ठळक मुद्देभिंत पडल्याने वडील व मुलगी जखमी : जीर्ण चाळ रिकामी करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशपेठ येथील मॉडेल मिल चाळीची इमारत जीर्ण झाली आहे. कोणत्याही क्षणी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. असे असूनही २९४ कुटुंब येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी चाळीची दोन नंबरची भिंत लगतच्या घरावर पडली. यामुळे टिनाच्या शेड असलेल्या घरात वास्तव्यास असलेले आॅटोचालक शेख भुरू (४३) व त्यांची मुलगी सानिया (११) गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेख भुरू व त्यांची मुलगी सानिया जेवण करीत असतानाच ही दुर्घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. नगरसेवक हर्षला साबळे यांनी घटनेची प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर धंतोली झोन व अतिक्रमणविरोधी पथकाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी चाळीतील रहिवाशांना दुसरीकडे वास्तव्यास जाण्याचे निर्देश दिले.इमारतीचा जीर्ण भाग पाडण्याला पथकाने सुरुवात करताच काही महिलांनी याला विरोध दर्शविला. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाºयांनी दुपारी ४ वाजता लाऊ डस्पीकर फिरवून चाळ खाली करण्याची दवंडी दिली. पावसाळ्याच्या दिवसात जीर्ण इमारत पडण्याचा धोका असल्याने रहिवाशांनी अन्यत्र वास्तव्यास जाण्याचे आवाहन अधिकाºयांनी केले. तसेच परिसरात २४ तासात चाळ खाली करण्यासंदर्भात नोटीस लावण्यात आल्या आहेत. या कालावधीत चाळ खाली न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पथकाने खाली इमारतीचा जीर्ण झालेला वरचा भाग व भिंत पाडली. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील , झोन अधिकारी नरेंद्र भंडारकर, जमशेट अली व पोलीस पथकाने केली.
बिल्डर व चाळधारकांत वाद
१९९४ साली मॉडेल मिल चाळीत ३०२ कुटुंब वास्तव्यास होते. परंतु ही इमारत जीर्ण झाल्याने रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली होती. राज्य सरकारकडून मुंबईच्या पीअ‍ॅन्डपी असोसिएटने ही जमीन खरेदी केली. परंतु चाळधारक इमारत रिकामी करायला तयार नाही. अखेर बिल्डर व चाळधारकात झालेल्या करारानुसार इमारतीच्या पहिल्या माळ्यावर येथील रहिवाशांना २२५ चौ.फुटाचे फ्लॅट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने प्रत्येकाला २७५ चौ.फुटाचे फ्लॅट देण्याची घोषणा केली. सरकारच्या घोषनेनुसार फ्लॅट देण्याची गाळेधारकांची मागणी आहे. मात्र बिल्डरचा याला विरोध आहे.