नागपूर जिल्ह्यातील भिवापूर नगर पंचायतीचा कारभार चालतो १२ बाय १५ च्या खोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:47 AM2018-01-12T10:47:47+5:302018-01-12T10:59:37+5:30

सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेल्या भिवापूरकरांची सर्वस्वी जबाबदारी सांभाळणाऱ्या नगर पंचायतचा संपूर्ण कारभार केवळ १२ बाय १५ च्या छोट्याशा खोलीतून चालतोय.

Bhivapur Nagar Panchayat is running in 12x15 room, in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील भिवापूर नगर पंचायतीचा कारभार चालतो १२ बाय १५ च्या खोलीत

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर नगर पंचायतीचा कारभार चालतो १२ बाय १५ च्या खोलीत

Next
ठळक मुद्देसोयीसुविधांचा बोजवारामनुष्यबळाअभावी कामेही कासवगतीनेच

शरद मिरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेल्या भिवापूरकरांची सर्वस्वी जबाबदारी सांभाळणाऱ्या नगर पंचायतचा संपूर्ण कारभार केवळ १२ बाय १५ च्या छोट्याशा खोलीतून चालतोय. हे ऐकून बुचकळ्यात पडू नका. कारण हे सत्य आहे. एकीकडे गावखेड्यातील ग्रामपंचायत कार्यालयदेखील सुसज्ज आहेत. परंतु भिवापूर नगर पंचायत मात्र प्रशस्त इमारतीपासून आजही वंचित आहे. एकावेळी खूप तर तीन टेबलवर तीन कर्मचारी बसू शकतील आणि दोन नागरिक उभे राहतील, मध्येच एखादे नगरसेवक वा अन्य कुणी आलेच तर आतील व्यक्ती बाहेर पडल्याशिवाय त्यांना आत प्रवेश नाही, असे चित्र नगर पंचायत कार्यालयात हमखास दृष्टीस पडते. अपुरी जागा आणि मनुष्यबळाचा अभाव यामुळे सोयीसुविधांचाही येथे बोजवारा उडाला आहे. त्यामुळे हे चित्र पालटणार केव्हा, हा प्रश्न आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तत्कालीन ग्रामपंचायतचा उल्लेख व्हायचा. गळती लागलेल्या इमारतीतून कारभार चालत असल्याच्या समस्येला ‘लोकमत’ने त्यावेळी वाचा फोडली. लोकमतच्या वृत्तानंतर भिवापूर ग्रामपंचायतला नवीन इमारत निधी मंजूर झाला आणि दुसरीकडे भिवापूर ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्यासंदर्भात घोषणाही झाली.
आता फावणार नाही, याची चाहूल लागताच तत्कालीन ग्रामपंचायतने कुठलाही विचार न करता, आहे त्याच अपुऱ्या जागेत नियोजनशून्य इमारतीचे बांधकाम सुरू केले. ‘तात्काळ इमारत बांधा, पैसे वाचवा अन् खिसे गरम करा’ असाच काहीसा एककलमी उपक्रम त्या निधीतून झाला.
दरम्यान, नव्या इमारतीतून नगरपंचायतचा कारभार सुरू झाला. या इमारतीत चार नगरसेवक बसतील अशा प्रकारचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षाचे केबिन, विविध प्रमाणपत्र देण्यासाठी एक खोली देण्यात आली. त्यात फक्त दोनच कर्मचारी बसू शकतात अशी व्यवस्था. सभागृह उपाध्यक्ष, विरोधी पक्षा नेता, तीन सभापतींसाठी ग्रामपंचायतच्या गळती लागलेल्या जुन्या इमारतीमध्ये व्यवस्था करण्यात आली.
या अपुऱ्या जागेमुळे नगर पंचायत कर्मचाऱ्यांनाही एकदा खुर्चीवर बसले की, ‘हलता-डोलता’ येत नाही. दुसरीकडे या विभागातून आधीच्या दोन व्यक्ती बाहेर पडल्या शिवाय तिसऱ्या व्यक्तीला आत जाण्याचा पर्याय नाही. त्यामुळेच या २५ हजार लोकसंख्येचा कारभार १२ बाय १५ च्या खोलीतून चालतोय, हे हास्यास्पद असले तरी मात्र सत्य आहे.

आम्हीही माणूसच..
शहरातील कर आकारणी आणि कर वसुली ही दोन्ही कामे कर विभागाला करावी लागतात. एक हजार मालमत्तेमागे एक कर्मचारी याप्रकारे नगर पंचायतमध्ये पाच कर्मचारी आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र एकमेव कर्मचारी येथे कार्यरत आहे. लेखा विभागातदेखील तीन कर्मचारी गरजेचे असताना येथेही एकच कर्मचारी आहे. आस्थापना विभागात किमान चार कर्मचाऱ्यांची गरज असताना तेथेही एक कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे कामे वेळेत होत नाही. अनेकदा नगरसेवकांसह नागरिकांच्या रोषाला या अपुऱ्या कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. वेळप्रसंगी नोकरीवरून काढण्याच्या धमक्या मिळतात. त्यामुळे आम्हीही माणूसचं आहोत, ‘मशीन’ नव्हे. एक कर्मचारी किती काम करणार, त्यालाही मर्यादा आहेत, अशी कैफियत कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

खोली एक; विभाग तीन
नगर पंचायतमध्ये कर, लेखा आणि आस्थापना हे तीन महत्त्वपूर्ण विभाग. तिन्ही विभागांसाठी स्वतंत्र खोल्या आणि कागदपत्रे ठेवण्याची वेगवेगळी व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र भिवापूर नगरपंचायतमध्ये सदर तिन्ही विभाग एकाच १२ बाय १५ च्या खोलीत आहेत. एकदा कर्मचारी खुर्चीवर आसनस्थ झाला की, परत बाहेर पडणे कठीणच. त्यातही कागदपत्रे ठेवण्यासाठी या प्रत्येक विभागाने स्वतंत्र व्यवस्था करतो म्हटले, तर कर्मचाऱ्यांना स्वत:च्या खुर्च्या बाहेर काढूनच व्यवस्था उभी करता येऊ शकते. कोट्यवधीच्या निधीतून ग्राम विकासाचे ध्येय जोपासणारी भिवापूर नगर पंचायत स्वत:च्या बाबतीत इतकी उदासीन का, असा सवालही जनमानसात विचारला जात आहे.

Web Title: Bhivapur Nagar Panchayat is running in 12x15 room, in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार