नागपुरात रेती माफियाकडून तहसीलदारास चिरडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 08:41 PM2019-04-23T20:41:47+5:302019-04-23T20:43:11+5:30

रेती तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्याच्या पवित्र्यात असलेले महसूल विभागातील नायब तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर रेती माफियाने कार घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. वाठोडा रिंग रोडवर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. प्रसंगावधान राखल्यामुळे सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेने प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली असून, नंदनवन पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

An attempt to crush Tahsildar by the sand mafia in Nagpur | नागपुरात रेती माफियाकडून तहसीलदारास चिरडण्याचा प्रयत्न

नागपुरात रेती माफियाकडून तहसीलदारास चिरडण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देवाठोड्यात घडली घटना : प्रशासनात खळबळ, नंदनवनमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेती तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्याच्या पवित्र्यात असलेले महसूल विभागातील नायब तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर रेती माफियाने कार घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. वाठोडा रिंग रोडवर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. प्रसंगावधान राखल्यामुळे सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेने प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली असून, नंदनवन पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
नंदनवन, कळमना, हुडकेश्वर आणि वाडी परिसर रेती माफियांचे डेस्टिनेशन आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून रेती माफिया नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नद्यांमधून रोज लाखोंची रेती चोरून आणतात. अवैध खनन करून आणलेल्या या रेतीची नंदनवन, कळमना, हुडकेश्वर आणि वाडी परिसरात साठवणूक केली जाते. त्यानंतर मागणीनुसार या भागातून बिनबोभाट रेतीची तस्करी (विक्री) केली जाते. उपरोक्त पोलीस ठाण्यात महिन्याला लाखोंची देण मिळत असल्याने पोलीस रेती चोरी आणि तस्करी करणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अधून मधून महसूल विभाग किंवा पोलीस विभागात नवीन आलेले अधिकारी कारवाई करतात.
नायब तहसीलदार साळवे आणि त्यांचे सात सहकारी गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठोडा रिंग रोड परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत होते. संशय आल्यामुळे त्यांनी रेतीने भरलेले दोन ट्रक थांबवले. ट्रकचालकांना खाली उतरवून त्यांनी रॉयल्टी आणि अन्य कागदपत्रे मागितली. प्रकार तस्करीचा असल्यामुळे चालकाकडे कोणतीच कागदपत्रे नव्हती. त्याने आपल्या मालकाला फोन करून ते सांगितले. काही वेळेतच कथिया रंगाची मर्सिडीज कार घेऊन एक व्यक्ती तेथे आली. त्याने कारवाई करीत असलेले नायब तहसीलदार साळवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर भरधाव कार घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत सर्व जण ट्रकच्या बाजूला झाल्याने अनर्थ टळला. कारचालकाने समोर कार नेऊन पुन्हा मागे वळविली आणि परत कारवाईच्या पवित्र्यात असलेल्यांवर कार घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सर्वांनी आपापला जीव कसाबसा वाचविला. त्यानंतर कारचालकाने नायब तहसीलदार साळवे यांना शिवीगाळ करीत कारवाई केली तर जीवे ठार मारू, अशी धमकी दिली.
ट्रकचालक रेतीने भरलेले ट्रक घेऊन पळून गेले
चालकांना तेथून ट्रक काढण्यास सांगितले आणि कारचालक तसेच ट्रकचालक रेतीने भरलेले ट्रक घेऊन पळून गेले. नायब तहसीलदार साळवे यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपी कारचालक पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
तो एकटा, हे आठ
नायब तहसीलदार साळवे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी तेथे ते आणि त्यांचे सात सहकारी होते. महसूल विभागाचे वाहनही त्यांच्याकडे होते. कारचालक एकटा होता. त्याला दबकल्यामुळेच रेतीमाफियाने गुंडगिरी दाखवली. महसूल विभाग आणि पोलिसांना तगडी देण देत असल्यामुळे रेती माफिया कमालीचे निर्ढावलेले आहेत. या निर्ढावलेपणातूच आजचा हा खळबळजनक प्रकार घडला आहे.

 

Web Title: An attempt to crush Tahsildar by the sand mafia in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.