तान्हा पोळ्याला २११ वर्षांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:48 AM2017-08-22T00:48:39+5:302017-08-22T00:49:11+5:30

तान्हा पोळा विदर्भ वगळता कुठेही साजरा करण्यात येत नाही. १८०६ साली श्रीमंत राजे रघुजी राजे भोसले (द्वितीय) यांनी लाकडी बैलांचा हा उत्सव सुरू केला.

211-year history of Tanha Pooja | तान्हा पोळ्याला २११ वर्षांचा इतिहास

तान्हा पोळ्याला २११ वर्षांचा इतिहास

googlenewsNext
ठळक मुद्देमुलांना संस्कृतीचे महत्त्व कळावे म्हणून सुरू झाली परंपरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तान्हा पोळा विदर्भ वगळता कुठेही साजरा करण्यात येत नाही. १८०६ साली श्रीमंत राजे रघुजी राजे भोसले (द्वितीय) यांनी लाकडी बैलांचा हा उत्सव सुरू केला. लहान मुलांना बैलाचे महत्त्व कळावे म्हणून ही परंपरा त्यांनी सुरू केली. या परंपरेला यंदा २११ वर्षे पूर्ण झाली आहेत.
राजे रघुजी राजे भोसले यांनी लाकडी बैल तयार करून मागविले आणि सर्व लहान मुलांना ते वितरित केले. या बैलांना जिवंत बैलाप्रमाणे सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून जिलेबी, फळे, चॉकलेट, बिस्कीट बांधण्यात आले. लाकडी बैलांची पूजा करून पूजा संपल्यावर तोरण तोडायचे आणि हनुमान खिडकीमार्गे हनुमानाचे दर्शन घेऊन मुलांना खाऊ द्यायचा, अशी ही प्रथा होती. तेव्हापासून विदर्भात ही प्रथा पाळण्यात येत आहे. मुधोजी राजे भोसले यांनीही ही प्रथा आजतागायत कायम ठेवली आहे. मुधोजी राजे भोसले यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. मुधोजीराजेयांचे निवासस्थान सिनियर भोसला पॅलेस, महाल येथे आजही हा बैल ठेवण्यात आला आहे. या बैलाची उंची आठ फूट तर लांबी सहा फूट आहे. बैलाच्या पायात चांदीचा तोडा आहे. ज्या पद्धतीने रघुजी राजे बैलाची वाजतगाजत मिरवणूक काढायचे त्याच पद्धतीने आजही मिरवणूक काढली जाते. याशिवाय शहरात विविध ठिकाणी तान्हा पोळ्यानिमित्त विविध मिरवणुका, वेशभूषा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज मारबत मिरवणूक
नागपूरची परंपरा झळकणार

विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी मारबत आणि बडग्याची मिरवणूक मंगळवारी सकाळी निघणार आहे. या मिरवणुकीत काळी व पिवळी मारबतसोबतच मासूरकर चौक, लालगंज, प्रेमनगर, फुकटनगर, पिवळीनदी, इतवारी, लालगंज, खैरीपुरा, नंदनवन झोपडपड्डी भागात तयार करण्यात आलेले बडगेही निघणार आहेत. दीडशे वर्षांपासून सुरू असलेली ही मारबतची परंपरा पोळ्याचे खास आकर्षण असते. मारबत पाहण्यासाठी मध्य प्रदेश व मराठवाड्यासह वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक शहरात येत असतात. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या अन्यायाला विरोध करण्याच्या उद्देशाने मारबत शहरात फिरत असे. आता विविध सामाजिक अपप्रवृत्तींचा विरोध करण्याचे मारबत हे एक प्रतीक झाले आहे. मारबत आणि बडग्याच्या मिरवणुकीच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर यथार्थ टीका केली जाते. यंदाही ही परंपरा कायम असणार आहे. यंदा महागाई, भ्रष्टाचारासह चिनी वस्तूवर बहिष्कार, भूमाफिया आदींचेही बडगे निघणार आहेत. मंगळवारी काळी मारबत व पिवळी मारबतची नेहरू पुतळा चौक येथे भेट होईल. हे विहंगम दृश्य डोळ्यात साठविण्यासाठी नागपूरकर येथे गर्दी करणार आहेत.

Web Title: 211-year history of Tanha Pooja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.