Bribe taker Mithari, Rathore suspended: Sensation in excise department | लाचखोर मिठारी, राठोड निलंबित : उत्पादन शुल्क विभागाला हादरा
लाचखोर मिठारी, राठोड निलंबित : उत्पादन शुल्क विभागाला हादरा

ठळक मुद्देनिलंबनाचे आदेश जारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर कार्यालयातील लाचखोर निरीक्षक संजय श्रीधर मिठारी तसेच शिपाई बालाजी उत्तम राठोड या दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले. हिंगण्यातील एका बार व्यवस्थापकाला दर महिन्याला चार हजार रुपये लाच मागितली होती. तीन महिन्यांपासून बारची तपासणी केली नाही म्हणून एकूण १२ हजार रुपये लाच द्यावी लागेल अन्यथा चालान कारवाई करेन, असे म्हणून मिठारी तसेच राठोडने बारच्या व्यवस्थापकाला धमकावले होते. बार व्यवस्थापकाने सरळ एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. त्यावरून एसीबीचे अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि उपअधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला. ठरल्याप्रमाणे २ फेब्रुवारीला मिठारी आणि राठोडला १२ हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांना पाठविण्यात आला होता. त्यावरून निरीक्षक संजय श्रीधर मिठारी तसेच शिपाई बालाजी उत्तम राठोड या दोन लाचखोरांना निलंबित करण्याचा आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांनी सोमवारी जारी केला. मंगळवारी या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. अवैध दारू विक्री आणि दारू तस्करीला मूकसंमती देणाऱ्या अधिकारी- कर्मचाºयांना या कारवाईमुळे जबर हादरा बसला आहे. सोबतच या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीकडेही लक्ष वेधले गेले आहे.


Web Title: Bribe taker Mithari, Rathore suspended: Sensation in excise department
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.