नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या भाजप आमदाराने केली पोलिसाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 02:19 PM2018-03-05T14:19:37+5:302018-03-05T14:19:51+5:30

कारचे निघालेले टायर आमदाराच्या वाहनाला लागल्याच्या क्षुल्लक कारणातून उमरेडचे भाजप आमदार व पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांनी पोलिसाला मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

BJP MLA from Umred attacks police in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या भाजप आमदाराने केली पोलिसाला मारहाण

नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या भाजप आमदाराने केली पोलिसाला मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देक्षुल्लक कारणातून वाद दोघांचीही एकमेकांविरोधात उमरेडमध्ये तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारचे निघालेले टायर आमदाराच्या वाहनाला लागल्याच्या क्षुल्लक कारणातून उमरेडचे भाजप आमदार व पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांनी पोलिसाला मारहाण केली. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गिरड - मांगरुड रोडवर रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांनीही एकमेकांविरोधात उमरेड पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या. मात्र घटनेला १६ तासांचा अवधी लोटूनही अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
अनिल गरजे , रा. नागपूर असे मारहाण झालेल्या पोलिसाचे नाव असून ते नागपुरातील सदर पोलीस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक म्हणून कर्तव्यावर आहेत. रविवारी ते पत्नीसह त्यांच्या कारने गिरड देवस्थान येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असताना मांगरुड रोडवर त्यांची कार पंक्चर झाली. त्यामुळे ते चाक काढून दुरुस्तीसाठी घेऊन जात होते. तेवढ्यात आमदार पारवे यांची कार आली. आमदार पारवे यांच्या कारने टायरला धक्का दिला. त्यामुळे आ. पारवे हे संतप्त होऊन वाहनातून उतरले आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल गरजे यांना शिवीगाळ करीत मारहाण करायला सुरुवात केली. आ. पारवे यांच्यासोबत असलेल्या दोघा-तिघांनीही पोलिसाला मारहाण केली. बराच वेळपर्यंत हा प्रकार चालला. त्यात पोलिसाचे कपडेही फाटले.
याबाबत रविवारी रात्रीच अनिल गरजे यांनी उमरेड पोलीस ठाणे गाठले. शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी संजीवनी यांनी याबाबत उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तर दुसरीकडे आमदार पारवे यांनीही उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र घटनेला १६ तासांचा अवधी लोटूनही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे प्रकरण दडपले तर जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पारवे यांनी केली होती शिक्षकाला मारहाण
आ. सुधीर पारवे यांनी मारहाण करण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही त्यांनी मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्या प्रकरणात त्यांची आमदारकी का रद्द करण्यात येऊ नये, असा सवाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उपस्थित केला होता. जिल्हा परिषद सदस्य असताना सुधीर पारवे यांनी मांडवा येथील शिक्षक धारगावे यांना मारहाण केली होती. ते प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. त्यात आमदारकी रद्द करण्यापर्यंतचे पाऊल उचलण्यात आले होते. मात्र फिर्यादीनेच या प्रकरणात माघार घेतल्याने प्रकरण निवळले. आता हे पोलिसाला मारहाण केल्याचे प्रकरण पुढे आले. त्यामुळे नानाविध प्रश्नांना ऊत आले आहे.

Web Title: BJP MLA from Umred attacks police in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.