The curse of waiting for their 'luck' to live! | ‘त्यांच्या’ नशिबी जगण्याच्या उमेदीला प्रतीक्षेचा अभिशाप !
‘त्यांच्या’ नशिबी जगण्याच्या उमेदीला प्रतीक्षेचा अभिशाप !

ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालयात १२८ मनोरुग्ण बरे होऊनही स्वकियांपासून दूर

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्यांचे अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात नियतीशी झगडण्यात गेले. अनेक वर्षांच्या उपचारानंतर ते बरे झाले. आता आपले कुटुंबीय येतील, हात धरून घरी नेतील आणि उर्वरित जीवन कुटुंबीयांसह सुखासमाधानात आनंदाने जगायला मिळेल, अशी स्वप्नेही त्यांनी रंगविली. मात्र, समजदारांच्या मतलबी दुनियेचे वास्तव दुसऱ्याच क्षणाला त्यांच्या लक्षात आले. बरे झाल्यावर कुणीही त्यांना घरी नेण्यास तयार नाहीत. यासाठी समोर केल्या जाणाऱ्या कारणांनी बसणारे झटके त्यांना शॉकपेक्षाही वेदना देणारे आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयात असे १२८ बरे झालेले रुग्ण आहेत जे मनोरुग्णाचे जीवन मागे टाकून सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगण्याच्या इच्छेसाठी आसुसले आहेत.
औषधोपचारांच्या क्षेत्रात आमूलाग्र प्रगती झाली. असंख्य जीवघेण्या आजारांवर मानवाने मात केली. मात्र, मनोरुग्णांच्या दुर्दैवाचे दशावतार दूर करण्याला शासन आणि समाजाला यश मिळत नसल्याचे वास्तव आहे. ठाणे, पुणे, नागपूर आणि रत्नागिरी या चारही ठिकाणच्या मनोरुग्णालयाची परिस्थिती थोड्याफार फरकाने सारखीच आहे. वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच त्यांच्या उर्वरित भविष्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. यातही नागपूरचे प्रादेशिक मनोरुग्णालय आपल्यापरीने परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या अपुºया निधीतूनही बरे झालेल्यांना स्वयंरोजगाराचे धडे देत आहेत, परंतु त्यांनाही मर्यादा आहेत. बऱ्या झालेल्या १२८ मनोरुग्णामध्ये ८२ रुग्णांना आपले पत्तेच माहीत नाही, तर ४६ रुग्णांच्या पत्त्यावर रुग्ण बरा झाल्याचे सांगूनही नातेवाईकांनी त्यांना घरी नेण्यास चक्क नकार दिला आहे. मनोरुग्णाचे जीवन मागे टाकून आता सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगण्याची त्यांची इच्छा असतानाही त्यांना मनोरुग्णालयाच्या दगडी भिंतीत जगावे लागत आहे. जगण्याची उमेद गवसलेल्या या सर्वांना आजही स्वकियांचा शोध आहे.
२५ वर्षांपासून स्वकियांची प्रतिक्षा
प्रादेशिक मनोरुग्णालयातील उपचारानंतर बरे झालेल्या १२८ रुग्णांमध्ये ४४ महिला तर ८४ पुरुषांचा समावेश आहे. यातील काही रुग्ण १५ ते २५ वर्षांपूर्वीच बरे झालेले आहेत. परंतु अनेकांना आपला पत्ताच आठवत नाही. तर कुणाला तो नीट सांगता येत नाही. यातील अनेकांचे वय ५० ते ६६ च्या दरम्यान आहे. यामुळे उतरत्या वयात स्वकियांची प्रतीक्षा तीव्र झाली आहे. रुग्णालयाच्या भल्या मोठ्या लोखंडी प्रवेशद्वाराकडे त्यांची नजर लागली आहे. कुणी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल या प्रतीक्षेत रोजचा दिवस ढकलत आहे.


Web Title: The curse of waiting for their 'luck' to live!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.