लाभार्थीच नाकारताहेत ‘जन आरोग्य’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:59 AM2019-05-17T10:59:47+5:302019-05-17T11:01:40+5:30

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा मंजूर निधी कमी पडल्याने व रुग्णाच्या नातेवाईकांकडून वरचे पैसे मागण्यावर आक्षेप घेतल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेविना एका युवकाचा मृत्यू झाला.

The beneficiaries are rejecting the 'Jan Arogya' scheme | लाभार्थीच नाकारताहेत ‘जन आरोग्य’ योजना

लाभार्थीच नाकारताहेत ‘जन आरोग्य’ योजना

Next
ठळक मुद्देशस्त्रक्रियेचा खर्च बसत नसल्याने रुग्ण अडचणीत मार्ग काढण्याचा उमटला सूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा मंजूर निधी कमी पडल्याने व रुग्णाच्या नातेवाईकांकडून वरचे पैसे मागण्यावर आक्षेप घेतल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेविना एका युवकाचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा एका रुग्णाला या समस्येला तोंड द्यावे लागले. अखेर रुग्णाचा नातेवाईकांनी या योजनेलाच नाकारले. पैसा गोळा करून शस्त्रक्रिया केली. यामुळे योजनेचा पॅकेजमधील निधीपेक्षा उपचारात जास्त खर्च येणाऱ्या प्रकरणात मार्ग काढण्यासाठी योजनेनेच पुढाकार घ्यावा, असा सूर उमटू लागला आहे.
‘क्रॉनिक अ‍ॅरोटिक डिसेक्शन’चा रुग्ण असलेला अंकेश लिमजे (२२) हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभार्थी असल्याने त्याला उपचारासाठी दीड लाखाचा निधी मंजूर झाला होता. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शल्यचिकित्सा विभागात त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. परंतु शस्त्रक्रियाचा खर्चच २ लाख २५ हजारावर जाणार होता. जास्तीचा ७५ हजार रुपयांच्या खर्चाची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांनी घेतली. त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाने ७५ हजार रुपयांचा ‘डीडी’ तयार केला. परंतु हॉस्पिटलच्या जनआरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी यावर आक्षेप घेतला.
रुग्णांकडून शस्त्रक्रियेला लागणारे वरचे पैसे घेता येणार नाही, असे रुग्णालयाला सांगितले. यामुळे विभागाने शस्त्रक्रिया थांबवली. रुग्णाची प्रकृती पाहता यावर मार्ग काढण्याची सूचनाही केली. शस्त्रक्रियेचा खर्च हा दीड लाखांपेक्षा जास्त येत असल्याने व रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसेही घेता येत नसल्याने काय करावे, हा प्रश्न होता. शस्त्रक्रिया दोन ते तीन वेळा पुढे ढकलण्यात आली. अखेर ११ फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रियेविनाच अंकेशचा मृत्यू झाला. असेच एक प्रकरण गेल्या आठवड्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल समोर आले.
एक ३५ वर्षीय युवक हा जनआरोग्य योजनेचा लाभार्थी असल्याने दीड लाख रुपये मंजूर झाले. परंतु शस्त्रक्रियेसाठी आणखी ३० ते ५० हजाराची गरज होती. वरचे पैसे घेता येत नसल्याची रुग्णालय प्रशासनाने अडचणही सांगितली. रुग्णाची प्रकृती पाहता नातेवाईकांनी योजनेलाच नाकारून पैसे गोळा करून दिले. यामुळे बुधवारी त्या रुग्णावर शस्त्रक्रियाही झाली.
योजनेचा उद्देशालाच हरताळ
दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील रुग्णांवर मोफात उपचार व्हावे म्हणून महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेत हृदय शस्त्रक्रियेसाठी जास्तीत जास्त दीड लाख रुपयांचे पॅकेज आहे. परंतु हृदयाचा काही रुग्णांना ‘टिश्यू व्हॉल्व’ सोबत इतरही आवश्यक साहित्यांची गरज असते. हा खर्च पॅकेजच्या बाहेर जातो. लाभार्थी रुग्णांकडून वरचे पैसे घेता येत नसल्याने विशेषत: शासकीय रुग्णालय अडचणीत येते. यामुळे रुग्णच ही योजना नाकारून पदरमोड करून पैसा उभा करीत आहे. परिणामी, या योजनेचा मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
योजनेच्या अधिकाऱ्यांनी यातून मार्ग काढायला हवा
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे लाभार्थी असतानाही अनेकवेळा काही रुग्णांचा शस्त्रक्रियेचा खर्च हा पॅकेजच्या बाहेर जातो. या रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचीही गरज असते. अशावेळी योजनेतील वरिष्ठ अधिकाºयांची समिती असल्यास व त्यांना पॅकेजच्यावर लागणाºया पैशांना मंजुरी देण्याचे अधिकार दिल्यास या योजनेचा खरा फायदा रुग्णांना होऊ शकेल.
-डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: The beneficiaries are rejecting the 'Jan Arogya' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य