Cybertech again extended for home survey in Nagpur | नागपुरातील घरांच्या सर्वेक्षणासाठी सायबरटेकला पुन्हा मुदतवाढ

ठळक मुद्देमनपा स्थायी समितीकडे प्रस्ताव : २०१८ पर्यंत डाटा संकलित करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरोघरी जाऊन शहरातील घरांचा डाटा संकलित करण्याची जबाबदारी मे. सायबरटेक सिस्टीम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीवर सोपविण्यात आली. परंतु डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतरही शहरातील ५८ टक्के घरांचाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. उर्वरित ४२ टक्के घरांचे सर्वेक्षण करून डाटा संकलित करण्यासाठी या कंपनीला पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव कर व कर आकारणी विभागाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. कंपनीच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानंतरही या कंपनीला पुन्हा मुदतवाढ देण्याचा विचार आहे. शुक्र वारी समितीच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
सायबरटेक कंपनीवर शहरातील ६ लाख मालमत्तांचा डाटा संकलित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यासाठी प्रती युनिट १२० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. कंपनीने ३ लाख ४८ हजार घरांचा डाटा संकलित केला तर २ लाख ५२ हजार घरांचे सर्वेक्षण शिल्लक आहे. सायबरटेक कंपनीला वर्षभरापूर्वी सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. आॅक्टोबर २०१७ पर्यत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या कालावधीत ५० टक्केही काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे या कंपनीला डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही सर्वेक्षण पूर्ण करण्यात यश मिळाले नाही. त्यानंतरही या कंपनीला मुदतवाढ देण्याचा विचार आहे.
प्रस्तावात सायबरटेक कंपनीला मुतदवाढ देऊ न ३१ मार्चपर्यंत ४२ टक्के घरांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात यावे. यासाठी कंपनीने मनुष्यबळ वाढवून मुदतीत काम करणे अपेक्षित आहे. सोबतच या कामाची निविदा प्रक्रिया राबविताना ज्या एजन्सींनी यात सहभाग घेतला होता व यासाठी पात्र ठरल्या होत्या. त्यांना विचारणा करून डाटा संकलनाचे काम देणे, तसेच सहभाग न घेतलेल्या एजन्सींनाही काम देण्याचा विचार आहे.
अर्धवट व चुकीच्या सर्वेक्षणात सुधारणा न करता झोन कार्यालयांनी चुकीचा डाटा अपलोड केला. यामुळे मालमत्ताधारकांना अव्वाच्या सव्वा डिमांड पाठविण्यात आल्याने नागरिकांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. याचा विचार करता नगरसेवकांनी चुकीचा सर्वे रद्द करण्याची मागणी केली होती. अखेर सभागृहात दुपटीपेक्षा अधिक कर न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एकाच वेळी एकाहून अधिक एजन्सीची नियुक्ती करून मार्च संपण्यापूर्वी सर्वेक्षण पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र गेल्या ३७ दिवसापासून शहरातील घरांचा सर्वे करण्याचे काम ठप्प आहे.
एक घर एक युनिटवर निर्णय
सायबरटेक कंपनीला एक घर एक युनिट यानुसार सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र नंतर यात सुधारणा करून एका घरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे स्वतंत्र युनिट गृहीत धरून नोंदी करण्यात आल्या. युनिट वाढल्याने सायबरटेक कंपनीला अधिक रक्कम द्यावी लागली. शिल्लक घरांचे सर्वेक्षण करताना युनिट गृहीत धरण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.
सामान्य कर जैसे थे
कर व कर आकारणी विभाग २०१८-१९ या वर्षात मालमत्ताकरांतर्गत आकारावयाच्या प्रस्तावित करात कोणतीही वाढ करणार नाही. सामान्य कर, मलजल कर, मलजल लाभ कर, पाणीपट्टी कर, पाणी लाभ कर, अग्निशमन कर, दिवाबत्ती कर, पथकर, वृक्षकर यात कोणत्याही स्वरुपाची वाढ प्रस्तावित नाही. २०१७-१८ या वर्षातील दर कायम ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.


Web Title: Cybertech again extended for home survey in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.