तीन वर्षांत बँकांमध्ये ६२ हजार कोटींचे घोटाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 09:05 PM2018-04-17T21:05:29+5:302018-04-17T21:05:41+5:30

२०१६-१७ हे आर्थिक वर्ष नोटाबंदीसाठी बरेच गाजले. या वर्षात देशातील विविध बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र बँकांमध्ये त्याअगोदरपासूनच गैरप्रकार सुरू असून २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत देशभरातील बँकांमध्ये थोडेथोडके नव्हे तर ६२ हजार कोटींहून अधिक रकमेचे घोटाळे झाले.

62,000 crore scams in banks in three years | तीन वर्षांत बँकांमध्ये ६२ हजार कोटींचे घोटाळे

तीन वर्षांत बँकांमध्ये ६२ हजार कोटींचे घोटाळे

Next
ठळक मुद्दे‘आरबीआय’ची आकडेवारी : घोटाळ्यांची संख्या १४ हजारांहून अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१६-१७ हे आर्थिक वर्ष नोटाबंदीसाठी बरेच गाजले. या वर्षात देशातील विविध बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र बँकांमध्ये त्याअगोदरपासूनच गैरप्रकार सुरू असून २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत देशभरातील बँकांमध्ये थोडेथोडके नव्हे तर ६२ हजार कोटींहून अधिक रकमेचे घोटाळे झाले. ‘आरबीआय’च्या (रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया) अधिकृत आकडेवारीनुसार घोटाळ्यांची संख्यादेखील १४ हजारांहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ‘आरबीआय’कडे विचारणा केली होती. २०१४-१५ ते २०१७-१८ या कालावधीत बँकांमध्ये किती आर्थिक घोटाळे झाले, वर्षनिहाय आकडा किती होता, इत्यादीसंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. ‘आरबीआय’कडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत देशातील बँकांमध्ये १ लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे १४ हजार ४१३ घोटाळे उघडकीस आले. यात राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकामध्ये झालेले प्रत्यक्ष घोटाळे किंवा आर्थिक फसवणूक यांचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये ६२ हजार ८८ कोटी ६४ लाख रुपयांच्या रकमेचा समावेश होता.
वर्षभरात सहकारी बँकांमध्ये ३१ कोटींचे घोटाळे
अर्बन कोआॅपरेटिव्ह बँकांमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात ६९ घोटाळे झाले. घोटाळ्यांची रक्कम ही ३१ कोटी ९३ लाख इतकी होती. यातील ६२ घोटाळे हे तर महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये झाले.
दरदिवशी सरासरी १३ घोटाळे
२०१४-१५ ते २०१६-१७ या वर्षात बँकांमध्ये १४ हजार ४१३ आर्थिक घोटाळे झाले. जर घोटाळ्यांची दिवसनिहाय सरासरी काढली तर प्रत्येक दिवशी देशातील बँकांमध्ये १३ घोटाळे झाले व घोटाळ्याची रक्कम ५६ कोटी ६५ लाख इतकी होती.

 

Web Title: 62,000 crore scams in banks in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.