मुंबईतल्या तरुणाची ‘इस्रो’ शास्त्रज्ञ म्हणून झाली निवड; पालकांनो मुलांच्या स्वप्नांच्या पाठीशी उभे राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:54 AM2017-12-12T03:54:26+5:302017-12-12T03:54:47+5:30

प्रत्येक पालकाने त्याच्या मुलांच्या पाठीशी उभे राहायला हवे. त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. माझे आई-वडील नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे मी इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन (इस्रो) च्या वैज्ञानिक अभियंता पदावर रूजू होत आहे

The youth of Mumbai was elected as 'ISRO' scientist; Parents stand with children's dreams | मुंबईतल्या तरुणाची ‘इस्रो’ शास्त्रज्ञ म्हणून झाली निवड; पालकांनो मुलांच्या स्वप्नांच्या पाठीशी उभे राहा

मुंबईतल्या तरुणाची ‘इस्रो’ शास्त्रज्ञ म्हणून झाली निवड; पालकांनो मुलांच्या स्वप्नांच्या पाठीशी उभे राहा

Next

मुंबई : प्रत्येक पालकाने त्याच्या मुलांच्या पाठीशी उभे राहायला हवे. त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. माझे आई-वडील नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे मी इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन (इस्रो) च्या वैज्ञानिक अभियंता पदावर रूजू होत आहे, अशी भावना नुकतीच ‘इस्रो’च्या सायंटिस्ट इंजिनीअर पदासाठीची परीक्षा पास झालेल्या पवई येथील पासपोली गावात राहणा-या प्रथमेश हिरवे याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
पवई येथील पासपोली गावात दहा बाय दहाच्या घरात राहणारा प्रथमेश हिरवे हा तरुण अत्यंत कठीण परिस्थितीत अभ्यास आणि कष्ट करून इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन (इस्रो) मध्ये वैज्ञानिक अभियंता(सायंटिस्ट इंजिनीअर) पदावर रुजू होत आहे. तब्बल दहा वर्षे मेहनत करून, दिवसाला किमान १२ तास अभ्यास करून, वेगवेगळ्या परीक्षा देऊन इथपर्यंत पोहोचला आहे. त्याबद्दल सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
प्रथमेश सोमा हिरवे असे या तरुणाचे नाव आहे. वडील पालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत, तर आई गृहिणी आहे. प्रथमेशने पवई येथील फिल्टर पाडा परिसरातील मिलिंद विद्यालयात पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर विलेपार्ले येथील भगुभाई मफतलाल पॉलिटेक्निकमधून त्याने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा आणि त्यानंतर कोपरखैरणे येथील इंदिरा गांधी कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग येथून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
डिप्लोमाच्या तिसºया वर्षात एल अ‍ॅण्ड टीमध्ये सहा महिन्यांची इंटर्नशिप सुरू केली. प्रत्येक गोष्ट प्रात्यक्षिकपणे शिकण्याची संधी मिळाली. तेथील अभियंते मला खूप प्रोत्साहन देत होते. एल अ‍ॅण्ड टीमधील इंटर्नशिपच्या काळात प्रथमेशने बाहेरचे जग पाहिले. इंजिनीअरिंग क्षेत्रातल्या संधींविषयी माहिती मिळत गेली. आठव्या सेमिस्टरदरम्यान टाटा पॉवरमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. दरम्यान, ८४ टक्के गुण मिळवून डिप्लोमा पूर्ण करून तो महाविद्यालयात दुसरा आला. २०११ साली इंजिनीअरिंगच्या डिग्रीला प्रवेश घेतला. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये मुंबई विद्यापीठात २५ वा आला, परंतु महाविद्यालयात कॅम्पस नसल्याने नोकरी मात्र मिळाली नाही. त्यामुळे प्रथमेशने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनीअरिंग सर्व्हिसेसच्या अभ्यासासाठी हैदराबाद येथील एका खासगी संस्थेत प्रवेश घेतला. वर्षभर दर दिवसाला बारा ते चौदा तास अभ्यास केला. यूपीएससीची लेखी परीक्षा पास झाला, मात्र मुलाखतीमध्ये नापास झाला. त्यानंतर खचलेला प्रथमेश मुंबईत परत आला. एक वर्ष मुंबईत राहिला, दरम्यान त्याच्या आई-वडिलांनी त्याला खूप साहाय्य केले, त्याच्या पाठीशी उभे राहिले. पालकांच्या प्रोत्साहनामुळे प्रथमेशने २०१५ साली पुन्हा एकदा हैदराबादची वाट धरली. दुसºया प्रयत्नातही अपयशच मिळाले.
इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर प्रथमेशने देशभरात अभियांत्रिकी क्षेत्रासंबंधीच्या जवळजवळ सर्व परीक्षा दिल्या. काही परीक्षा पास झाला, काही परीक्षा नापास झाला, तर काही परीक्षा पास होऊनही मुलाखतींमध्ये नापास होत होता. दरम्यान, त्याला महावितरण, महापारेषणसारख्या ठिकाणी शासकीय नोकºया करण्याची संधी मिळाली. परंतु प्रथमेशला त्याची स्वप्ने खुणावत होती.
नोव्हेंबर २०१५ साली त्याने सायंटिस्ट इंजिनीअर या पदासाठी ‘इस्रो’ची परीक्षा दिली. प्रथमेश परीक्षा पास झाला, मुलाखतही चांगली गेली, परंतु त्याचे नाव प्रतीक्षा यादीत पहिल्या क्रमांकावर होते. तरीही प्रथमेश थांबला नाही. त्याने ७ मे २०१७ रोजी पुन्हा एकदा ‘इस्रो’ची परीक्षा दिली. इस्रोच्या सायंटिस्ट इंजिनीअर पदासाठी ९ जागा होत्या, त्यासाठी १६ हजार इंजिनीअर्सनी परीक्षा दिली होती. त्यापैकी पहिल्या ५४ इंजिनीअर्सना मुलाखतीसाठी बोलावले होते. प्रथमेश यामध्ये ३७ व्या क्रमांकावर होता. मुलाखतीमध्ये चांगले प्रदर्शन करत प्रथमेशची शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. चंदिगढ येथे फिटनेस टेस्ट झाल्यानंतर प्रथमेश कामावर रुजू होईल.

...शब्द मनाला लागले
दहावी इयत्तेत ७७ टक्के गुण मिळाल्यानंतर पुढे काय करायचे हे समजत नव्हते, यामुळे प्रथमेशने बुद्ध्यांक चाचणी दिली. या चाचणीच्या निकालात मानसोपचारतज्ज्ञाने त्याला सांगितले कला शाखेत प्रवेश घे. इंजिनीअरिंग, मेडिकल तू करू शकणार नाहीस. हीच गोष्ट प्रथमेशच्या मनाला लागली. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याने इंजिनीअरिंग करण्याचे ठरविले. परंतु सुरुवातील परवानगी मिळाली नाही, त्यामुळे त्याने डिप्लोमा करण्याचे ठरवले.

डिक्शनरी गरजेची
मराठी माध्यमातून शिक्षण घेतले असल्यामुळे सुरुवातील प्रथमेशला इंग्रजीची अडचण येत होती. त्यामुळे त्याने अभ्यास करताना डिक्शनरीसोबत ठेवायला सुरुवात केली. अनुवाद करणे सुरू केले. चार-पाच महिन्यांत इंग्रजीची भीती संपल्याचे प्रथमेशने सांगितले.

प्रथमेश आयुष्यात काही तरी चांगले करेल, याची नक्कीच खात्री होती. तो मेहनती असल्यामुळे त्याच्या प्रत्येक निर्णयाला मी आणि त्याच्या आईने सपोर्ट केला. माझ्यापेक्षा त्याच्या आईने त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. लहानपणापासून ते तो इंजिनीअर होईपर्यंत त्याच्या आईने त्याच्या अभ्यासावर नेहमीच लक्ष ठेवले. आमच्याप्रमाणे सर्व पालकांनी त्यांच्या मुलांच्या पाठीशी उभे राहायला हवे.
- सोमा हिरवे, प्रथमेशचे वडील

मी जास्त शिकलेली नाही, तरीही तो शाळेत होता तोवर त्याचा अभ्यास घेत होते. त्याचा गृहपाठ त्याच्यासोबत बसून त्याच्याकडून पूर्ण करून घ्यायचे. तो महाविद्यालयात गेल्यानंतर मला त्याच्या अभ्यासातले फार काही समजत नव्हते. तरीही अभ्यास केलास का, हे नेहमी विचारायचे, तो अभ्यास करतोय का याकडे लक्ष द्यायचे. तो आज इतक्या मोठ्या संस्थेत काम करणार आहे. त्यामुळे त्याचा अभिमान वाटतो. - इंदूबाई हिरवे, प्रथमेशची आई

Web Title: The youth of Mumbai was elected as 'ISRO' scientist; Parents stand with children's dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई