नागपुरातील रस्त्यांसाठी ४८२.३८ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 09:47 PM2018-06-11T21:47:10+5:302018-06-11T21:47:22+5:30

स्थायी समितीच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती व सिमेंट रोडसाठी विविध शीर्षकाखाली ४८२.३८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात शहरातील आयआरडीपी रोड, मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, दीनदयाल उपाध्यायअंतर्गत रस्ते सुधार कार्यक्रम, शहरातील नवीन रस्ते यासाठी १०२.३८ कोटी, सिमेंट काँक्रिट रोडसाठी ३०० कोटी, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत सिमेंट काँक्रिटच्या रोडसाठी ८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

482.38 crores provision for roads in Nagpur | नागपुरातील रस्त्यांसाठी ४८२.३८ कोटींची तरतूद

नागपुरातील रस्त्यांसाठी ४८२.३८ कोटींची तरतूद

Next
ठळक मुद्देअर्थसंकल्पात उत्तर नागपूरला झुकते माप : जुनी कामे पूर्ण करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थायी समितीच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती व सिमेंट रोडसाठी विविध शीर्षकाखाली ४८२.३८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात शहरातील आयआरडीपी रोड, मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, दीनदयाल उपाध्यायअंतर्गत रस्ते सुधार कार्यक्रम, शहरातील नवीन रस्ते यासाठी १०२.३८ कोटी, सिमेंट काँक्रिट रोडसाठी ३०० कोटी, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत सिमेंट काँक्रिटच्या रोडसाठी ८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील रस्त्यासोबतच उत्तर नागपुरातील विकास कामांना झुकते माप देण्यात आले आहे. यात उत्तर व पश्चिम नागपूरला जोडणारा इटारसी रेल्वे पुलाचा विस्तारित प्रकल्प, उत्तर व दक्षिण नागपूरला जोडणाऱ्या पाचपावली उड्डाणपुलाची दुरुस्ती, कमाल चौक ते अशोक चौकाला जोडणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाला या वर्षात सुरुवात केली जाणार आहे. कमाल चौक बाजारात व्यापारी भवन उभारण्याचे प्रस्तावित आहे.

१२ कोटीचा बॅचमिक्स प्लान्ट
महापालिका नवीन बॅचमिक्स प्लान्ट या वर्षात उभारणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सध्याचा हॉटमिक्स शहरासाठी सक्षम नाही.

भूमिगत नाली व नाल्याचे काम
पावसाळी नाल्या, भूमिगत नाल्या व सिवरेज लाईनसाठी अर्थसंकल्पात ३१.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर नाल्यांच्या सुरक्षा भिंतीसाठी १२ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.

महापुरुषांचे पुतळे उभारणार
महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे कठोर नियम आहेत. असे असूनही शहरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. तसेच जुन्या पुतळ्यांच्या ठिकाणी असलेल्या शिलालेखावर त्यांचा संक्षिप्त जीवन परिचय दिला जाणार आहे.

टाऊन हॉलसाठी १० कोटी
महाल येथील श्री राजे रघुजी भोसले नगर भवन(टाऊ न हॉल)च्या पुनर्विकासासाठी १० कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित आहे.

सहभागातून बाजार विकास
केळीबाग रोड येथील बुधवार बाजार, सक्करदरा बुधवार बाजार, बाभुळखेडा येथील रामेश्वरी बाजार, कमाल चौक येथील आठवडी बाजार आदी बाजारांचा लोकसहभागातून विकास केला जाणार आहे.

राम सुमेरबाबा श्वान निवारा केंद्र
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येला आळा बसावा, त्यांची देखभाल करण्यासाठी परमहंस राम सुमेरबाबा श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: 482.38 crores provision for roads in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.