Be careful! Your Facebook Profile May Be Hacked | सावधान ! आपले फेसबुक प्रोफाईल हॅक होऊ शकते
सावधान ! आपले फेसबुक प्रोफाईल हॅक होऊ शकते

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षातज्ज्ञ महेश राखेजा यांनी दिल्या टीप्स

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपले फेसबुक सुरक्षित आहे, या संकल्पनेतून आता हळूहळू आपण सगळेजण बाहेर येत आहोत. विविध प्रकारे आपले फेसबुक प्रोफाईल हॅक केले जाऊ शकते. या माध्यमाच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत आंतरराष्ट्रीय टेक्निकल व्याख्याते व सायबर सुरक्षातज्ज्ञ महेश राखेजा यांनी व्यक्त केले. सायबर सुरक्षेविषयी जनमानसात असणाऱ्या जनजागृतीचा अभाव व निष्काळजीपणा सायबर गुन्हेगारीच्या घटनांना कारणीभूत ठरतो असेही त्यांनी सांगितले.
सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी नागपूर जिल्हा माहिती कार्यालय नागपूर व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र’ या अंतर्गत सायबर सुरक्षा या विषयावर माध्यम प्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त अनुपकुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, नागपूरचे संयुक्त पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, नागपूर शहर सायबर क्राईमच्या उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, विद्या विभागाचे प्रा. डॉ. धर्मेश धवनकर यावेळी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया अभियानास सायबर सुरक्षित डिजिटल व्यवहार निश्चितपणे चालना देतील,अशी आशाही राखेजा यांनी व्यक्त केली. या कार्यशाळेदरम्यान सायबरसुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या सुरक्षा टीप्सबद्दल त्यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली.
जागतिक आंतरजाल (वर्ल्ड वाईड वेब) हे न्यू मीडियाच्या माध्यमातून आता ‘वेब २.०’ या नव्या रूपात आले असून ते जास्त परस्परसंवादी (इंटरअ‍ॅक्टिव्ह) झाले आहे. नागरिक ते शासन, व्यापार ते व्यापार हा संवाद आता समाज माध्यमांद्वारे जागतिक स्तरावर आॅनलाईन झाला आहे, असे कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना अनुप कुमार यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञानाच्या सर्वव्यापी वापरामुळे या क्षेत्रातील कुशल तंत्रज्ञासोबतच सायबर गुन्हेगारीही वाढत आहे. इंटरनेट फ्रॉड, आयडेंटिटी थेफ्ट यासारख्या सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी आपण सज्ज राहणे आवश्यक आहे, असेही अनुप कुमार यावेळी म्हणाले.
नागपूर शहर सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी शहरात सायबर जागृती करण्यात येत असून संगणक साक्षरता आज महत्त्वपूर्ण आहे. आपली आर्थिक फसवणूक होऊनये यासाठी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. विद्यार्थी व पालकांतही जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सहायक पोलीस आयुक्त विशाल माने, विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, सहायक संचालक जगन्नाथ पाटील तसेच महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पत्रकार उपस्थित होते.
आॅनलाईन शॉपिंगपूर्वी अ‍ॅपची खातरजमा करा
 सायबर गुन्हेगार हे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा उपयोग आर्थिक तसेच वैयक्तिक नुकसानीसाठी करीत असल्याचे सांगून आपली वैयक्तिक माहिती ही इंटरनेट तसेच हॉटेल, आॅनलाईन शॉपिंग संकेतस्थळावर देताना संबंधित संकेतस्थळ किंवा अ‍ॅप हे अधिकृत असल्याची खात्री केल्यानंतरच व्यवहार करावेत.
‘लिनक्स’ आॅपरेटिंग सिस्टिम सुरक्षित
 विंडोज या संगणकाच्या परिचालन यंत्रणेच्या (आॅपरेटिंग सिस्टिम) पायरेटेड व्हर्जन्स (बनावट आवृत्ती) वापरल्याने माहिती चोरी (डाटा थेफ्ट) जाण्याचा संभव बळावतो यासाठी ‘लिनक्स’ या पयार्याने सोयीस्कर व तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित अशा आॅपरेटिंग सिस्टिमचा वापर संगणक चालकांनी करावा असा सल्ला राखेजा यांनी यावेळी दिला.
‘व्हर्च्युअल के्रडिट कार्ड’ वापरा
 ए.टी.एम., क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माहिती आधारे घडणाऱ्या सायबर गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ‘व्हर्च्युअल के्रडिट कार्ड’चा वापर केल्यास बँक ग्राहकांना संभाव्य आर्थिक नुकसान भोगावे लागणार नाही.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.