नागपूरच्या १५ वर्षीय ‘जलकन्ये’चा अरबी समुद्रात विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 09:46 AM2018-02-23T09:46:30+5:302018-02-23T09:51:39+5:30

नागपुरातील हिमानीने मुंबईतील ‘संक रॉक ते गेट वे आॅफ इंडिया’ हे पाच किमी अंतर ४२ मिनिटे ५४ सेकंदात पूर्ण करून राज्यात अव्वल क्रमांक पटकविला.

The 15-year-old 'Jalkanya' of Nagpur records in the Arabian Sea | नागपूरच्या १५ वर्षीय ‘जलकन्ये’चा अरबी समुद्रात विक्रम

नागपूरच्या १५ वर्षीय ‘जलकन्ये’चा अरबी समुद्रात विक्रम

Next
ठळक मुद्देसागरी जलतरण हिमानी फडके ठरली सर्वात वेगवान जलतरणपटू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सागरी किनारा नसलेल्या नागपुरात जलतरणपटूंची मोठी फळी निर्माण झाली. पोहण्याच्या पुरेशा सुविधा नाहीत; जलतरण तलावांची स्थिती बिकट आणि आर्थिक पाठबळ नसताना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर झेप घेणारे जलतरणपटू येथेच घडले. सागरी जलतरणातही मुसंडी मारणारे स्थानिक खेळाडू मोठा नावलौकिक मिळवीत आहेत. १५ वर्षांची हिमानी फडके हिची या खेळातील घोडदौड इतरांना प्रेरणास्पद ठरावी.
हिमानीने मुंबईतील ‘संक रॉक ते गेट वे आॅफ इंडिया’ हे पाच किमी अंतर ४२ मिनिटे ५४ सेकंदात पूर्ण करून राज्यात अव्वल क्रमांक पटकविला. सर्वात वेगवान जलतरणपटू असा मान मिळविणाऱ्या हिमानीने सलग आठव्यांदा अव्वल स्थान कायम राखले हे विशेष. राज्यातील अन्य कोणत्याही जलतरणपटूला हिमानीची बरोबरी करता आलेली नाही.
वयाच्या नवव्या वर्षांपासून शार्क अ‍ॅक्वेटिक असोसिएशनमध्ये संजय बाटवे यांच्या मार्गदर्शनात सराव करणारी हिमानी १५ व्या वर्षी राष्ट्रीय शालेय जलतरणात सलग तीनवेळा सुवर्ण विजेती ठरली. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतील जलतरणात १७ वर्षे गटात तिने कांस्य पदक जिंकले. वडील खासगी काम करून हिमानीला प्रोत्साहन देत आहेत. उमरेड रोडवरील संजुबा स्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकणाऱ्या या मुलीला थकवा काय असतो हे माहिती नाही. तिचे पोहणे अव्याहतपणे सुरू असते. मुंबईत सहकारी जलतरणपटंनी हिमानीकडून प्रेरणा घेत पुरस्कार जिंकले. त्यात नकूल भोयर हा पाच किमी स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आला. हिमांशु खुजे, सोहनी मुखर्जी, शांतनु ठाकरे यांनीही चांगली कामगिरी केली तर दिव्यांग जलतरणपटू रोहित बोवाडे दोन किमी स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला.

हिमानीची जलतरणातील कामगिरी
शालेय क्रीडा स्पर्धेत कोलकाता, राजकोट आणि दिल्लीतील स्पर्धेत विक्रमी पदकांची कमाई
खेलो इंडिया स्पर्धेच्या जलतरणात १७ वर्षे गटात कांस्य पदक
सिंधूदुर्ग येथील सागरी जलतरणात सलग सहावेळा अव्वल स्थान
मुंबईतील सागरी जलतरणात विक्रमी वेळेसह सलग दुसऱ्यांदा अव्वल स्थान

हिमानीचे भविष्य उज्ज्वल आहे. तिची एकाग्रता चांगली असून तिच्यात अथकपणे पोहण्याची जिद्द आहे. पुढील चार वर्षांत ती देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. उद्या, २४ फेब्रुवारी रोजी गोव्यात होणाऱ्या दहा किमी सागरी जलतरणात ती पहिल्या तीनमध्ये राहील,असा विश्वास आहे.

- संजय बाटवे, कोच

Web Title: The 15-year-old 'Jalkanya' of Nagpur records in the Arabian Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा