40% increase in RSS branches in 6 years | ६ वर्षांत संघ शाखांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ
६ वर्षांत संघ शाखांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ

ठळक मुद्देसंघ शाखांचे ‘अच्छे दिन’ : साप्ताहिक मिलनात ७५ टक्क्यांहून वाढ, ‘टेक्नोसॅव्ही’ तरुण जास्त जुळताहेत

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण देशभरात संघशाखांचा विस्तार व्हावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सत्ताबदलानंतर तर संघाविषयी जनतेमध्ये आकर्षण जास्त प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. मागील ६ वर्षांमध्ये देशभरातील संघ शाखांमध्ये थोडीथोडकी नव्हे तर ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. संघस्थानांची संख्यादेखील ३१ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. विशेषत: ‘टेक्नोसॅव्ही’ तरुण वर्ग संघाकडे जास्त प्रमाणात वळत असल्याची माहिती संघ सूत्रांनी दिली आहे.
२००६ पासून संघाने विस्तारावर अधिकाधिक भर देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर संघ स्थान आणि शाखांची संख्या वाढीस लागावी यासाठी संघाकडून सातत्याने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले. २०१२ मध्ये देशभरात २७९७८ स्थानांवर संघ शाखांची संख्या ४०९८१ इतकी होती. त्यानंतर नागपुरात दोनदा अ.भा.प्रतिनिधी सभा झाल्या. २०१७ मध्ये ३६७२९ स्थानांवर संघ शाखांची संख्या ५७२३३ वर पोहोचली. या ६ वर्षांच्या कालावधीत देशभरात संघस्थानांमध्ये ८७५१ तर संघ शाखांमध्ये १६२५२ ने वाढ झाली.
साप्ताहिक मिलनाकडे वाढता कल
व्यावसायिक व नोकरदारांना अनेकदा कामामुळे दैनंदिन शाखेत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे साप्ताहिक मिलनाच्या माध्यमातून संघाशी जुळून राहण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. २०१२ मध्ये देशभरात ८५०८ ठिकाणी साप्ताहिक मिलन व्हायचे. २०१७ मध्ये हाच आकडा १४८९६ वर पोहोचला. ६ वर्षांमध्ये साप्ताहिक मिलनांच्या संख्येत थोडीथोडकी नव्हे तर ७५ टक्क्यांनी वाढ झाली. यासोबतच संघ मंडळीच्या संख्येत १५ टक्क्यांची वाढ दिसून आली.
असा झाला संघ शाखांचा विस्तार
वर्ष          शाखा            साप्ताहिक मिलन
२०१२    ४०,८९१           ८,५०८
२०१३   ४२,९८१           ९,५५७
२०१४   ४४,९८२          १०,१४६
२०१५   ५१,३३०           १२,८४७
२०१६   ५६,५६९          १३,७८४
२०१७  ५७,२३३         १४,८९६

९० टक्के शाखा युवकांच्याच
वेगवेगळ्या वयोगटाचा विचार केल्यास शालेय ते महाविद्यालयीन विद्यार्थी व ४० वर्षाखालील लोकांच्या शाखांची टक्केवारी सुमारे ९० टक्के इतकी आहे. देशपातळीवर संघाकडून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यादेखील शाखा लावण्यात येतात. नवीन गणवेशाच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांच्या शाखांमध्येदेखील वाढ झाली आहे. देशपातळीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सात हजारांहून अधिक शाखा लागतात. विशेषत: ‘टेक्नोसॅव्ही’ तरुण संघाकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१८ ची आकडेवारी आणखी वाढलेली आहे. तरुणांना आपल्या देशाची संस्कृती जाणून घ्यायची आहे. त्यांना मूळ संस्कारांचा गर्व आहे. त्यामुळे ते ‘जॉईन आरएसएस’, साप्ताहिक मिलन व शाखांच्या माध्यमातून संघाकडे वळत आहेत. अनेक तरुण समाजासाठी काहीतरी विधायक करू इच्छितात. संघातून त्यांना राष्ट्रकार्याची प्रेरणा मिळत असल्याने ते संघाशी जुळत आहेत, असे मत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले..


Web Title: 40% increase in RSS branches in 6 years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.