बुद्धांचा शांतीचा संदेशच सर्व जगासाठी मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 08:02 PM2018-05-19T20:02:02+5:302018-05-19T20:02:44+5:30

तथागत गौतम बुद्ध यांच्या शांती व अहिंसा या मार्गाचाच सर्व जगाने स्वीकार केला असून, त्यांचा विश्वशांतीचा संदेश हा जगासाठी मार्गदर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.

Buddha peace message guide for all the world | बुद्धांचा शांतीचा संदेशच सर्व जगासाठी मार्गदर्शक

बुद्धांचा शांतीचा संदेशच सर्व जगासाठी मार्गदर्शक

Next
ठळक मुद्देरामदास आठवले : आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेला सुरुवातदेश-विदेशातील प्रतिनिधींची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तथागत गौतम बुद्ध यांच्या शांती व अहिंसा या मार्गाचाच सर्व जगाने स्वीकार केला असून, त्यांचा विश्वशांतीचा संदेश हा जगासाठी मार्गदर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.
महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था (बार्टी) व समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वैशाख दिन (बौद्ध पौर्णिमानिमित्त) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित दोन दिवसीय ‘आंतरराष्ट्रीय शांती व समता’ परिषदेचे शनिवारी थाटात उद्घाटन पार पडले. उद्घाटन सत्राप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले, पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर, रामटेकचे खा. कृपाल तुमाने, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. डॉ. मिलिंद माने, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, शिक्षण तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ कराड, गिरीश गांधी, माजी कुलगुरू एस. एन. पठाण, अब्दुल फलाही, आचार्य लोकेश मुनी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, थायलंड, भूतान, फिलिपाईन्स, लडाख तसेच लंडन येथील भंते व विद्वान उपस्थित होते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सर्वांचे स्वागत करण्यात आले.
नागपूर ही ऐतिहासिक भूमी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी पवित्र दीक्षाभूमीत बौद्ध धमाची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांना दिली. देश-विदेशातील बुद्धिस्ट विचारवंत तसेच शांततेचा पुरस्कार करणारे सर्वधर्मीय धर्मगुरू, तत्त्ववेत्ते या नागपूर नगरीमध्ये आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेच्या माध्यमातून एकत्र आले, ही बाब अभिमानास्पद असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. महादेव जानकर, खा. कृपाल तुमाने, विश्वनाथ कराड, आचार्य लोकेश मुनी, सुलेखा कुंभारे यांनीही विचार व्यक्त केले.
बुद्धांच्या तत्त्वज्ञानाच्या अनुसरणाने जगभर प्रज्ञा, शील व करुणा यांचा संदेश पोहचेल, अशी आशा प्रास्ताविकपर भाषणात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली. संचालन शैलजा शेलगावकर व धर्मेश धवनकर यांनी केले. सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी आभार मानले.

मुख्यमंत्र्यांनी साधला
‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंंग’द्वारे संवाद

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी नागपूर शहराची निवड केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. जगात अराजकता व अशांततेचे वातावरण असताना बुद्धाच्या धम्मक्रांतीने प्रस्थापित झालेली शांती व समता या परिषदेद्वारे जगभर पसरेल, असे आपल्या संदेशात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आठवलेंच्या भाषणप्रसंगी नारेबाजी
या परिषदेबाबत काही आंबेडकरी संघटनांनी आक्षेप घेतला होता. ही परिषद भाजपा-व आरएसएसप्रणीत असल्याने त्याला आमचा विरोध असल्याचे पत्रही विभागाला पाठवले होते. त्याचे पडसाद उद्घाटनप्रसंगी दिसून आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे भाषणासाठी उभे राहताच नाटककार व आंबेडकरी कार्यकर्ते संजय जीवने आणि काही कार्यकर्ते उठून उभे झाले आणि त्यांनी नारेबाजी करायला सुरुवात केली. ही परिषद भाजपा-आरएसएसप्रणीत असल्याने त्याचा निषेध असो. आठवले मुर्दाबाद असे नारे दिले. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना पकडून बाहेर नेले. ‘मुर्दाबाद करणारे जसे असतात तसे जिंदाबाद करणारेही आहेतच, आपण विरोध करा मी पुढे जातो, असे सांगत आठवले यांनी आपल्या शैलीत विरोध करणाऱ्यांची फिरकी घेतली; नंतर आठवले यांचे भाषण सुरळीत पार पडल्यानंतर भंते ज्ञानज्योती यांनी माईकवर येऊन परिषदेबाबत निषेध व्यक्त केला. या विरोधामुळेच डॉ. सुखदेवराव थोरातही कार्यक्रमाला आले नाहीत. 

 

Web Title: Buddha peace message guide for all the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.