According to the new constitution, for the first time today a secret votting | नवीन घटनेनुसार आज पहिल्यांदा गुप्त मतदान
नवीन घटनेनुसार आज पहिल्यांदा गुप्त मतदान

ठळक मुद्देनाट्य परिषद निवडणूक : तीन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक ४ मार्च रोजी होत आहे. २०१८-२०२३ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागपुरातून तीन जागांकरिता सात उमेदवार रिंगणात जोर आजमावत आहेत़ ही निवडणूक २५ आॅक्टोबर २०१७ पासून अमलात आलेल्या नवीन घटनेप्रमाणे होणार असल्याने, यंदा पहिल्यांदाच नागपुरातील रंगकर्मी गुप्त मतदान करणार आहेत. नागपुरात महानगर शाखेचे ८९१ आणि नागपूर शाखेचे १०० असे एकूण ९९१ सदस्य आहेत़ हेच सदस्य नागपुरातून तीन सदस्यांच्या जय-पराजयाचा फैसला करणार आहेत़ शहरातील रंगकर्मींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महानगर व नागपूर अशा दोन्ही शाखांचे सदस्य मैदानात आहेत. यामध्ये रंगसेवक पॅनलचे अनिल चणाखेकर, सलीम शेख तर नागपूर शाखेचे नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी यांच्याशिवाय दिलीप देवरणकर व दिलीप ठाणेकर हे स्वतंत्र उमेदवारसुद्धा मध्यवर्तीत जाण्यास उत्सुक आहेत. नागपुरातील मतदार यातील कुणाच्या बाजूने कौल देतात, याकडे नाट्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.
विदर्भातून एकूण सात सदस्य निवडले जाणार
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचा इतिहास पाहिला तर नियामक मंडळावर कायम मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे याच भागाचा वरचष्मा असायचा़ परंतु २५ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या घटनादुरुस्तीनंतर आता उर्वरित महाराष्ट्रालाही या निवडणुकीच्या अनुषंगाने योग्य प्रमाणात भागीदारी मिळणार आहे़ मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे येथून २० उमेदवार निवडून जाणार आहेत, तर विदर्भातून नागपूर (३), अकोला (२) व वाशिम, मानोरा, बुलडाणा यांचे एकत्रित दोन असे एकूण सात सदस्य आणि उर्वरित महाराष्ट्रातून ३३ आणि घटक संस्थांचे १० सदस्य निवडले जाणार आहेत़ हेच सदस्य पुढे अध्यक्षासह केंद्रीय कार्यकारिणीची निवड करणार असल्याने, या निवडणुकीला एक वेगळे वलय लाभले आहे.
१८ मतदारांची दोन्ही शाखेत नोंदणी
नागपुरातील ९९१ सदस्यांपैकी १८ सदस्य असे आहेत ज्यांच्या नावाची दोन्ही शाखेत नोंदणी आहे. हे १८ जण दोन्ही शाखांचे सदस्य कसे झाले, त्यांच्या नावांना मध्यवर्ती शाखेने मंजुरी कशी दिली, या निवडणुकीत ही मंडळी जे मतदान करणार आहेत ती मते बाद तर ठरणार नाहीत ना, यावरही या निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या निवडणुकीत मतदारांनी मतदान केंद्रावर आपले ओळखपत्र दाखवून मतदान करायचे आहे. नवीन घटना दुरुस्तीमुळे या वेळी मतदानात गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून या निवडणुकीचा निकाल बुधवारी ७  मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात जाहीर केला जाणार आहे. 


Web Title: According to the new constitution, for the first time today a secret votting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.