१५०० वर्षे प्राचीन बुद्ध मूर्ती विदर्भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:56 AM2019-05-19T00:56:50+5:302019-05-19T00:58:21+5:30

रामटेकपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरधन म्हणजे पूर्वीचे नंदीवर्धन येथील हमलापूरी गावात १९८२ मध्ये कालव्याच्या खोदकामात तथागत गौतम बुद्ध यांच्या कांस्य धातूच्या तीन मूर्ती गवसल्या. विदर्भातील सर्वात प्राचीन मूर्तींपैकी या तीन मूर्ती आहेत. गुप्त-वाकाटक काळातील साधारण १५०० किंवा १६०० वर्षे एवढ्या जुन्या मूर्ती असाव्यात. मध्यवर्ती संग्रहालायत यातील सध्या दोन मूर्ती प्रदर्शित असून लवकरच तिसरी मूर्ती ठेवली जाणार आहे.

1500 years old Buddha idols in Vidarbha | १५०० वर्षे प्राचीन बुद्ध मूर्ती विदर्भात

१५०० वर्षे प्राचीन बुद्ध मूर्ती विदर्भात

googlenewsNext
ठळक मुद्देनगरधनमध्ये मिळाल्या होत्या तीन बुद्ध मूर्ती

सुमेध वाघमारे /लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेकपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरधन म्हणजे पूर्वीचे नंदीवर्धन येथील हमलापूरी गावात १९८२ मध्ये कालव्याच्या खोदकामात तथागत गौतम बुद्ध यांच्या कांस्य धातूच्या तीन मूर्ती गवसल्या. विदर्भातील सर्वात प्राचीन मूर्तींपैकी या तीन मूर्ती आहेत. गुप्त-वाकाटक काळातील साधारण १५०० किंवा १६०० वर्षे एवढ्या जुन्या मूर्ती असाव्यात. मध्यवर्ती संग्रहालायत यातील सध्या दोन मूर्ती प्रदर्शित असून लवकरच तिसरी मूर्ती ठेवली जाणार आहे.
मध्यवर्ती संग्रहालय हे मध्य भारतातील आकर्षणाचे केंद्र आहे. ७ मे १८६३ रोजी सुरू झालेले या संग्रहालयाने आपली १५० वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. संग्रहालयातील अनेक दुर्मिळ तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वस्तू विशेषत: ब्रिटिश काळामध्ये संकलित करण्यात आल्या आहेत. ब्रिटिश काळात जी काही संग्रहालये निर्माण करण्यात आली त्यापैकी नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय हे भारतातील सर्वात जुने व अग्रणी संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे अभिरक्षक डॉ. विराग सोनटक्के म्हणाले, भारतात प्राचीन मूर्ती या हडप्पा संस्कृतीमध्ये मिळतात. तथागत गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ३०० वर्षांनी सम्राट अशोकानंतर कुशान काळात दगडाच्या मूर्ती तयार करण्यास सुरूवात झाली. याची सुरूवात बुद्धांच्या मूर्तीपासून झाली. तिसऱ्या शतकामध्ये कांस्य धातूपासून मूर्ती बनविणे सुरू झाले. दगडाची मूर्ती जड व रहदारीस कठीण असल्याने धातूच्या मूर्तींची देवाणघेवाण वाढली. त्यावेळी तांबे, पितळ व टिनाचा धातूचा वापर करून मूर्ती तयार करीत असत. मूर्ती तयार करण्यासाठी साचा वापरला जायचा.
गुप्त-वाकाटक काळातील मूर्ती
या मूर्ती विदर्भातील नाही, यावर बोलताना डॉ. सोनटक्के म्हणाले, विदर्भात तांब्याचा ‘सोर्स’ नाही, दुसरे म्हत्त्वाचे म्हणजे, बुद्धाने परिधान केलेले वस्त्र, मूर्तीची कलात्मकता व अलंकार याचे सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर त्या उत्तर भारतातील असल्याचे समोर आले. उत्तर भारतात त्यावेळी गुप्त लोकांचे राज्य होते. तेथील दगडाचा मूर्ती व मिळालेल्या बुद्धांच्या कांस्य मूर्तीत साम्य आढळून आले आहे. अभ्यासातून असेही पुढे आले आहे की, उत्तरेतील गुप्त व नगरधनमधील वाकाटकांमध्ये कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी आले असताना बौद्ध भिक्खूंनी या मूर्ती येथे आणल्या असाव्यात असा अंदाज आहे. म्हणून गुप्त-वाकाटक काळातील मूर्ती म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.
रामटेकपासून सात किलोमीटर अंतरावर नगरधन पूर्वीचे नंदीवर्धन येथे हमलापुरी गाव आहे. १९८२ मध्ये दामले यांच्या शेतीसाठी कालव्याच्या खोदकामात कांस्याच्या तीन बुद्धमूर्ती, प्रभामंडल व इतर साहित्य अचानक सापडले. या सर्व बुद्धमूर्ती साधारण वेगवेगळ्या उंचीच्या आहेत. या मूर्तीचे संग्रहालयाच्यावतीने अभ्यास केला असता विदर्भातील सर्वात प्राचीन मूर्तींपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण धोरणांतर्गत धातू माध्यमात तीन पैकी एक बुध्दमूर्ती फ्रान्समध्ये अस्थायी प्रदर्शनासाठी पाठविण्यात आली होती, असेही डॉ. सोनटक्के यांनी सांगितले.
तिसरी बुद्धमूर्ती लवकरच प्रदर्शित
मध्यवर्ती संग्रहालय संशोधक व अभ्यासकांसाठी शैक्षणिक केंद्र ठरले आहे. विदर्भात प्राप्त झालेल्या गुप्त-वाकाटक काळातील तीन बुद्ध मूर्तीपैकी सुरुवातील एक मूर्ती प्रदर्शित करण्यात आली होती. आता दोन मूर्ती आहेत, लवकरच तिसरी मूर्ती प्रदर्शित केली जाणार आहे.
डॉ. विराग सोनटक्के
अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय

Web Title: 1500 years old Buddha idols in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.