मेट्रोसाठी पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 09:00 PM2019-05-09T21:00:33+5:302019-05-09T21:01:44+5:30

पारडी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याबद्दल ‘जय जवान, जय किसान’ संघटनेने नाराजी व्यक्त करीत या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. बांधकाम गेल्या महिन्यात पूर्ण होणार होते. कालबद्धतेनंतरही केवळ २५ टक्के काम झाले आहे. अर्धवट बांधकामामुळे जवळपास चार वर्षांपासून नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Corruption in construction of Pardi flyover for Metro | मेट्रोसाठी पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार

मेट्रोसाठी पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार

googlenewsNext
ठळक मुद्देजय जवान, जय किसान संघटनेचा आरोप : आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारडी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याबद्दल ‘जय जवान, जय किसान’ संघटनेने नाराजी व्यक्त करीत या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
बांधकाम गेल्या महिन्यात पूर्ण होणार होते. कालबद्धतेनंतरही केवळ २५ टक्के काम झाले आहे. अर्धवट बांधकामामुळे जवळपास चार वर्षांपासून नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
यासंदर्भात ‘जय जवान, जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी सांगितले की, पूर्व नागपुरात पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती संथ असल्याच्या कारणावरून आंदोलन करण्यात आले आहे. नागरिकांना सुविधायुक्त ठरणाऱ्या या पुलाचे बांधकाम वारंवार का थांबविण्यात येत आहे, हा गंभीर प्रश्न आहे. याशिवाय बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी. बांधकाम वेळेत पूर्ण न होण्यासाठी कुणाची तर चूक नक्कीच आहे. या चुकीची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. प्रकल्पाला उशीर होत असल्यामुळे सामान्य नागरिक आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कामाला वेळ लागत असल्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढली आहे. त्याचा भुर्दंड नागरिकांवर बसणार आहे. पूर्वी डिझायनिंगवर शिक्कामोर्तब न केल्यामुळे आता बांधकामाच्या नावावर लोकांच्या जमिनी ताब्यात घेण्यात येत आहे. ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आले, त्या कंपनीच्या स्थितीचे योग्यरीत्या आकलन करण्यात आलेले नाही. कुणाला तरी फायदा होण्याच्या दृष्टीने प्रकल्पाचे बांधकाम सुरू केल्याचे दिसून येत आहे. शहराच्या विकासात पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामासंदर्भात थट्टा सुरू आहे. त्यावर पांघरूण घालता येणार नाही. या मुद्यांवर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रकल्पाची स्थिती

  •  २१ ऑगस्ट २०१४ मध्ये प्रकल्पाचे उद्घाटन.
  • ४४८ कोटी रुपयांच्या किमतीसह मार्च २०१६ मध्ये काम सुरू.
  •  पारडी नाका ते इतवारीपर्यंत ३.४ कि़मी., कळमना ते मानेवाडापर्यंत ३ कि़मी., प्रजापती चौक ते वैष्णोदेवी चौकापर्यंत ७.४ कि़मी. लांबीचा उड्डाणपूल.
  •  २०१८ पर्यंत जवळपास २५ टक्के बांधकाम.

पावसाळ्यात अपघाताची शक्यता
प्रकल्पात उड्डाणपुलासोबतच रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम अर्धवट असल्यामुळे खोदण्यात आलेल्या रस्त्याचे बांधकामही अपूर्ण आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून अपघात वाढण्याची शक्यता आहे. या मार्गावरून नागरिकांना वाहन काढणे कठीण होणार आहे. याशिवाय लगतच्या वस्त्यांमधून नागरिकांना रस्त्यावर येणे कठीण होऊन ये-जा बंद होणार आहे.

 

Web Title: Corruption in construction of Pardi flyover for Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.