‘एलआयटी’ला मिळणार ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:18 AM2018-08-02T01:18:51+5:302018-08-02T01:20:14+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित व देशातील नामांकित रासायनिक अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजी) स्वायत्तता देण्यात यावी, अशी जुनी मागणी आहे. मात्र ‘एलआयटी’ला स्वायतत्ता मिळण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळेच केंद्रीय पातळीवरून ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

'Deemed University' will get LIT status? | ‘एलआयटी’ला मिळणार ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा?

‘एलआयटी’ला मिळणार ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा?

Next
ठळक मुद्देविद्यापीठ पाठविणार केंद्राकडे प्रस्ताव : स्वायत्तता मिळणे शक्य नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाद्वारे संचालित व देशातील नामांकित रासायनिक अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजी) स्वायत्तता देण्यात यावी, अशी जुनी मागणी आहे. मात्र ‘एलआयटी’ला स्वायतत्ता मिळण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळेच केंद्रीय पातळीवरून ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजी ही नागपुरातील जुन्या अभियांत्रिकी संस्थांपैकी एक आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये या संस्थेच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. मुंबईचे आयसीटी,व्हीजेटीआय, पुण्याचे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, नांदेडचे एसजेजीएस, कराड तसेच अमरावतीचे अभियांत्रिकी महाविद्यालये यांना स्वायत्तता मिळाल्यानंतर त्यांचा चेहरामोहरा बदलला. त्यामुळे ‘एलआयटी’ला स्वायत्तता मिळावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे. मात्र प्रत्यक्षात ‘एलआयटी’मध्ये प्राध्यापकांची सुमारे ३२ पदे रिक्त आहेत; शिवाय सर्व विभागांचे ‘एनबीए’ मूल्यमापनदेखील झालेले नाही. अशास्थितीत स्वायत्तता मिळणे अडचणीचे जाणार आहे.
त्यामुळे ‘एलआयटी’च्या विकासासाठी याला ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
...तर २०० कोटी रुपये मिळतील
यासंदर्भात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता ‘एलआयटी’ला ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा मिळणे जास्त सोपे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबतीत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशीदेखील चर्चा झाली आहे. त्यांना विद्यापीठातर्फे लवकरच पत्र लिहिण्यात येईल व याबाबतीत मागणी करण्यात येईल. येथील पदभरतीसाठी केंद्रातर्फे विशेष परवानगी देण्यात यावी, अशी विनंतीदेखील करण्यात येईल; सोबतच व्यवस्थापन परिषदेतदेखील यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात येईल, असे डॉ. काणे यांनी सांगितले. जर ‘एलआयटी’ला ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा मिळाला तर विकासासाठी २०० कोटींचा निधी प्राप्त होऊ शकतो व या माध्यमातून संस्थेचा पूर्णपणे कायापालट शक्य होऊन तेथे जागतिक सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात, अशी माहितीदेखील डॉ. काणे यांनी दिली.

 

Web Title: 'Deemed University' will get LIT status?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.