16 trains on Nagpur railway station home platform | नागपूर रेल्वेस्थानक होम प्लॅटफार्मवरून धावणार १६ रेल्वेगाड्या

ठळक मुद्देइतर प्लॅटफार्मचा भार होणार कमी : रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून हिरवी झेंडी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : अखेर नव्या वर्षात नागपूर रेल्वेस्थानकावरील आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मचे भाग्य उजळणार आहे. या प्लॅटफार्मवरून १ जानेवारीपासून १६ अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
‘लोकमत’ने अनेकदा होम प्लॅटफार्मवरून बहुतांश रेल्वेगाड्या चालविण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानुसार विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारीपासून १६ अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी होम प्लॅटफार्मवरून नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आणि कोरबा-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस चालविण्यात येत होती. आता कळमना-नागपूर दरम्यान डबलिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे तसेच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवी झेंडी दाखविल्यामुळे या प्लॅटफार्मवरून १ जानेवारीपासून १६ अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्यात येतील. यात गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, मुंबई मेल, पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसचा समावेश आहे. होम प्लॅटफार्मवर पहिली रेल्वेगाडी १२८५५ च्या रुपाने बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस ३१ डिसेंबरला येऊन ही गाडी त्याच दिवशी १८२४० या क्रमांकाने नागपूर-बिलासपूर शिवनाथ एक्स्प्रेस होऊन रवाना होईल. रेल्वेगाड्या वाढल्यामुळे रेल्वे प्रशासनाने होम प्लॅटफार्मवर सुविधाही वाढविल्या आहेत. यात वॉशेबल अ‍ॅप्रान, पाणी पुरवठा, शेड, कार टु कोच आदी सुविधांचा समावेश आहे.