Announcing six candidates of Vidarbha Nirman Mahamanch | विदर्भ निर्माण महामंचचे सहा उमेदवार जाहीर
विदर्भ निर्माण महामंचचे सहा उमेदवार जाहीर

ठळक मुद्देनागपुरातून बीआरएसपीचे सुरेश माने : पहिली यादी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - स्वतंत्र विदर्भ राज्याचा संकल्प करीत विदर्भ निर्माण महामंच निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. विविध १२ पक्ष व संघटनांनी मिळून हा महामंच तयार झाला आहे. या मंचांतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार असून शुक्रवारी सहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने हे नागपुरातून लोकसभा निवडणूक लढवतील.
महामंचचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी ही घोषणा केली. विदर्भातील उर्वरित चार लोकसभा मतदार संघाचे उमेदवार येत्या २० मार्च रोजी जाहीर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भ निर्माण महामंचमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, जांबुवंतराव धोटे विचार मंच, विदर्भ माझा, प्रावॅटिस्ट ब्लॉक पार्टी आॅफ इंडिया, लोकजागर पार्टीसह विविध घटक पक्षांचा समावेश आहे.
पत्रपरिषदेला राम नेवले, श्रीकांत तराळ, आम आदमी पार्टीचे डॉ. देवेंद्र वानखेडे, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राजेश काकडे, विदर्भ माझाचे मंगेश तेलंग, रमेश जनबंधू, राजेश बोरकर, सुनील चोखारे आदींसह ज्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली ते सर्व उमेदवार उपस्थित होते.
काँग्रेस-भाजप विरुद्ध सक्षम पर्याय
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हा एकमेव संकल्प घेऊन विदर्भ निर्माण महामंच निवडणुकीत उतरत आहे. हे सुद्धा एक आंदोलनच आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी वैदर्भीय जनतेची फसवणूक केली आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षाविरुद्ध सक्षम तिसरा पर्याय म्हणून आम्ही राहणार असल्याचे अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सांगितले.
विदर्भाचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर नेऊ
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसोबतच येथील बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन ही निवडणूक लढवत आहोत. यासोबतच निवडणुकीच्या माध्यमातून विदर्भाचा प्रश्न हा राष्ट्रीय स्तरावर नेण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. सुरेश माने यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीसोबत अजुनही आमची चर्चा सुरु असल्याचेही अ‍ॅड. माने यांनी यावेळी सांगितले.
श्रीहरी अणे निवडणूक लढणार नाही
अ‍ॅड. श्रीहरी अणे आणि राजकुमार तिरपुडे हे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही का, या प्रश्नाचे उत्तर देताना अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सांगितले की, अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या नावावरही चर्चा सुरु होती. परंतु कौटुंबिक कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकुमार तिरपुडे हे विधानसभेची निवडणूक लढवणार असून आपण स्वत: विधानसभेची तयारी केली असल्याने लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचेही अ‍ॅड. चटप यांनी सांगितले.
भाजपला हरवणे हेच आपचे लक्ष्य
संविधान वाचवण्यासाठी भाजपला हरवणे हेच पक्षाचे लक्ष्य असल्याचे आम आदमी पार्र्र्टीचे देवेंद्र वानखेडे यांनी सांगितले. भाजपला हरवण्यासाठी आप सक्षम उमेदवाराचा शोध घेत आहे. जिथे सक्षम असून तिथेच उमेदवार उभा करू, असेही त्यांनी सांगितले.
 

हे आहेत विदर्भ निर्माण महामंचचे  उमेदवार

  • नागपूर - सुरेश माने
  • भंडारा- देवीदास लांजेवार
  • रामटेक-चंद्रभान रामटेके
  • चंद्रपूर -दशरथ मडावी
  • वर्धा - ज्ञानेश वाकुडकर
  • अमरावती -नरेंद्र कठाणे

Web Title: Announcing six candidates of Vidarbha Nirman Mahamanch
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.