या पायाला गँगरीन झाला व पाय कापावा लागला. तेव्हापासून कुबड्या त्याच्या सोबती झाल्या. अपंगत्वाची अवहेलना झेलणारा सचिन आता नवव्या वर्गात आहे. या शिबिरात त्याला कृत्रिम पाय मिळणार आहे. सचिन हुशार आहे व त्याला खूप शिकण्याची इच्छा आहे. तो आता कुबड्यांशिवाय चालू शकणार, हा आनंद त्याच्या चेहºयावर आहे. शिवाय कुंजबिहारी अग्रवाल यांनी त्याला शिक्षणासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे सचिनसोबत वडिलांनाही नवी उमेद मिळाली आहे.
ट्रेनमध्ये पाय गमावला, जिद्द नाही
बेसा परिसरात राहणारी प्रगती सूरज तिवारी या मुलीची कथा अंगावर काटा आणणारी आहे. नागपुरात बीएससी केल्यानंतर तिने २०१७ मध्ये दिल्ली येथील संस्थेत एमबीएला प्रवेश घेतला. मागील वर्षी सणानिमित्त घरी येत असताना धौलपूर स्टेशनवर ट्रेनच्या अपघातात तिचा पाय कटला. स्टेशनवर उभे असलेले मोबाईलवर व्हिडीओ घेत होते, मात्र मदतीसाठी कुणी पुढे आले नाही. अशावेळी ती स्वत: हिमतीने उठली व काही स्थानिक मुलांच्या मदतीने सायकलवर रुग्णालयात गेली. तिने उजवा पाय गमावला, पण जिद्द नाही. जयपूर फुट शिबिरात ती कृत्रिम पायासाठी आली होती. डॉक्टरांनी तपासणी करून पाय निर्मितीस सुरुवात केली. पुन्हा स्वत:च्या पायावर उभी होऊन यशोशिखर गाठण्याचा विश्वास तिने व्यक्त केला.
अपंग आॅटोचालक मोरेश्वर यांचा संघर्ष
गणेशपेठ येथे राहणारे मोरेश्वर सहारे हे एसटीचे चालक होते. २०१२ मध्ये वर्ध्याच्या सेलूजवळ त्यांचा अपघात झाला. मेडिकलमध्ये उपचारादरम्यान गँगरीन झाल्याने त्यांचा पाय कापावा लागला. नोकरीही गेली व दोन वर्ष ते घरीच बसून राहिले. पत्नी, दोन मुले व मुलगी असे कुटुंब चालविण्याचे संकट होते. एसटी महामंडळाकडूनही मदत मिळाली नाही. अशावेळी माहिती मिळवून त्यांनी जयपूर फूट शिबिरात कृत्रिम पाय बसवून घेतला. त्यानंतर त्यांनी स्वत:चा आॅटो घेतला. ५३ वर्षाचे मोरेश्वर आता आॅटो चालवून कुटुंबाची गुजराण करीत आहेत. त्यांच्या निराश आयुष्यात पुन्हा आनंद फुलला आहे.
तुमसरचे विश्वनाथ व दौलतराव
तुमसर येथील विश्वनाथ बडवाईक व दौलतराव चिंधालोरे यांची कथा निराशेवर मात करणारी आहे. विश्वनाथ यांचा २० वर्षापूर्वी एका अपघातात पाय गेला तर दौलतराव यांना २००४ मध्ये गँगरीनमुळे पाय कापावा लागला. कुटुंबाला आधार देणारे आता कुटुंबावरच जड झाले होते. अनेक दिवस निराशेत गेले. दोघांच्याही मनात आत्महत्या करण्याचाही विचार आला. अशावेळी उद्धार संस्थेच्या मदतीने विश्वनाथ यांनी १७ वर्षापूर्वी जयपूर फूट बसवून घेतले. दौलतराव यांनीही १० वर्षापूर्वी नागपुरात झालेल्या शिबिरात कृत्रिम पाय लावला. आज ते दोघेही इतरांप्रमाणे जीवन जगत आहेत. जड काम होत नसले तरी लहानमोठे काम करून परावलंबी जगण्यापेक्षा कुटुंबाचा आधार झाले आहेत.

 

Web Title: Determined handicaped supported by 'Udhhar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.