अधिवेशनाच्या धामधुमीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयाने वाचविले चिमुकल्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:34 PM2017-12-11T22:34:11+5:302017-12-11T22:40:54+5:30

चिमुकल्या जीवाला तात्काळ उपचार मिळावेत म्हणून त्याच्या आईवडिलांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याच कार्यालयात फोन लावला आणि अवघ्या काही मिनिटात उपचार सुरू होऊन बाळाचे प्राण वाचल्याची हृद्य घटना नागपूर येथे सोमवारी घडली.

critical child,s life saved by the office of Union Minister Nitin Gadkari | अधिवेशनाच्या धामधुमीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयाने वाचविले चिमुकल्याचे प्राण

अधिवेशनाच्या धामधुमीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयाने वाचविले चिमुकल्याचे प्राण

Next
ठळक मुद्देएका फोनसरशी लगेच मिळाले उपचारगडकरींचे कार्यालय झाले भावनिकगडकरींनी दिल्या विशेष सूचना

आॅनलाईन लोकमत
नागपूर : स्थळ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे रामनगरातील कार्यालय. वेळ : दुपारी १ ची. एक फोन खणाणला. एरवी बदली, कर्जमंजुरी, अडलेली शासकीय कामे यासाठी कार्यालयात फोन सुरूच असतात. पण, हा फोन जरा वेगळा होता. पलीकडून आवाज आला... माझ्या मुलाला वाचवा, त्याला तत्काळ उपचाराची गरज आहे. गडकरींचे स्वीय सचिव अतुल मंडलेकर फोनवर होते. ही भावनिक साद ऐकून अवघे कार्यालय हादरले. मंडलेकर यांनी याबाबत लगेच सूत्रे हलवली आणि पुढच्या तासाभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्या चिमुकल्यावर उपचार सुरू झाले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. अन्यथा त्याचे प्राण धोक्यात आले असते. सोमवारी घडलेला हा प्रसंग नेमका असा घडला. संततीसुख लाभणार म्हणून जळगाव जामोद येथील आगरकर दाम्पत्य प्रचंड आनंदात होते. अखेर तो दिवस आला. त्यांना पुत्ररत्न झाले. परंतु दुर्दैवाने जन्मासोबतच त्याच्या डोक्याला एक मोठी गाठ होती. त्यांनी अकोल्यात डॉक्टरला दाखवले. त्यांनी ताबडतोब नागपूरला हलविण्याची सूचना केली. या चिमुकल्याचे वडील प्रकाश आगरकर पत्नीसह नागपुरात दाखल झाले. धावपळ करीत मेडिकल गाठले. परंतु तोपर्यंत दुपार झाली होती. ओपीडीची वेळ संपली होती. डॉक्टरांनी मुलाला दाखल करून घेण्यास नकार दिला. उपाशापोटी हे दाम्पत्य निराश अवस्थेत मेडिकल बाहेर पडले. पण, या अनोळखी शहरात पाच दिवसांच्या चिमुकल्याला घेऊन जावे तरी कुठे त्यांना कळेचना. अखेर त्यांनी नागपुरातील एका नातेवाईकाला फोन लावला. त्यांनी प्रकाश आगरकर यांचे बोलणे गडकरींच्या कार्यालयात करून दिले. मंडलेकर यांनी मेडिकलला फोन लावला. गरीब रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवणाऱ्यांची खरडपट्टी काढली. अवघे मेडिकल प्रशासन हादरले, लगेच कामाला लागले. प्रकाश आगरकर यांना बोलावून त्यांच्या मुलाला दाखल करून घेण्यात आले. इकडे उपचार सुरू झाले अन् तिकडे या चिमुकल्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पसरले.

गडकरी म्हणाले, आधी बाळाचे बघा
इकडे गडकरींच्या कार्यालयात ही भावनिक धडपड सुरू असताना दिल्लीहून गडकरी यांचा फोन आला. मंडलेकर यांनी त्यांना हा प्रकार सांगताच ते गहिवरले. त्यांनी सूचना केल्या, हातातली सगळी कामे बाजूला सारा. ती नंतरही होत राहतील. या बाळाचे आधी बघा. त्याला काय वैद्यकीय उपचाराची गरज आहे, याकडे जातीने लक्ष द्या आणि बाळाच्या प्रकृतीची इत्थंभूत माहिती मला कळवत रहा.

Web Title: critical child,s life saved by the office of Union Minister Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.