बसपा बांधणार पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मोट; मायावती उद्या नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 08:34 PM2017-12-08T20:34:25+5:302017-12-08T20:34:44+5:30

देशभरात कार्यकर्त्यांचे जाहीर मेळावे आयोजित करून मायावती संवाद साधत आहे. १० डिसेंबर रोजी त्या नागपुरात कस्तुरचंद पार्कवर कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणार आहेत.

BSP workers gather once again; Tomorrow Mayawati in Nagpur | बसपा बांधणार पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मोट; मायावती उद्या नागपुरात

बसपा बांधणार पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मोट; मायावती उद्या नागपुरात

Next
ठळक मुद्देकस्तुरचंद पार्कवर जाहीर मेळावा

आॅनलाईन लोकमत
नागपूर : बसपा हा मुळातच कॅडरबेस कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. परंतु गेल्या काही वर्षात या कॅडरकडेच बसपाचे दुर्लक्ष होत गेले. त्याचा फटका बसपाला उत्तर प्रदेशासह एकूणच देशात बसला आहे. अशा कॅडरबेस कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने देशभरात बसपाचा जनाधार ढासळत चालला आहे. हा जनाधार पुन्हा कायम ठेवण्यासाठी मायावती यांनी कॅडरबेस कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बांधणीवर पुन्हा एकदा भर दिला आहे. या अंतर्गत देशभरात कार्यकर्त्यांचे जाहीर मेळावे आयोजित करून मायावती संवाद साधत आहे. १० डिसेंबर रोजी त्या नागपुरात कस्तुरचंद पार्कवर कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणार आहेत.
बसपाने कॅडरबेस कार्यकर्त्यांच्या भरवशावरच उत्तर प्रदेशात चारवेळा सत्ता स्थापन केली. सत्तेत नसतानाही बसपा उत्तर प्रदेशातील एक प्रमुख पक्ष राहिला आहे. परंतु गेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. अशीच परिस्थिती देशातील इतर राज्यांमध्येसुद्धा झाली. महाराष्ट्राचा विचार करता बसपाचा मुख्य जनाधार हा विदर्भ राहिलेला आहे. यातही आंबेडकरी समाज हा बसपाचा मुख्य मतदार राहिला आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून बसपाच्या कॅडरबेस कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने बसपाचा हा जनाधार काहीसा कमी झाला आहे. यातच महाराष्ट्रात सुरेश मानेसारख्या ज्येष्ठ नेत्याला बसपातून बाहेर काढण्यात आले. त्यांनी स्वतंत्र बीआरएसपी पक्ष स्थापन केला. तेव्हा बसपाचे अनेक नेते व कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेले. इतकेच नव्हे तर बसपा राबवित असलेले कार्यक्रम बीआरएसपी मोठ्या प्रमाणात राबवित असून एक वेगळेच आव्हान निर्माण केले आहे. नागपूरचा विचार केला असता गेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बसपाचे १२ नगरसेवक निवडून आले होते. त्यांची संख्या आता १० वर आली आहे. या सर्वांचाच एकूण विचार करता महाराष्ट्रातील मुख्य जनाधारही कमी होऊ लागल्याने बसपा चिंतेत आहे.
त्यामुळे बसपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आत्ताच सुरू केली आहे. मायावती या देशभरात जाहीर सभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहे. तीन राज्य मिळून एक सभा असा त्यांचा कार्यक्रम आहे. येत्या १० डिसेंबर रोजी नागपुरातही जाहीर सभा होत आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या २०० व्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ हा कार्यकर्ता मेळावा बसपाने आयोजित केला आहे. येथून मायावती पुन्हा आपला जनाधार आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या या सभेबाबत कार्यकर्त्यांमध्येही बरीच उत्सुकता आहे.

भीम आर्मी व जिग्नेश मेवानीचाही परिणाम
उत्तर प्रदेशात चंद्रशेखर रावणच्या भीम आर्मी आणि गुजरातमध्ये जिग्नेश मेवानी यांनी दलितांवरील अत्याचारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारले. या आंदोलनाला दलित समाजात विशेषत: तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दलित समाजात हे नवीन नेतृत्व निर्माण झाल्यामुळे दलित समाज बसपापासून दुरावणार तर नाही ना? अशी भीतीही मायावती यांना वाटू लगली आहे. त्यामुळेसुद्धा त्या पुन्हा एकदा कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत असल्याचे सांगितले जाते.

Web Title: BSP workers gather once again; Tomorrow Mayawati in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.