विदर्भातील शेतकऱ्यांना योग्य उत्पादनमूल्य मिळवून देणार : बाबा रामदेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 09:34 PM2018-02-23T21:34:55+5:302018-02-23T21:38:49+5:30

Baba Ramdev will get decent product price for farmers in Vidarbha | विदर्भातील शेतकऱ्यांना योग्य उत्पादनमूल्य मिळवून देणार : बाबा रामदेव

विदर्भातील शेतकऱ्यांना योग्य उत्पादनमूल्य मिळवून देणार : बाबा रामदेव

Next
ठळक मुद्दे‘लोकमत आयकॉन्स आॅफ विदर्भ’ सोहळ्यात  ‘थेट-भेट’ : दिलखुलास उत्तरे व ‘हास्य’योगाने रंगली मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी विदर्भातील नामवंत व्यावसायिक, समाजसेवक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ यांच्या यशोगाथेवर प्रकाश टाकण्यासाठी ‘लोकमत प्रोफेशनल आयकॉन्स आॅफ विदर्भ’अंतर्गत प्रकाशित ‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे लोकार्पण करण्यात आले. योगगुरू स्वामी बाबा रामदेव, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा मोठ्या उंचीवर गेला. यावेळी योगगुरू बाबा रामदेव यांच्या मुलाखतीबाबत खचाखच भरलेल्या सभागृहातील उपस्थितांमध्ये उत्कंठा होती. विजय दर्डा व ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र यांनी प्रश्नांचा क्रम सुरू केला आणि प्रत्येक प्रश्नानंतर उपस्थितांमधील उत्साह आणखी वाढत गेला. धारदार प्रश्नांनादेखील बाबा रामदेव यांनी गंभीरतेने उत्तरे दिली. तर काही वेळा हजरजबाबीपणा दाखवला. त्यांनी आपल्या शैलीत उपस्थितांना ‘हास्य’योगदेखील घडविला.
प्रश्न : लहानपणी ऐकले होते की बाबा व संत हे स्वभावाने शालीन व शांत असतात. परंतु आपल्याला पाहून हा समज मोडीत निघाला. आपला हा मिश्किल अंदाज कसा घडला ?
उत्तर : तुम्ही खूप ‘स्मार्ट’ आहात, यात काहीच शंका नाही. तुमच्या प्रश्नातून ते दिसून येत आहे. समाजात साधू-संतांबाबत याप्रकारचा समज निर्माण झाला आहे. परंतु आध्यात्मिकतेच्या दृष्टीने साधू-संतांनी आतून शांत राहायला हवे, बाहेरून नव्हे. त्यांच्यात क्रियाशीलता, सृजनात्मकता असायला हवी. आज आपल्याला देशाला विदेशी कंपन्यांच्या लुटीपासून व सांस्कृतिक ऱ्हासापासून वाचविले पाहिजे.
प्रश्न : आव्हान तर फार मोठे आहे. हे शक्य होऊ शकेल का ?
उत्तर : भारत देश स्वभावानेच तप, प्रेमाला पसंती देणारा व उदार राहिला आहे. आम्ही व्यक्तिगत रूपाने स्वत:साठी काहीही करत नाही. रामाने आपले पूर्ण जीवन तपस्वीसारखे घालविले. परंतु त्यांनी भौतिक जगात आपल्याहून कितीतरी शक्तिशाली असलेल्या रावणावर विजय मिळविला होता.
प्रश्न : तर बाबा तुम्ही परशुरामासारखे आहात का ?
उत्तर : काही जण ‘कॅपिटलिस्ट’ म्हणजेच भांडवलवादी असतात. आम्ही अध्यात्मवादी आहोत. सध्याच्या काळात ‘अपॉर्च्युनिस्ट’ म्हणजे संधीवाद्यांची संख्या वाढली आहे.
प्रश्न : तुमच्या व्यक्तिमत्त्वातील विविध विशेषता लक्षात घेता, तु्म्ही स्वत:ला कोण मानता ?
उत्तर : मी योगी आणि कर्मयोगी आहे. बाकी सगळ्या गोष्टी ‘बायप्रोडक्ट’ आहेत. माझ्यासोबत २-३ दिवस रहा. आपोआप माझे व्यक्तिमत्त्व व इतर मुद्यांची ओळख होऊन जाईल. चालत रहा व अडचणींमध्येदेखील काम करत रहा, हाच माझ्या आयुष्याचा मंत्र आहे. मी फारसा शिकलेला नसलो तरी माझा ‘देसी दाव’ मजबूत आहे. मी त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर पराजित होणार नाही. मी स्वार्थासाठी काम करत नाही. माझी जीवनपद्धती साधी आहे. जमिनीवर झोपतो व अंधारातून प्रकाशाचा शोध घेतो,
प्रश्न : विदर्भात तुम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहात. निश्चित केलेल्या कालावधीत योजनांची अंमलबजावणी होऊ शकेल का ?
उत्तर : या आर्थिक वर्षातील आॅक्टोबर महिन्यापर्यंत नागपुरात दररोज ८०० टन संत्रा ज्यूसचे उत्पादन करणारा प्रकल्प कार्यान्वित होईल. या माध्यमातून ‘ज्यूस’ प्रेमींना आम्ही नैसर्गिक ‘ज्यूस’ उपलब्ध करून देऊ. सध्या लोक ‘फ्लेवर’ असलेला नकली ‘ज्यूस’चे सेवन करत आहे. आम्ही उत्पादित करणारे ‘ज्यूस’ स्वस्त असेल. संत्र्याच्या बिया व सालापासून तेल निघते. त्यामुळे आमचा उत्पादन खर्च त्यातून निघून जाईल. यामुळे आम्हाला संत्रा ‘ज्यूस’ काढणे स्वस्तात पडेल.
प्रश्न : दूध प्रकल्प सुरू करण्याचीदेखील तुम्ही घोषणा केली आहे?
उत्तर : हो, लोकांना शुद्ध दूध उपलब्ध करुन देण्याची आमची योजना आहे. दिवाळीपर्यंत गाईचे दूध ‘लॉन्च’ करण्यात येईल. देशाला समृद्ध बनविण्यासाठीच आम्ही झटत आहोत. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळावे हेच आमच्या सर्व योजनांचे उद्दिष्ट आहे.
प्रश्न : आपण शेतकरीपुत्र आहात. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दयनीय आहे. विदर्भात शेतकरी आत्महत्यांच्या आकडा वाढतोच आहे. सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ज्या योजना बनविल्या त्या मोठ्या प्रमाणावर कागदांवरच राहिल्या. या स्थितीत विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत बदल घडवून आणण्यासाठी आपण कशा प्रकारे नियोजन करणार आहात?
उत्तर : शेतकऱ्यांनी गाय पाळावी. तिचे दूध काढावे आणि आम्हाला विकावे. आम्ही दररोज ८०० टन संत्राज्यूस काढणारा प्रकल्प लावत आहोत. यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणात संत्रा लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांचे उत्पादन वाढावे, यासाठी सर्व शक्य प्रयत्न झाले पाहिजेत. अशा सर्व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी येथे सर्व संभव योजना सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना योग्य उत्पादन मूल्य मिळवून देण्यासाठीच काम करेन.
प्रश्न : बाबा, आपण इथे इतका मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प लावत आहात. त्यासाठी संत्रा येईल कुठून?
उत्तर : इतका मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प देशात पहिल्यांदाच लागत आहेत. सुरुवातीच्या काळात संत्र्याची कमतरता भासल्यास इतर राज्यांची मदत घेऊ शकतो. परंतु ‘मीडिया हाऊस’च्या माध्यमातून आवाहन करतो, की संत्र्याचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकºयांनी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी ‘लोकमत’चे सहकार्यदेखील अपेक्षित आहे. संत्र्यासोबतच आम्ही आवळा व ‘अ‍ॅलोव्हेरा’पासून दररोज ६०० टन ज्यूस काढणार आहोत. विदर्भातील या पिकांचेदेखील उत्पादन होऊ शकते. ‘अ‍ॅलोव्हेरा’तर शेतकरी पडिक जमिनीवरदेखील लावू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होऊ शकते. या दिशेने सर्व प्रयत्न करू. शेतकऱ्यांसाठी भरपूर गुंतवणूक करण्यात येईल.
प्रश्न : बाबा ‘अच्छे दिन’ कधी येणार ?
उत्तर : जे सकाळी योग करतील, त्यांचा दिवस चांगला होईल. जीवन चांगले होईल.

९९ टक्के ‘बॉलिवूड’कर योगाच्या प्रेमात
हिंदी चित्रपटसृष्टीतील ९९ टक्के अभिनेते, अभिनेत्री योगासन करतात. कुणी कपालभाती तर कुणी अनुलोम-विलोम करतात. अनेक जण तर नियमितपणे सूर्यनमस्कारदेखील घालतात. शिल्पा शेट्टीच नव्हे तर हेमामालिनी, धर्मेन्द्र नियमित योगासने करतात. चांगल्या गोष्टींप्रति आकर्षण वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे. ‘योग’संदर्भात ‘ग्लॅमर’ निर्माण झाले आहे, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.
‘लोकमत’च्या ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ची दिलखुलास प्रशंसा
‘पतंजली’ समूहातर्फे नागपुरात संत्रा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. संत्रा हा आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. ‘लोकमत’ने ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे यशस्वीपणे आयोजन केले. ‘लोकमत’ यापुढेदेखील संत्र्यासंदर्भातील प्रकल्प व उपक्रमांना पाठिंबा देईल हा विश्वास आहे. ‘लोकमत’ने ‘पतंजली’च्या प्रकल्पासाठी ‘प्लॅटफॉर्म‘च तयार केला आहे. या वैश्विक पातळीच्या महोत्सवातून संत्र्याची गुणवत्ता कशी वाढवावी व उत्पादनवाढीसंदर्भात विदर्भातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले. येणाऱ्या काळात संत्र्याच्या वाढलेल्या उत्पादनात याचा परिणाम निश्चित जगासमोर येईल. हे आयोजन दरवर्षी होत राहील व आम्हीदेखील यापुढे यात सहभागी होऊ. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणेत हा ‘महोत्सव’ नक्कीच मौलिक भूमिका पार पाडेल, असे प्रतिपादन स्वामी बाबा रामदेव यांनी केले.
प्रिया प्रकाश अन् बाबांचा ‘हास्य’योग
स्वामी बाबा रामदेव यांची योगगुरू म्हणून ‘बॉलिवूड’मधील अभिनेत्रींमध्ये लोकप्रियता आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित अशा अनेक ‘पोस्ट’ ‘सोशल मीडिया’वर दिसून येतात, ज्यामुळे हसणे अनावर होते. मुलाखतीदरम्यान विकास मिश्र यांनी शिल्पा शेट्टीला ते एकटक पाहत असलेल्या ‘पोस्ट’संदर्भात विचारणा केली. यावर बाबांनीदेखील खळखळून हसत उत्तर दिले. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून माझ्यासंदर्भात अशा ‘पोस्ट’ टाकल्या जातात. हा खोडसाळपणा आहे. परंतु हे सर्व बनावट असून याचा सत्याशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर विकास मिश्र यांनी लगेच मल्याळम् अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर हिच्या लोकप्रिय झालेल्या ‘व्हिडीओ’ला बाबा रामदेव यांची योगासने जोडून तयार करण्यात आलेल्या ‘पोस्ट’चा हवाला दिला. यावर बाबा रामदेव यांनी ‘सोशल मीडिया’त काहीही होऊ शकते. येथे पुरुषाची महिला व महिलेचा पुरुष होऊन बनावट ‘पोस्ट’ सहज ‘शेअर’ होतात, असे उत्तर दिले. विशेष म्हणजे यालादेखील त्यांनी गंभीरतेने न घेता आपल्या दिलखुलास हास्यातूनच प्रतिसाद दिला. प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यानच स्वामी बाबा रामदेव यांनी योगासनांची प्रात्यक्षिकेदेखील करून उपस्थितांची मने जिंकली.

 

Web Title: Baba Ramdev will get decent product price for farmers in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.