ठळक मुद्देसायबर तज्ज्ञांचे मत : आत्महत्या केलेल्यांकडून एकही पुरावा आढळला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘ब्ल्यू व्हेल गेम’ च्या परिणामांमुळे अख्खा देश ढवळून निघतो आहे. पालकांमध्ये चिंता वाढली आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. या खेळामुळे पसरत असलेल्या अफवांमुळे, नेमका हा गेम काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सायबर तज्ज्ञ उत्सुक आहे. इंटरनेटवर याचा शोध घेतला असता हा गेमच उपलब्ध नसल्याचे सायबर तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे हा गेम निव्वळ बागुलबुवा असल्याचे मत सायबर लिगल क न्सलटंट अ‍ॅड. महेंद्र लिमये यांचे आहे.
ब्ल्यू व्हेल गेमच्या दुष्परिणामांचा होत असलेला प्रसार लक्षात घेता, अ‍ॅड. लिमये यांच्याकडे पालकांकडून विचारणा व्हायला लागली आहे. पालकांनी चिंता व्यक्त केली आहे, आम्ही काय करायचे. भारतात या खेळामुळे पहिली आत्महत्या २३ जुलै २०१७ झाल्याची नोंद आहे. त्यानंतर ३ सप्टेंबरपर्यंत वेगवेगळ्या राज्यात ब्ल्यू व्हेल गेममुळे आत्महत्या झाल्याची नोंद आहे. मुंबईमध्ये एका १४ वर्षाच्या मुलाने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या ब्ल्यू व्हेल गेममुळे झाल्याची चर्चा पसरली. परंतु पोलिसांकडून त्याला दुजोरा मिळाला नाही. ब्ल्यू व्हेल गेमच्या दुष्परिणामामुळे सरकारसुद्धा सतर्क झाली आहे. मात्र याचे मूळच उपलब्ध नसल्याने, याची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही.
अ‍ॅड. लिमये यांनी ब्ल्यू व्हेल गेम डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेमची वेबसाईटच नसल्याने हा गेम डाऊनलोडच होत नाही. शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांकडे ब्ल्यू व्हेल गेमबद्दल माहिती मागितली. कुणाचकडे हा गेम उपलब्ध नाही. उलट विद्यार्थ्यांना या गेमबद्दल उत्सुकता दिसून आली. मुळात ज्या आत्महत्या झाल्या त्यातूनही या गेमसंदर्भात कुठलीही लिंक मिळाली नाही. हा गेम असेल तर त्याचा अ‍ॅडमिनिस्टेटर सरकारने शोधला पाहिजे. या गेमची कुठे लिंक नाही, इंटरनेटवर उपलब्ध नाही. याचाच अर्थ हा प्रकार निव्वळ भीती दाखविण्याचा आहे.
इंटरनेट अ‍ॅडिक्शनची भीती
मुलांमध्ये इंटरनेटचे प्रचंड आकर्षण आहे. मुलांसाठी हे प्रचंड भीतीदायक आहे. त्यासाठी पालकांनी सतर्क राहायला हवे. ब्ल्यू व्हेल गेममुळे मुलांनी आत्महत्या केली. परंतु या गेमचे ५० टास्क आहे. शेवटचा टास्क आत्महत्येचा आहे. या दरम्यान पालकांना काहीतरी लक्षात तर येऊ शकते. खरेतर पालकांनी मुलांना इंटरनेट उपलब्ध करून देताना, मुले खरंच त्यातून आपल्या अभ्यासाचा शोध घेतात की, अन्य काही याकडे लक्ष ठेवले पाहिजे, असे अ‍ॅड. लिमये म्हणाले.
२३ सप्टेंबरला पालकांसाठी सेमिनार
ब्ल्यू व्हेल गेमची दहशत पालकांमध्ये पसरली आहे. यातून पालकांना बाहेर काढण्यासाठी पोलीस विभागाच्या मदतीने २३ सप्टेंबरला इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअर्सच्या सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता यासंदर्भात सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.