कोळशाच्या ओव्हरलोड ट्रकने विद्यार्थ्यास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 07:44 PM2019-01-14T19:44:16+5:302019-01-14T19:47:01+5:30

सायकलने शाळेत जात असतानाच कोळशाने ओव्हरलोड असलेल्या ट्रकने विद्यार्थ्यास चिरडले. हृदय हेलावून टाकणारा हा अपघात सोमवारी (दि.१४) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकात झालेल्या या अपघातातील मृत विद्यार्थ्याचे नाव प्रणव संजय ठुसे (१२, रा. कुंभारी, ता. उमरेड) असे आहे. प्रणव उमरेडच्या संस्कार विद्यासागरचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी होता. एमएच-३४/एव्ही-२३५९ या क्रमांकाचा ट्रक गोकुल खदान येथून नागपूरच्या दिशेने जात होता. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताचे वृत्त पसरताच घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती.

Charcoal overloaded truck crushed student | कोळशाच्या ओव्हरलोड ट्रकने विद्यार्थ्यास चिरडले

कोळशाच्या ओव्हरलोड ट्रकने विद्यार्थ्यास चिरडले

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या बायपास चौकातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (उमरेड) : सायकलने शाळेत जात असतानाच कोळशाने ओव्हरलोड असलेल्या ट्रकने विद्यार्थ्यास चिरडले. हृदय हेलावून टाकणारा हा अपघात सोमवारी (दि.१४) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकात झालेल्या या अपघातातील मृत विद्यार्थ्याचे नाव प्रणव संजय ठुसे (१२, रा. कुंभारी, ता. उमरेड) असे आहे. प्रणव उमरेडच्या संस्कार विद्यासागरचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी होता. एमएच-३४/एव्ही-२३५९ या क्रमांकाचा ट्रक गोकुल खदान येथून नागपूरच्या दिशेने जात होता. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताचे वृत्त पसरताच घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती.
मूळ कुंभारी येथील रहिवासी असलेले ठुसे कुटुंबीय आंबेडकर कॉलनी, शिवनगर येथे वर्षभरापासून किरायाच्या खोलीत वास्तव्य करीत होते. नेहमीप्रमाणे प्रणव सायकलने शाळेत जाण्यासाठी निघाला. आंबेडकर कॉलनी येथून बायपास चौक ओलांडूनच शाळेच्या दिशेने पुढे जावे लागते. प्रणव आपल्या मित्रांसोबत सायकलने जात असताना अचानक ट्रकची धडक लागली. तो सायकलसह खाली कोसळला. चाकाखाली आला. यात प्रणव जागीच ठार झाला. प्रणवच्या हात आणि पायावरून ट्रकचे चाक गेले. खाली कोसळला. यामुळे त्याच्या डोक्यालाही जबर मार बसला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला लागलीच घटनास्थळावरून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी तपासणीअंती प्रणवला मृत घोषित करण्यात आले. २७९, ३०४ अ, भादंवि सहकलम १८४, मोटर वाहन कायदा अन्वये उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक संग्रामसिंग चव्हाण करीत आहेत.
मृत प्रणवचे वडील संजय ठुसे हे पवनी परिसरातील वलनी येथे विद्युत विभागात कर्तव्यावर आहेत. तत्पूर्वी ते पुणे येथे कार्यरत होते. मागील वर्षी वलनी येथे बदली झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबीय उमरेड येथे वास्तव्य करू लागले. मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि लगतच असलेल्या कुंभारी येथील गावच्या शेतीकडेही लक्ष देता येईल, याउद्देशाने हे कुटुंबीय आंबेडकर ले-आऊट येथे किरायाच्या खोलीत राहत होते. अशातच या अपघातात प्रणवचा जीव गेल्याने संपूर्ण कुटुंबीयांवर आभाळच कोसळले.
‘ते’ थोडक्यात बचावले
प्रणवसोबत त्याचे अन्य चार मित्रदेखील सायकलने शाळेत जात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून भरधाव वेगाने ट्रक डाव्या बाजूने नागपूरच्या दिशेकडे वळत असतानाच प्रणवचे अन्य मित्र तातडीने पुढे निघाले. प्रणव मात्र ट्रकच्या चाकातच सापडला. अन्य मित्र भीतीने थबकले असते तर खूपच भयंकर चित्र समोर आले असते, असेही बोलल्या जात आहे. प्रणवच्या अपघातानंतर घटनास्थळी अनेकांनी आपला संताप व्यक्त केला.
शाळेत गेला कशाला?
प्रणव मरण पावल्याची बाब त्याच्या आईच्या कानावर पडताच त्या तातडीने ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्या. अगदी काही क्षणापूर्वी ‘आई मी जातो’ असे म्हणत जाणारा प्रणव रक्तबंबाळ अवस्थेत बेडवर मृतावस्थेत पाहून ती खालीच कोसळली. ‘तू शाळेत गेला कशाला’ असे म्हणत ती धाय मोकलून रडू लागली. तिच्या शेजारीच शाळेतील शिक्षिकांनी प्रणवच्या आईस सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिक्षिकांसह सारेच गलबलून गेले.

Web Title: Charcoal overloaded truck crushed student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.