अपंगांना सक्षम करण्यासाठी नागपूरच्या अमृता-निकेशची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:57 AM2018-01-10T11:57:02+5:302018-01-10T12:01:15+5:30

अपंगांवर सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांना रोजगार उपलब्ध केला तर ते आपोआपच सक्षम होतील. नागपुरातील दोन तरुण तोच प्रयत्न मोठ्या उत्साहाने करीत आहेत. अमृता आणि निकेश अशी या दोन तरुणांची नावे.

Amrita-Nikesh's challenge from Nagpur to enable the disabled | अपंगांना सक्षम करण्यासाठी नागपूरच्या अमृता-निकेशची धडपड

अपंगांना सक्षम करण्यासाठी नागपूरच्या अमृता-निकेशची धडपड

Next
ठळक मुद्देआपण फाऊंडेशनचे अनेक उपक्रम शेकडो अपंगांना जोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपंगांवर सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांना रोजगार उपलब्ध केला तर ते आपोआपच सक्षम होतील. नागपुरातील दोन तरुण तोच प्रयत्न मोठ्या उत्साहाने करीत आहेत. अमृता आणि निकेश अशी या दोन तरुणांची नावे. कुठे अपंगांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी प्रदर्शन भरव किंवा एखाद्याला व्यवसायासाठी जागा मिळवून दे, अशी त्यांची धडपड सातत्याने सुरू असते. या धडपडीतून त्यांनी शेकडो अपंगांना जोडलेच नाही तर काहींना रोजगारही मिळवून दिला आहे.
सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील अमृता अडावदे हिने मास कम्युनिकेशनमध्ये एमए केले आहे तर निकेश पिने यानेही बॅचलर इन जर्नालिझमचा कोर्स केला. दोघांनाही सामाजिक कार्याची आवड असल्याने ते विविध सामाजिक संघटनांशी जुळले आहेत. अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतोच. मात्र या दोन धडपड्यांनी अपंगांसाठी विशेष काही तरी करण्याचे ध्येय मनाशी बाळगले आहे. सामाजिक भान जपणाऱ्या अमृता आणि निकेशच्या मनात अपंग व्यक्तींबद्दल सहानुभूती होती. अनेक अपंगांना भेटल्यानंतर अपंगांच्या व्यथा, वेदनांची जाणीव त्यांना झाली. मात्र त्यांच्यासाठी केवळ सहानुभूती ठेवण्यात अर्थ नाही तर ठोस काहीतरी करण्याची गरज आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. या विचारातून मग त्यांचे कार्य सुरू झाले.
अपंगांमध्ये शारीरिक कमतरता असली तरी त्यांच्यात विशेष कौशल्य असते. हे कौशल्य विकसित करण्याचे आणि मार्केटिंग करून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. या कामातून या दोघांनीच ‘आपण फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्था’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून लोकांची मदत घेत अपंग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविणे किंवा एखाद्या प्रदर्शनात अपंगांच्या वस्तूंना स्टॉल मिळवून देणे त्यांनी केले.
मेळघाटमधील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या स्ट्रीप्स बॅगचे स्वतंत्र प्रदर्शन त्यांनी नागपुरात आयोजित केले. या बॅग दिसायला आकर्षित असल्याने त्या महिलांना बॅगसाठी अनेक संस्थांनी आॅर्डर दिली होती.
अपंगांना कायम रोजगार मिळेल यासाठी काही ठिकाणी नियमित जागेची व्यवस्था त्यांनी केली. याशिवाय कौशल्य असलेल्या अपंग इतरांना प्रशिक्षण देऊ शकतील, असा उपक्रम त्यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू केला. या प्रयत्नामधून १० अपंग व्यक्तींना नियमित रोजगार मिळाल्याचे अमृताने सांगितले.
अपंगांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ त्यांना मिळावा म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू असतात. ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे अपंगांनाही रांगेत उभे राहावे लागू नये असे त्यांना वाटते. अपंगांच्या समस्यांना जातीपातीचे बंधन नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र समाजभवन व्हावे, कुठल्याही शासकीय कार्यालयात अपंग व्यक्तीला व्यवसाय करण्यासाठी छोटीशी जागा उपलब्ध करून द्यावी. दत्तक-पालक योजनेप्रमाणे गरीब अपंगांच्या मुलांना सक्षम लोकांनी शिक्षणासाठी मदत करावी. असे अनेक उद्दिष्ट अमृता आणि निकेशला साध्य करायचे आहेत. यासाठी राजकारणी, महानगरपालिकांसारख्या संस्थांचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना भेटून ते अपंगांच्या समस्या मांडत असतात. त्यांच्या कामामुळे अपंगांच्या विविध संस्थांचे ४०० च्यावर सदस्य त्यांच्याशी जुळले आहेत. आपण फाऊंडेशनच्या माध्यमातून संविधान समारोह, भजनसंध्या, सॅनिटरी नॅपकीन जनजागृती कार्यक्रम, स्नेहमीलन, गीतगायन कार्यक्रम, अपंगांच्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन, फराळ व कपडे वितरण असे अनेक उपक्रम त्यांनी या काळात राबविले आहेत. येत्या मे महिन्यात अशाच एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अमृताने लोकमतशी बोलताना सांगितले.
या प्रयत्नातून आपल्याला काही लाभ मिळेल, हा त्यांचा उद्देश नाही. ते आजही कफल्लकच आहेत. केलेल्या सामाजिक कामाचे वर्णन त्यांना करता येत नाही. मात्र इतरांसाठी नि:स्वार्थ व निरपेक्ष भावनेने झटण्यात जो आनंद आणि समाधान मिळते, ते प्रेरणादायी समाधान या दोन्ही तरुणांच्या चेहऱ्यांवर मात्र स्पष्ट जाणवते.

Web Title: Amrita-Nikesh's challenge from Nagpur to enable the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.