नागपूर शहरातील २३९ नाल्यांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 08:58 PM2019-06-24T20:58:06+5:302019-06-24T20:59:08+5:30

शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्याला गेल्या महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. शहरात २३९ नाले असून २३ जूनपर्यंत शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.

Cleanliness of 239 drains in Nagpur city | नागपूर शहरातील २३९ नाल्यांची स्वच्छता

नागपूर शहरातील २३९ नाल्यांची स्वच्छता

Next
ठळक मुद्देचेंबरची सफाई अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्याला गेल्या महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. शहरात २३९ नाले असून २३ जूनपर्यंत शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता व्हावी, यासाठी दहा झोनमध्ये ७८ छोटे जेसीबी, पोकलेन व टिप्पर तसेच १६१ कामगार उपलब्ध करण्यात आले होते. नाले स्वच्छ झाल्याने पावसाळ्याच्या दिवसात नाले तुंबण्याचा धोका कमी झाला आहे. नाल्याच्या काठावरील वस्त्यात पुराचे पाणी शिरणार नाही, असा विश्वास आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. सुनील कांबळे यांनी व्यक्त केला.
सुरुवातीला नाले स्वच्छतेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता होईल की नाही, अशी शंका व्यक्त के ली जात होती. परंतु यंदा मान्सून लांबल्याने स्वच्छतेसाठी अवधी मिळाला. त्यामुळे नाले स्वच्छ करणे शक्य झाले.
शहरात एकूण २३९ नाले आहेत. गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक ५१ नाले आहेत. सर्वांत कमी १४ नाले हनुमाननगर झोनमध्ये आहेत. शहरातील तीन नद्यांचे पाणी अतिवृष्टीमुळे शहरात शिरू नये, यासाठी नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सोबतच नाले स्वच्छतेलाही सुरुवात करण्यात आली होती. बहुसंख्य नाले हे वस्त्यांना लागून असल्याने व नाल्यांचे पात्र अरुंद असल्याने तासाभराच्या पावसातही ते तुडुंब भरून वाहतात. वस्त्यात पाणी शिरण्याचा धोका असतो. यामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण होते. अनेक वस्त्यांमधील नाल्यांच्या चेम्बरमधून सिवर लाईन जोडल्यामुळे नाले दुथडी भरून वाहतात. यामुळे नाल्यांसोबत चेम्बरचीही स्वच्छता करण्यात येते. शहरात एकूण १६ हजार ३३८ चेम्बर्स आहेत. त्यापैकी १५ हजार ९६६ चेम्बर्सची स्वच्छता झाली आहे. अद्याप १७७ चेम्बर्सची स्वच्छता शिल्लक आहे.
नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळ व यंत्र या दोन्ही माध्यमातून करण्यात आली. अरुंद नाल्यांची स्वच्छता महापालिके च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली. तर मोठ्या नाल्यांची स्वच्छता छोटे पोकलॅण्ड उतरवून करण्यात आली. नाल्यांतील पाणी शहरातील तीनही नद्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नद्यांसोबतच नाल्यांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी महत्त्वाची ठरते. तीन वर्षांपूर्वी शहरातील दोन झोनमध्ये नाल्यात काही जण वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

झोननिहाय नाल्यांची संख्या
लक्ष्मीनगर २२
धरमपेठ ३५
हनुमाननगर १४
धंतोली १८
नेहरूनगर १५
गांधीबाग ५१
सतरंजीपुरा २२
लकडगंज १५
आसीनगर १८
मंगळवारी २९
एकूण २३९

 

 

Web Title: Cleanliness of 239 drains in Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.