केंद्रीय कर्मचाऱ्याची नागपूरच्या जिल्हा न्यायालयासमोर हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:46 PM2018-01-01T19:46:05+5:302018-01-01T19:48:24+5:30

सीजीओ कॉम्प्लेक्समधील एका कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याची अज्ञात आरोपीने न्यायालयाच्या समोर हत्या केली. मावळत्या वर्षाच्या शेवटच्या रात्री ९.३० वाजता ही थरारक घटना घडली.

Central employee's murder in front of District Court of Nagpur | केंद्रीय कर्मचाऱ्याची नागपूरच्या जिल्हा न्यायालयासमोर हत्या

केंद्रीय कर्मचाऱ्याची नागपूरच्या जिल्हा न्यायालयासमोर हत्या

Next
ठळक मुद्देघातक शस्त्राचे घाव : मारेकरी अज्ञात : सीताबर्डीत गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमत
नागपूर : सीजीओ कॉम्प्लेक्समधील एका कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याची अज्ञात आरोपीने न्यायालयाच्या समोर हत्या केली. मावळत्या वर्षाच्या शेवटच्या रात्री ९.३० वाजता ही थरारक घटना घडली. प्रेमलाल मोहनलाल देसाई (वय ५०) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स भागात राहत होते.
देसाई हे भारतीय मानव विज्ञान सर्व्हेक्षण विभागात कार्यरत होते. ते तीन वर्षांपासून कार्यालयात रात्रपाळी करीत होते. दुपारी ४ ते ४.३० वाजता ते घराबाहेर पडायचे. मित्राच्या पानटपरीवर गप्पागोष्टी केल्यानंतर सायंकाळी ते ग्रंथालयात येऊन पेपर वाचायचे. तेथून दैनंदिन वापराचे साहित्य घेतल्यानंतर ते घरी जायचे आणि नंतर आपल्या कर्तव्यावर रात्री १० ते १०.३० वाजता रुजू व्हायचे. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री ते ग्रंथालयातून सायकलने आपल्या सेमिनरी हिल्स भागातील घराकडे निघाले होते. ९.३० वाजता आकाशवाणी चौक ओलांडताच हल्लेखोराने देसाई यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. सायकलवरून खाली पडल्यानंतर ते जीवाच्या धाकाने ‘वाचवा वाचवा म्हणत’ जिल्हा न्यायालयाच्या सुयोग इमारतीत शिरले. त्यांचा आवाज ऐकून आतमध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी धावले तेव्हा न्यायालयाच्या इमारतीच्या पायरीवर त्यांना देसाई रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसले. त्यांच्या पाठ आणि हातावरील घावातून मोठा रक्तस्राव होत होता. पोलीस कर्मचारी समीर दिलीपराव वाघ (वय ३१, प्रभातनगर, नरसाळा) यांनी नियंत्रण कक्ष तसेच सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार हेमंत खराबे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. पोलिसांनी देसाई यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना पहाटे २ च्या सुमारास मृत घोषित केले.
परिसरात अंधार
मावळत्या वर्षाच्या सकाळी सक्करदऱ्यात आणि रात्री सीताबर्डी पोलिसांच्या हद्दीत त्यातल्या त्यात न्यायालयासमोर हत्येची घटना घडल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी चौकातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून देसाई यांची हत्या करणारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरात अंधार असल्यामुळे मारेकऱ्याचे चित्र किंवा तो कशावर, कुणासोबत होता, कुठून आला, कुठे पळाला त्याबाबत कसलीही माहिती पोलिसांना मिळाली नाही.
हत्येचे कारण अंधारात
देसाई यांच्या कुटुंबात पत्नी, दोन तरुण मुले आणि दोन मुली आहेत. ते शांत स्वभावाचे होते. कुणासोबत त्यांचा वाद नव्हता. त्यामुळे त्यांची हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जेव्हा मारेकऱ्यांनी देसाई यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या खिशात पाच ते सात हजार रुपये होते. ती रक्कमही देसाई यांच्याकडे जशीच्या तशीच होती. मोबाईलही होता. मारेकऱ्याने रक्कम, मोबाईलला हात लावला नाही. त्यामुळे देसाई यांची हत्या कोणत्या कारणामुळे झाली, ते कळायला मार्ग नाही.

 

Web Title: Central employee's murder in front of District Court of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.