नागपुरात रुग्णांप्रति आनंदाचे ‘समर्पण’; दिवाळीनिमित्त दिली कपड्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 10:49 AM2018-11-08T10:49:29+5:302018-11-08T10:49:55+5:30

दिवाळीच्या दिवसात रुग्णांना नव्या कोऱ्या कपड्यांची भेट देत त्यांच्या आनंदात अनोखी दिवाळी साजरी करीत आहे.

'Dedication' to happiness in patients in Nagpur; Diwali celebrations with new clothes | नागपुरात रुग्णांप्रति आनंदाचे ‘समर्पण’; दिवाळीनिमित्त दिली कपड्यांची भेट

नागपुरात रुग्णांप्रति आनंदाचे ‘समर्पण’; दिवाळीनिमित्त दिली कपड्यांची भेट

Next
ठळक मुद्देसमर्पण संस्थेचा अभिनव उपक्रम

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुखणे सोसात असताना नाउमेद होत असलेले मन, तोच तो औषधांचा दर्प, उपचार करण्याची परिस्थिती नसताना संघर्ष करीत असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक. दिवाळीच्या झगमगटापासून दूर असलेल्या या रुग्णांचा चेहऱ्यावरही या सणाचा आनंद दिसावा, यासाठी समर्पण संस्था गेल्या १५ वर्षांपासून विधायक कार्य करीत आहे. दिवाळीच्या दिवसात रुग्णांना नव्या कोऱ्या कपड्यांची भेट देत त्यांच्या आनंदात अनोखी दिवाळी साजरी करीत आहे.
अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देणाऱ्या या सणाची खासियत काही औरच. दारासमोरची रांगोळी, आकाशकंदील, फराळ आणि फटाक्यांसह दिवाळीच्या चार दिवसांमध्ये सर्वत्र उत्साह संचारला असतो, मात्र शासकीय रुग्णालयातील चित्र वेगळेच असते. दिवाळीचा प्रारंभ म्हणजे धनत्रोयदशीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सुमारे ८०० वर रुग्णांना नव्या कपड्यांची भेट दिली जाते.
ही परंपरा गेल्या आठ वर्षांपासून जपली जात आहे. सोमवारी साड्या, पातळ, शर्ट, धोतर, लहान मुलांचे ड्रेस अशा कपड्यांची अनोखी भेट स्वीकारताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. ‘समर्पण’ आणि रुग्णांमध्ये एक हळूवार भावनिक नाते जुळले होते.
हनुमानप्रसाद राठी, ओमप्रकाश खंडेलवाल, अनिल किनाडीवाला, वाळकेजी यांच्यासह आणखी काहीजण ‘समर्पण’मध्ये आहेत. यातील प्रत्येक जण आपल्या व्यवसायत मिळालेल्या नफ्यातील काही भाग या स्तुत्य उपक्रमावर खर्च करतात. सोमवारी या कपड्यांचे वाटप करताना स्वत: मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे, नगरसेविका काडगाये, डॉ. बागडे यांच्यासह मेडिकलचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

रुग्णांना रोज दिला जातो फलाहार
‘समर्पण’चा दिवस मेडिकलमध्ये सकाळी ७ वाजतापासून सुरू होतो. तब्बल ४० वॉर्डातील रुग्णांना फळांची न्याहरी देतात. ही सेवा देत असताना बाहेरगावातील रुग्णांच्या नातेवाईकांना दुपारच्या जेवणाच्या कूपन्सही वितरित करतात. रोज साधारण ३५० जणांची भूक भागवितात. राजाबाक्षातील ‘समर्पण’ वास्तूत वर्षाचे ३६५ दिवस हे अन्नछत्र सुरू असते.

Web Title: 'Dedication' to happiness in patients in Nagpur; Diwali celebrations with new clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी