ब्रह्मोस हेरगिरी प्रकरण: आयएसआय हेर अखेर लखनौला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:10 AM2018-10-11T10:10:17+5:302018-10-11T10:10:59+5:30

विमान प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे हेरगिरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या निशांत अग्रवालला लखनौला नेण्यासाठी तब्बल एक दिवस उशीर झाला. अखेर बुधवारी परवानगी मिळाली.

Brahmos espionage case: ISI spy finally leaves for Lucknow | ब्रह्मोस हेरगिरी प्रकरण: आयएसआय हेर अखेर लखनौला रवाना

ब्रह्मोस हेरगिरी प्रकरण: आयएसआय हेर अखेर लखनौला रवाना

Next
ठळक मुद्देहवाई प्रवासाची परवानगी मिळण्यास विलंब

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमान प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे हेरगिरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या निशांत अग्रवालला लखनौला नेण्यासाठी तब्बल एक दिवस उशीर झाला. अखेर बुधवारी परवानगी मिळाली. त्यामुळे २४ तास विलंबाने, बुधवारी सायंकाळच्या विमानाने निशांतला लखनौला नेण्यात आले.
सोमवारी भल्या सकाळी मिलिटरी इंटेलिजन्स आणि उतर प्रदेश एटीएसच्या पथकाने निशांत अग्रवालला अटक केली. त्याची दिवस-रात्र कसून चौकशी केल्यानंतर मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. एटीएसच्या पथकाने त्याचा तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मागितला. त्यामागची पार्श्वभूमीदेखील एटीएसच्या तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. तो शत्रूराष्ट्रासाठी हेरगिरी करीत असल्याचा संशय असल्याने निशांतला विमानाने न्यायचे, रेल्वेने की रस्त्याने (वाहनाने) न्यायचे ते ठरले नाही. सुरक्षेची पुरती खबरदारी घेण्यात वेळ जाऊ शकतो,असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड न्यायालयाने मंजूर केला. त्यानंतर निशांतला स्पेशल कस्टडीत ठेवण्यात आले.
वाहनाने नेल्यास त्याचे अपहरण करण्याचा, हल्ला होण्याचा किंवा अन्य दुसरा धोका होऊ शकतो. दीर्घ पल्ल्याचे अंतर असल्याने पोहोचण्यासही उशीर होऊ शकतो. रेल्वेने नेल्यास बाथरूमच्या वेळी वगैरे तो उडी घेऊ शकतो. त्यामुळे त्याला विमानाने लखनौला नेण्याचे ठरविण्यात आले. मात्र, अशा प्रकरणातील आरोपीला हवाईमार्गे नेण्यासाठी विमान प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. ती ताबडतोब मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी त्याला नागपुरातून लखनौला विमानाने नेणे शक्य झाले नाही. त्यानंतर आज सकाळपासून सुरक्षा यंत्रणांनी निशांत अग्रवाल तसेच तपास पथकातील अधिकाऱ्यांच्या विमान प्रवासाला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुपारपर्यंत आवश्यक ती सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आली. ‘हाय सिक्युरिटी अ‍ॅन्ड व्हेरी स्पेशल केस’ म्हणून तातडीने विमान प्रवासाची परवानगी मिळावी, असे प्रयत्न झाले. दरम्यान, मंगळवार ते बुधवार सायंकाळपर्यंतचे २४ तास नागपूर, मुंबई आणि दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा आणि विमान प्राधिकरणाचे अधिकारी निरंतर एकमेकांच्या संपर्कात होते.
त्याला यश आले. विमानतळ प्राधिकरणाकडून परवानगी मिळाली. त्यानुसार, सायंकाळी ५.३० वाजता त्याला तपास अधिकारी नागपूरच्या विमानतळावर घेऊन पोहचले. एटीएस तसेच विमानतळावरील सुरक्षा पथकाच्या गराड्यात त्याला विमानात बसविण्यात आले आणि दिल्लीमार्गे लखनौला नेण्यात आले.

डील या नो डील ?
निशांतला ३० ते ३८ हजार यूएस डॉलर्सच्या पॅकेजचे आमिष दाखवून फितुरी करण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, कोणतीही रक्कम त्याच्या नागपुरातील बँक खात्यात जमा झाल्याचे जाणवत नसल्याचे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे. तपास अधिकाऱ्यांनी निशाांत आणि त्याच्याशी संबंधित सर्वांचे बँक खाते आणि त्यातील व्यवहार तपासले. त्यातून बँक खात्यात पगाराव्यतिरिक्त कोणतीही मोठी रक्कम अथवा दुसरा व्यवहार झाला नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी लोकमतला दिली आहे. त्यामुळे नागपुरातून ब्रह्मोसची हेरगिरी करणाऱ्या निशांतचे प्रत्यक्षात नागपुरात डील झाले की नाही, ते उघड झालेले नाही.

Web Title: Brahmos espionage case: ISI spy finally leaves for Lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.