चळवळीतील कार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:55 PM2018-06-30T22:55:43+5:302018-06-30T23:02:28+5:30

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. संघर्षशील व्यक्तिमत्त्व, उत्तम प्रशासक, अभ्यासू व लढवय्ये अधिकारी म्हणून ते ओळखले जात असले तरी त्यांची खरी ओळख ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हीच आहे, आणि चळवळीतील कार्यकर्ता हा कधीही सेवानिवृत्त होत नाही. मेश्राम यांच्या शरीरात आंबेडकरी डीएनए आहे. त्यामुळे त्यांच्यातील कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. ते विद्यापीठाच्या बंधनातून मुक्त झाले असून त्यांच्या कर्तृत्वाला आता खऱ्या अर्थाने बहर येणार आहे, अशा शब्दात डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांचा विद्यापीठातील त्यांच्या सहकाऱ्यांनी गौरव केला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

The activist in the movement never retires | चळवळीतील कार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही

चळवळीतील कार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही

googlenewsNext
ठळक मुद्देकुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांना भावपूर्ण निरोपकर्तृत्वाला आता खऱ्या अर्थाने बहर, सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. संघर्षशील व्यक्तिमत्त्व, उत्तम प्रशासक, अभ्यासू व लढवय्ये अधिकारी म्हणून ते ओळखले जात असले तरी त्यांची खरी ओळख ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हीच आहे, आणि चळवळीतील कार्यकर्ता हा कधीही सेवानिवृत्त होत नाही. मेश्राम यांच्या शरीरात आंबेडकरी डीएनए आहे. त्यामुळे त्यांच्यातील कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. ते विद्यापीठाच्या बंधनातून मुक्त झाले असून त्यांच्या कर्तृत्वाला आता खऱ्या अर्थाने बहर येणार आहे, अशा शब्दात डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांचा विद्यापीठातील त्यांच्या सहकाऱ्यांनी गौरव केला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम हे शनिवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त दीक्षांत सभागृहात त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी विद्यापीठातर्फे शाल, स्मृतिचिन्ह, गौरवग्रंथ देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला. कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे हे अध्यक्षस्थनी होते तर डॉ. नीरज खटी, मिलिंद बाराहाते, विद्यापीठाचे वित्त अधिकारी राजू हिवसे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी नीरज खटी, डॉ. प्रदीप आगलावे, सुधाकर पाटील, दिनेश दखणे, बाळू शेळके, डॉ. रमण मदने, प्रा. सुरेश मसराम, प्रा. ओमप्रकाश चिमणर, डॉ. केशव मेंढे, डॉ. नीरज बोधी, डॉ. श्रीकांत कोमावार, डॉ. विनायक देशपांडे आदींनी डॉ. मेश्राम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
संचालन व प्रास्ताविक विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले. डॉ. केशव वाळके यांनी आभार मानले.

विद्यापीठाच्या रणांगणात लढणारा सारथी - कुलगुरु डॉ. काणे
विद्यापीठ हे आता एक रणांगण झाले आहे. युद्धात आपल्यावर अनेक वार होत असतात. यात मी अर्जुनाच्या भूमिकेत होतो कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम हे माझ्यासाठी श्रीकृष्णाच्या भूमिकेतील सारथी होते. माझ्यापर्यंत येणारे अनेक वार त्यांनी स्वत:वर झेलले, अशा शब्दात कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी डॉ. मेश्राम यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. ते सेवानिवृत्त होत असले तरी त्यांच्या अभ्यास व कौशल्याचा उपयोग मी यापुढेही करून घेईल, असेही ते म्हणाले.

विद्यापीठाच्या गंगाजळीत पाडली २१० कोटींची भर
तीन वर्षे कुलसचिवपदाची आणि पाच वर्षे वित्त व लेखा अधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण केली. अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले. १२ महत्त्वाच्या इमारतींचे बांधकाम केले. विद्यापीठाची गंगाजळी ११५ कोटींवरून ३२५ कोटींवर नेली. मागासवर्गीयांचा अनुशेष दूर करून त्यांना न्याय दिला. त्यामुळे निवृत्तीपर्यंत केलेल्या कामांबाबत मी समाधानी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव पदावरून निवृत्त झालेले डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जाल पी. गिमी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. पूरणचंद्र मेश्राम म्हणाले, कुलगुरुंनी माझ्या कामांवर समाधान व्यक्त करून कामाची पावती दिली आहे. वित्त व लेखा अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला तेंव्हा विद्यापीठाजवळ ११५ कोटींची गंगाजळी होती. कोणतेही प्रकल्प राबवायचे असल्यास विद्यापीठाजवळ पैसे असणे गरजेचे आहे, हे ओळखून विभागाचे संगणकीकरण केले. एक खिडकी योजना सुरू केल्यामुळे पैसा थेट वित्त विभागात जमा होऊ लागला. विद्यार्थ्यांना संगणकावरून पावती देणे सुरू झाल्यामुळे आर्थिक घोटाळ्याची शक्यताच उरली नाही. चार्टर्ड अकाऊंटंटकडून लेखा परीक्षण सुरू केल्यामुळे लाखो रुपयांची वसुली झाली. या सर्व उपाययोजनांमुळे विद्यापीठाची गंगाजळी ११५ कोटींवरून ३२५ कोटी झाली. २००२-०३ मध्ये मागासवर्गीयांचा अनुशेष भरुन १२७ शिक्षक आणि ६५ शिक्षकेतर कर्मचाºयांची भरती केली. व्हीजेएनटीचा एकही कर्मचारी नव्हता. तेंव्हा त्या जागाही पहिल्यांदा भरल्या गेल्यामुळे एस. सी, एस. टी. आयोग भेटीला आले असताना त्यांनी समाधान व्यक्त केले. २० वर्षांपासून विद्यापीठाच्या पावणेआठ एकर जमिनीवर असलेले अतिक्रमण हटवून ९० कोटीची जमीन वाचविली. खंडित झालेल्या पदोन्नतीचा अनुशेष भरुन काढल्यामुळे ५० च्या वर कर्मचाºयांना पदोन्नतीचा लाभ मिळाला. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी युजीसीकडे २ कोटीचे अनुदान मागितले. त्यात विद्यापीठाचे १० कोटी टाकून बांधकाम सुरू केले. शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला. महत्त्वाचे बांधकाम कोणते याची प्रत्यक्ष पाहणी करून १२ इमारती बांधल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. अपूर्ण प्रकल्पात संविधान पार्कचा समावेश असून पीडब्ल्यूडी ऐवजी एनआयटीला बांधकाम देण्याची मागणी केल्यामुळे हे काम सुरू झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कारकिर्दीत झालेल्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पत्रकार परिषदेला डॉ. श्याम धोंड उपस्थित होते.

Web Title: The activist in the movement never retires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.