दोन वर्षांपूर्वी विकली गेली नागपुरातील ‘बालिका वधू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 08:43 PM2018-12-13T20:43:12+5:302018-12-13T20:48:07+5:30

लग्नाचे आमीष दाखवून दोन वर्षांपूर्वी केवळ एक लाख रुपयांत राजस्थानमधील कोटा येथे एका अल्पवयीन मुलीला विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फोन केल्याने हा प्रकार समोर आला. गुन्हे शाखा पोलिसांनी नवरदेवासह आंतरराज्यीय टोळीच्या तीन सदस्यांना पकडले आहे.

'Balika Vadhu' in Nagpur, sold two years ago | दोन वर्षांपूर्वी विकली गेली नागपुरातील ‘बालिका वधू’

दोन वर्षांपूर्वी विकली गेली नागपुरातील ‘बालिका वधू’

Next
ठळक मुद्देनवरदेवासह टोळीच्या तीन सदस्यांना अटक आर्थिक परिस्थितीमुळे अल्पवयीन मुलीने सोडले होते घर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नाचे आमीष दाखवून दोन वर्षांपूर्वी केवळ एक लाख रुपयांत राजस्थानमधील कोटा येथे एका अल्पवयीन मुलीला विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फोन केल्याने हा प्रकार समोर आला. गुन्हे शाखा पोलिसांनी नवरदेवासह आंतरराज्यीय टोळीच्या तीन सदस्यांना पकडले आहे. पंकज हनुमान आपतुरकर (३०) रा. भवानीनगर पारडी, श्यामलाल रामकिसन गुजर (३३) आणि सुरेंद्र जगन्नाथ चौधरी (२७) झालावाड, कोटा राजस्थान अशी आरोपीची नावे आहे. पंकज आॅटो चालक आहे.
पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अजनी येथील रामटेकेनगरात राहते. तिच्या कुटुंबात आई आणि भाऊ आहे. आई मजुरी करते. आर्थिक परिस्थितीमुळे घरात नेहमी वाद होत होते. डिसेंबर २०१६ मध्ये आईसोबत तिचे असेच भांडण झाल्याने ती घरातून निघून गेली होती. या दरम्यान तिची पंकजसोबत ओळख झाली. पंकज मानवी तस्करीच्या आंतरराज्यीय टोळीचा सदस्य आहे. त्याने पीडित अल्पवयीन मुलीची मानसिक अवस्था ओळखली. त्याने तिला चांगल्या कुटुंबात लग्न किंवा नोकरी लावून देण्याचे आमीष दाखविले. तो तिला एका महिला दलालाकडे घेऊन गेला. तिने एक-दोन दिवस तिला आपल्या घरी ठेवले. याचदरम्यान पंकजने मध्यप्रदेशातील एका दलालाशी संपर्क केला आणि त्याच्याकडे पीडित मुलीला सोपविले. मध्यप्रदेशातील दलाल तिला राजस्थानला घेऊन गेला. तिथे या मुलीला श्यामलाल गुजर नावाच्या व्यक्तीला विकले. श्यामलालने तिला सुरेंद्र चौधरी नावाच्या व्यक्तीला एक लाख रुपयात विकले. सुरेंद्रने बोगस दस्तावेजाच्या मदतीने तिच्याशी लग्न केले आणि तिला आपल्या घरी बंधुआ मजूर म्हणून ठेवले. तिला घराबाहेर जाऊ दिले जात नव्हते. सुरेंद्रचे कुटुंबीय तिच्यावर पाळत ठेवायचे. तिच्या हाती मोबाईलही लागू दिले जात नव्हते. काही दिवसांपूर्वी तिला गावातील शाळेच्या शिक्षकाला मोबाईल मागून कुटुंबीयांशी बोलावे, अशी युक्ती सुचली. पीडित मुलीने शाळेत पोषणआहार बनवणाऱ्या महिलेसोबत काम करण्याच्या बहाण्याने शाळेत जाण्याचे ठरविले. तिने सुरेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांना शाळेत जाऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सुरेंद्रनेही परवानगी दिली. गेल्या आठवड्यात शाळेत जाताच तिने शिक्षकाला कुटुंबीयांशी बोलण्यासाठी मोबाईल मागितला. शिक्षकानेही तिला आपला मोबाईल दिला. तेव्हा तिने आपल्या आईला फोन करून आपबिती सांगितली.
अजनी पोलिसांनी प्रकरण ‘एएचटीयू’ला सोपविले
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर आईने केलेल्या तक्रारीनुसार अजनी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. अपहृत मुलीची माहिती मिळत नसल्याने त्यांनी चार महिन्यानंतर हे प्रकरण अ‍ॅण्टी ह्युमन ट्रॅफीकिंग युनिट (एएचटीयू) ला स्थानांतरित केले होते. एएचटीयू गुन्हे विभागाची एक शाखा आहे. मीना जगताप या शाखेच्या प्रभारी पोलीस निरीक्षक आहेत. अल्पवयीन मुलीच्या आईने जगताप यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मोबाईल नंबरच्या आधारावर तपास सुरू केला. ते शाळेजवळ पोहोचले आणि अल्पवयीन मुलीला शोधून काढले. तिला मुक्त करून कथित पती सुरेंद्र चौधरीला अटक केली. त्याच्या माहितीवरून श्यामलाल गुजर आणि पंकज आपतुरकरलाही पकडले.
पूर्ण कुटुंब बर्बाद झाले
अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली. तिचा कुठलाही पत्ता लागत नसल्याने तिच्या भावाने दु:खी होऊन आत्महत्या केली. तिच्या आईची मानसिक अवस्थाही बिघडली. या घटनेने पूर्ण परिवार प्रभावित झाला. मुलीचे काय झाले असेल या विचारात तिची आई नेहमी असायची. ती मिळाल्यावर खरा प्रकार लक्षात आला.
लोकमतने केला होता खुलासा
लोकमतने १२ डिसेंबर रोजीच्या अंकात दोन लाखात मिळते वधू या शिर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तातून नागपुरातील अल्पवयीन मुली व महिलांना राजस्थानमध्ये विकले जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. ताज्या प्रकरणाने या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रानुसार राजस्थानमध्ये मोठ्या संख्येने शहरातील अल्पवयीन मुलींना विकले जात असून त्यांचे शोषण केले जात आहे.

 

 

Web Title: 'Balika Vadhu' in Nagpur, sold two years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.