४४ दिवसात पेट्रोलचे दर ९.१४ रुपयांनी घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:22 AM2018-11-19T10:22:44+5:302018-11-19T10:23:10+5:30

महागाईने त्रस्त नागपूरकरांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे गेल्या ४४ दिवसात पेट्रोलचे दर प्रति लिटर ९.१४ रुपयांनी खाली घसरले आहे.

In 44 days, the rate of petrol was reduced by Rs. 9.14 | ४४ दिवसात पेट्रोलचे दर ९.१४ रुपयांनी घसरले

४४ दिवसात पेट्रोलचे दर ९.१४ रुपयांनी घसरले

Next
ठळक मुद्देडिझेलचे दरही ५.१७ रुपयांनी खाली आले

आनंद शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महागाईने त्रस्त नागपूरकरांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे गेल्या ४४ दिवसात पेट्रोलचे दर प्रति लिटर ९.१४ रुपयांनी खाली घसरले आहे. डिझेलचे दरही ५.१७ रुपयांनी घसरले आहे. गेल्या ४ आॅक्टोबर २०१८ रोजी पेट्रोल ९१.९१ रुपये प्रति लिटरप्रमाणे विकले गेले. आता १८ नोव्हेंबर रोजी घसरून ८२.७७ रुपयावर आले आहे. हीच स्थिती डिझेलबाबतही होती. ४ आॅक्टोबर रोजी डिझेल ८०.७१ रुपये प्रति लिटर विकले गेले. १८ नोव्हेंबर रोजी त्याचे दर ७५.५४ रुपये प्रति लिटर इतके होते. अखेर पेट्रोल-डिझेलच्या दरात कमतरता आली कशी? तर पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञानुसार आंतराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. पूर्वी ८६ डॉलर प्रति बॅरेलच्या दरानुसार विकणारे कच्चे तेल आता ६८ रुपये प्रति डॉलरवर आले आहेत. जाणकार या घटनाक्रमामागे अमेरिकेचा हात असल्याचे सांगत आहेत. त्यांच्यानुसार अमेरिकेने आठ देशांवर इराणमधून कच्चे तेल घेण्यास बंदी घातली आहे. या देशांमध्ये प्रमुख आयातक भारत आणि चीनचा सुद्धा समावेश होता. यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढले होते. नागपूरमध्ये पेट्रोलचे दर ९० रुपयाच्या वर गेले होते. आता अमेरिकेने आपल्या कच्च्या तेलाचा पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारात वाढवला आहे तसेच इराणमधून तेल घेण्यास बंदी घातलेल्या आठ देशांना काही प्रमाणात दिलासा दिल्यामुळे आता दिवसेंदिवस कच्चा तेलाच्या किमती घसरत आहेत. परिणामी नागपूरमध्ये पेट्रोल गेल्या ४४ दिवसात ९.१४ रुपये आणि डिझेल ५.१७ रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

६ डिसेंबरनंतर पुन्हा वाढणार किमती
पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञानुसार पेट्रोलियम उत्पादक देशांची संघटना ओपेकची ६ डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत तेल उत्पादन कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. असे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ६ डिसेंबरनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढू शकतात.

डॉलरच्या तुलनेत रुपया थोडा सुधारला
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातही थोडी सुधारणा झाल्यानेही पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्यास मदत मिळाली असल्याचे सांगितले जाते. पूर्वी १ डॉलरसाठी ७४ रुपये द्यावे लागत होते. ते आता ७२ रुपयाच्या आसपास द्यावे लागत आहे.

Web Title: In 44 days, the rate of petrol was reduced by Rs. 9.14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.