नागपुरात १ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या लॉटरी व्यवसायिकाच्या मुलाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:44 AM2017-11-23T00:44:58+5:302017-11-23T00:57:49+5:30

एक कोटी रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या लॉटरी व्यापारी सुरेश आग्रेकर यांचा मुलगा राहुलचा बुटीबोरी येथे निर्घृण खून करण्यात आला. अपहरणकर्त्यांनी पाच तासाच्या आतच त्याचा खून केला.

The bloodless murder of a son of a lottery businessman kidnapped for ransom worth Rs 1 crore in Nagpur | नागपुरात १ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या लॉटरी व्यवसायिकाच्या मुलाचा निर्घृण खून

नागपुरात १ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या लॉटरी व्यवसायिकाच्या मुलाचा निर्घृण खून

Next
ठळक मुद्देबुटीबोरीमध्ये आढळला अर्धवट जळालेला मृतदेहगळ्यातील लॉकेटवरून पटली ओळखअपहरणकर्ते बेपत्ता : व्यापारी जगतात असंतोष

ऑनलाईन लोकमत
नागपूर : एक कोटी रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या लॉटरी व्यापारी सुरेश आग्रेकर यांचा मुलगा राहुलचा बुटीबोरी येथे निर्घृण खून करण्यात आला. अपहरणकर्त्यांनी पाच तासाच्या आतच त्याचा खून केला. यानंतर ओळख लपविण्यासाठी मृतदेहाला आग लावली. बुधवारी दुपारी मृतदेहाजवळ सापडलेला पर्स, चाव्याचा गुच्छा, गळ्यातील लॉकेट आणि ब्रँडेड जीन्सच्या आधारावर मृतदेह राहुलचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु राहुलच्या कुटुंबीयांना ते मान्य झाले नही. त्यांचे म्हणणे होते की, वस्तू राहुलच्या आहेत मात्र त्याची शरीररचना राहुलसारखी नाही. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी राहुलच्या घरी गेले. त्याच्या कुटुंबीयांसोबत प्रदीर्घ चर्चा केली. यानंतर रात्री उशिरा कुटुंबीयांनी मृतदेह राहुलचाच असल्याचे मान्य केले.
मंगळवारी सकाळी सेंट्रल एव्हेन्यू येथील दरोडकर चौकातून ३२ वर्षीय राहुलचे अपहरण करण्यात आले होते. राहुल सकाळी ८.३० वाजता एक ते दीड तासात परत येतो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. तो घरून पायीच निघाला होता. काही दूर अंतरावर दारोडकर चौकात दुर्गेश आणि पंकज बोलेरो गाडीत त्याची वाट पाहत होते. राहुल त्यांच्यासोबत गाडीत बसून रवाना झाला होता. सकाळी ११.३० वाजता त्याने पत्नी अर्पिताला फोन करून तो एक ते दीड तासात परत येईल, असे सांगितले होते. दुपारी २.०८ वाजता राहुलच्या मोबाईलवरून त्याचा मोठा भाऊ जयेश यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी फोन आला. तेव्हा राहुलचे अपहरण झाल्याचे कुटुंबीयांना माहिती झाले. खंडणीसाठी फोन आल्यापासूनच राहुलचे कुटुंबीय घाबरून गेले. त्यांनी दुपारी ४ वाजता लकडगंज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. दरम्यान त्यांना राहुलच्या मोबाईलवरून पुन्हा खंडणीसाठी फोन आला. लकडगंज पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. रात्री ७ वाजता अपहरणकर्त्यांनी तिसºयांदा फोन केला होता. त्यांनी एक कोटी रुपये घेऊन कोराडीतील जगदंबा मंदिराजवळ येण्यास सांगितले होते. रात्री ११ वाजता पुन्हा फोन करू असे सांगून मोबाईल बंद केला होता. तेव्हापासून राहुलचा मोबाईल ‘स्विच आॅफ’ येत होता.
दरम्यान दुपारी ४ वाजता बुटीबोरी येथील पेटचुहा येथील रामा डॅमजवळ एका युवकाचा मृतदेह आढळला. रस्त्याने जात असलेल्या मजुरांनी जळत असलेला मृतदेह पाहून बुटीबोरी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह मेडिकलला पाठवला होता. पोलिसांना इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिलन्सद्वारे पंकज, आरोपी दुर्गेश आणि प्रशांत हे दुपारी जवळपास २.१५ वाजता बुटीबोरीमध्ये असल्याची माहिती मिळाली. या आधारावर शहर पोलिसांनी बुटीबोरी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर राहुलचे मित्र व कुटुंबीयांना मृतदेह व सापडलेल्या वस्तू दाखवल्या.

बोलेरोची बदलली ‘नंबर प्लेट’

अपहरणकर्त्यांनी पोलिसांना चकमा देण्यासाठी बोलेरोची नंबर प्लेट बदलविली होती. पंकजच्या वडिलांच्या बोलेरो क्रमांक एमएच ४९ बी/७७४४ या गाडीने राहुलचे अपहरण करण्यात आले होते. त्याचा खून केल्यानंतर आरोपी सावनेरमार्गे मध्य प्रदेशात फरार झाले होते. तेथे त्यांनी बोलेरो एका व्यक्तीच्या हवाली केली होती. तो व्यक्ती नागपूरला पोहोचल्याचे माहीत होताच रात्री उशिरा पोलिसांनी यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीतून ती बोलेरो गाडी जप्त केली. परंतु गाडीची नंबर प्लेट बदललेली होती.

व्यापारी जगतात तीव्र रोष
राहुल आग्रेकरच्या हत्येमुळे शहरातील व्यापारी जगतात आणि सामाजिक क्षेत्रातही तीव्र रोष पसरला आहे. या घटनेमुळे शहर पोलिसांच्या प्रतिमेवर पुन्हा एक कलंक लागला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, गुन्हेगार निरंकुश झाले आहेत. खंडणीसाठी ते श्रीमंत व्यक्तींचे अपहरण करून खूनसुद्धा करीत आहेत. हिवाळी अधिवेशन सुरू व्हायला १५ दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वीच शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे पितळ उघडे पडले आहे.

ओळखच ठरली मृत्यूचे कारण
ओळखीच्या व्यक्तीद्वारा अपहरण केल्यावर अशाच प्रकारचा शेवट होत असल्याचे दिसून येते. शहरात घडलेल्या कुश कटारिया आणि युग चांडकनंतर राहुल आग्रेकर प्रकरणात तेच घडले. असा संशय आहे की दुर्गेश व पंकजच्या प्लॅनमध्ये राहुलचा खून करण्याचे आधीच ठरले होते. त्यामुळेच त्यांनी त्याला बुटीबोरी येथे नेऊन त्याचा खून केला. यानंतर त्याच्या कुटुंबीयांना खंडणी मागितली. युग चांडक आणि कुश कटारिया प्रकरणातही खून केल्यानंतरच खंडणी मागण्यात आली होती.

 

Web Title: The bloodless murder of a son of a lottery businessman kidnapped for ransom worth Rs 1 crore in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून