बसमधून खाली खेचले : जमाव संतप्त, गुंडांची धुलाई
नागपूर : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गुंडांनी प्रवासी बसच्या महिला वाहकाला बेदम मारहाण केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्दळीच्या चामट चौकात शुक्रवारी दुपारी ३ वाजता ही संतापजनक घटना घडली. चौकातील संतप्त जमावाने महिला वाहकाची गुंडांच्या तावडीतून सुटका करतानाच चारपैकी एका गुंडाला बेदम चोप दिला. त्याचे तीन साथीदार मात्र पळून गेले.
राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कल्पना अजाबराव लकडे शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास प्रतापनगरातून नागपूर-चिमूर बसने कर्तव्यावर निघाल्या. दुपारी ३ च्या सुमारास बस उमरेड मार्गावरील चामट चौकात आली. अवैध प्रवासी करणाऱ्या गुंडांचे टोळके तेथे उभे होते. त्यातील एकाने कल्पना यांना ‘टोल नाक्यावर जायचे आहे, असे म्हटले. बस टोल नाक्यावर थांबणार नाही‘, असे कल्पनांनी उत्तर देताच त्या आरोपीने कल्पना यांना अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नाही तर त्यांना बसमधून खाली खेचून चौघांनी बेदम मारहाण केली. (प्रतिनिधी)
नेहमीचाच प्रकार
नागपूर : पोलीस ठाण्यात सेटींग केल्याप्रमाणे नंदनवनमधील गुंड, अवैध गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. त्यांचा सर्वसामान्यांना त्रास नेहमीचाच प्रकार आहे. या गुंडांची चामट चौकात दिवसभर भाईगिरी सुरू असते. प्रवाशांनाच नव्हे तर वाहनचालकांनाही त्यांचा त्रास असल्याचे आजच्या घटनेतून उघड झाले आहे. शिवाय हे गुंड किती निर्ढावले आहेत, त्याचीही या घटनेतून पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.(प्रतिनिधी)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.