युवा दिन विशेष : स्वच्छता, झाडांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईतील युवक सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 02:00 AM2019-01-12T02:00:38+5:302019-01-12T02:01:19+5:30

ग्रँट रोडमध्ये राहणारा तुषार वारंग हा आंघोळीची गोळी या संघटनेअंतर्गत ‘खिळेमुक्त झाड’ ही मोहीम राबवतो.

Youth Day Special: A young man from Mumbai has been involved in cleanliness, protection of trees, environment conservation | युवा दिन विशेष : स्वच्छता, झाडांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईतील युवक सरसावले

युवा दिन विशेष : स्वच्छता, झाडांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईतील युवक सरसावले

Next

सागर नेवरेकर 

मुंबई : समाजासाठी आणि निसर्गासाठी प्रत्येक व्यक्तीने काही तरी केले पाहिजे. ही भावना मनात ठेवून मुंबईतील तीन युवकांनी वेगवेगळ्या वाटेवर काम करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. प्रभादेवी येथे राहणारा मल्हार कळंबे हा गेली ७० आठवडे दादर चौपाटीची स्वच्छता करतोय. त्याच्या टीमने आतापर्यंत ८०० टन कचरा गोळा केला आहे. काळाचौकी येथे राहणारा ओम्कार राणे याने प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर करून त्यात वृक्षारोपण केले आहे.

ग्रँट रोडमध्ये राहणारा तुषार वारंग हा आंघोळीची गोळी या संघटनेअंतर्गत ‘खिळेमुक्त झाड’ ही मोहीम राबवतो. आतापर्यंत त्याने टीमसह कित्येक झाडांवरून लोखंडी खिळे काढून झाडांच्या वेदना कमी केल्या आहेत. याचाच आढावा ‘राष्ट्रीय युवा दिना’निमित्ताने ‘लोकमत’ने घेतला आहे. ‘बीच प्लीज’ मोहिमेचा संस्थापक मल्हारसोबत त्याचे २५ मित्रही त्याला चौपाटी स्वच्छतेसाठी मदत करतात. १० सप्टेंबर २०१७ रोजी ‘बीच प्लीज’ मोहिमेला सुरुवात करण्यात आली. दादर चौपाटीप्रमाणेच मिठी नदी येथेही दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविली जाते. मल्हार कळंबे यांना युनायटेड नेशन व्हॉलेंटिअर आणि मिनिस्ट्री आॅफ युथ अफेअर्स अ‍ॅण्ड स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्ही अ‍ॅवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले आहे. त्याला ‘आय व्हॉलेंटिअर’चा पुरस्कारही मिळाला आहे.

ओम्कारने काळाचौकी परिसरातील प्लॅस्टिकच्या बाटल्या जमा करून त्यात वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली. प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये झाडे लावून त्या इमारतीमधील भिंतीवर लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे इमारतीला एक वेगळीच झळाळी आली आहे. प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोप लावण्यात आले आहे. २०१७ सालच्या प्रकल्पामध्ये ३५० प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये रोपे लावली गेली. २०१८ साली काळाचौकी ते परेल भागातून ४ हजार ५०० प्लॅस्टिक बाटल्या जमा करून एक ट्रक, किल्ला, घर, रोबोट आणि इमारतीचे गेट बनविण्यात आले. तसेच रोपे लावण्यासाठी करवंट्यांचाही वापर केला आहे. गँ्रट रोड येथील तुषार वारंग याने आतापर्यंत समुद्रकिनाऱ्यावरची स्वच्छता, रक्तदान, विविध शिबिरे आणि समाजसेवी प्रकल्प यासाठी काम केले. खिळेमुक्त झाड या अभियानाच्या माध्यमातून मुंबईतील ५ हजार झाडांवरून लोखंडी खिळे काढण्यात आले आहेत. यात लोखंडी रॉड, आयर्न रॉड, सळई, पाण्याचा पाइप, स्टॅप्लर इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
 

Web Title: Youth Day Special: A young man from Mumbai has been involved in cleanliness, protection of trees, environment conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.