Death of policemen on DIG bungalow | डीआयजींच्या बंगल्यावरील पोलिसाचा मृत्यू
डीआयजींच्या बंगल्यावरील पोलिसाचा मृत्यू

ठळक मुद्देगडचिरोलीचे कर्मचारी : मुदत संपूनही ठेवले होते नागपुरात कर्तव्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गडचिरोलीचे डीआयजी अंकुश शिंदे यांच्या बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गडचिरोलीतील नायक पोलीस शिपायाचा अकस्मात मृत्यू झाला. संतोष पेंड्डीवार (वय ४३) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पेंड्डीवार हे गडचिरोली पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांची गेल्या महिन्यात गडचिरोलीचे डीआयजी अंकुश शिंदे यांच्या नागपुरातील बंगल्यावर एक महिन्यासाठी गार्ड ड्युटी लागली होती. शिंदे यांचा बंगला नवीन आरबीआयजवळ आहे. पेंड्डीवार यांच्या नियुक्तीचा महिनाभराचा कालावधी पूर्ण झाला होता. ते गडचिरोलीला परत जाण्याच्या प्रतीक्षेत होते; मात्र त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. रविवारी सायंकाळी त्यांनी त्यांच्यासोबतच्या पोलिसाला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना झोपण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पेंड्डीवार झोपायला गेले. रात्री १० च्या सुमारास सहकारी पेंड्डीवार यांना जेवण करण्यासाठी आवाज देऊ लागला. प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्याने जवळ जाऊन बघितले तेव्हा पेंड्डीवार बेशुद्धावस्थेत आढळले. ही माहिती लगेच वरिष्ठांना कळविण्यात आली. पेंड्डीवार यांना मेयोत नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास डॉक्टरांनी पेंड्डीवार यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
कुटुंबीयांना धक्का
पेंड्डीवार यांच्या कुटुंबात आई-वडील, पाच बहिणी, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असल्याचे समजते. दोन-तीन दिवसांपासून प्रकृती चांगली नसल्याचे त्यांनी कुटुंबीयांना कळविले होते. कधी एकदा सुटी होऊन कुटुंबीयांमध्ये जातो, असे त्यांना वाटत होते. मात्र, त्यांचा मृतदेहच त्यांच्या घरी नेण्यात आला. त्यामुळे पेंड्डीवार कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.


Web Title: Death of policemen on DIG bungalow
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.