जागतिक महासागर दिन विशेष : महासागराच्या पोटात ‘प्लॅस्टिक कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 05:38 AM2018-06-08T05:38:51+5:302018-06-08T05:38:51+5:30

राज्याला ७२० किलोमीटरचा मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे महासागर हा उपजीविकेसाठी मानवाला एक चांगले साधन उपलब्ध आहे. परंतु सध्या वाढते शहरीकरण, लोकसंख्येचा विस्फोट आणि प्लॅस्टिक कचऱ्यामुळे समुद्राची जैवविविधता धोक्यात आली आहे.

 World Ocean Day Special: 'Plastic Trash' in the ocean stomach | जागतिक महासागर दिन विशेष : महासागराच्या पोटात ‘प्लॅस्टिक कचरा’

जागतिक महासागर दिन विशेष : महासागराच्या पोटात ‘प्लॅस्टिक कचरा’

googlenewsNext

- सागर नेवरेकर

मुंबई : राज्याला ७२० किलोमीटरचा मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे महासागर हा उपजीविकेसाठी मानवाला एक चांगले साधन उपलब्ध आहे. परंतु सध्या वाढते शहरीकरण, लोकसंख्येचा विस्फोट आणि प्लॅस्टिक कचऱ्यामुळे समुद्राची जैवविविधता धोक्यात आली आहे. महासागरात शहरातील सांडपाण्याची गटारे, नाले सोडले जातात. त्यातून मोठ्या प्रमाणात समुद्रात प्लॅस्टिक कचºयाचे संकट निर्माण झाले आहे. प्लॅस्टिक समुद्रात जाऊ नये यासाठी मुंबई शहर-उपनगरातील समुद्रकिनाºयावर स्वच्छतादूतांकडून किनारे स्वच्छ केले जात आहेत. तरीही प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे मच्छीमारांच्या जाळ्यात मासे कमी पण प्लॅस्टिक जास्त सापडत आहे.
केंद्रीय समुद्री मत्स्य संशोधन संस्थेच्या (सीएमएफआरआय, मुंबई) अभ्यासानुसार समुद्रकिनाºयावर आणि विशिष्ट समुद्राच्या खोलीत किती प्लॅस्टिक आहे, याचा अभ्यास करण्यात आला होता. यात १० ते ३० मीटर अंतरावर किती प्लॅस्टिक कचरा आहे हे तपासण्यासाठी या वेळी वेगवेगळ्या प्रकारची मासे पकडणारी जाळी वापरण्यात आली होती. मुंबईतील जुहू, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी आणि अक्सा बीच या चार समुद्रकिनाºयांवर हाताने खेचायच्या जाळ्यात एका तासाला १९ किलो प्लॅस्टिक कचरा सापडला.
गील जाळे (तरंगते जाळे) यात तासाला एक किलो प्लॅस्टिक कचरा सापडला. तर यांत्रिक नौकेने खेचल्या जाणाºया ट्रोल जाळ्यात तासाला २२ किलो प्लॅस्टिक कचरा आढळून आला. डोल जाळे हे विशिष्ट ठिकाणी लावले जाते, यात एका तासाला १९ किलो प्लॅस्टिक कचरा आढळून आला. बॅग नेट जाळ्यामध्ये एका तासाला ११ किलो प्लॅस्टिक कचरा सापडला. ५० ते ६० टक्के प्लॅस्टिक समुद्राच्या पृष्ठभागावर आढळून येतो. त्यामुळे दरवर्षी समुद्रावरील समुद्री झुडूप, समुद्री सस्तन प्राणी, समुद्रातील पक्षी इत्यादी लाखो प्राण्यांची हत्या होते, यातून आपल्या लक्षात येते की समुद्राच्या खोलवर किती प्लॅस्टिक कचरा जमा आहे, अशी माहिती केंद्रीय समुद्री मत्स्य संशोधन संस्थेचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी नीलेश पवार यांनी दिली.

जागतिकीकरणाचा समुद्री जिवांना धोका
शहरीकरण, जागतिकीकरण, झाडांची तोड आणि लोकसंख्येची वाढ याचा परिणाम हरितगृह वायूंवर (कार्बन डायआॅक्साइड, मिथेन, ओझोन, नायड्रोजन आॅक्साइड) होतो. त्यामुळे यांचा थेट समुद्रसृष्टीवरही परिणाम होताना दिसतो.
यात समुद्राच्या पृष्ठभागावरील वाढते तापमान, क्षारतेत वाढ, समुद्राचा सामू (पीएच) कमी होणे (आम्लात रूपांतर होणे), नैसर्गिक आपत्ती, समुद्राची पातळी वाढणे इत्यादी बदलामुळे समुद्री जिवांवर परिणाम होत आहे.

वाढत्या तापमानामुळे प्रजातींचे स्थलांतर
वाढत्या तापमानामुळे काही प्रजातींनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. बांगडा प्रजातीचा मासा हा समुद्राच्या पृष्ठभागावर आढळायचा. परंतु आता बांगडा मासा हा खालच्या पातळीमध्येही आढळतो. कारण वाढत्या तापमानामुळे बांगडा माशांनी पृष्ठभागातून तळाला स्थलांतर केले आहे. तसेच तीव्र तापमानामुळे राणी माशांचा अंडी देण्याचा कालावधीही बदलला आहे. परिणामी, माशांची प्रजनन क्षमता ढासळू लागली आहे.

‘घोस्ट नेट’ माशांच्या जिवावर
मच्छीमारांकडून समुद्रात फेकण्यात आलेली खराब जाळी याशिवाय समुद्रात मच्छीमार नौकेच्या दुर्घटनेत समुद्रात पडलेल्या जाळ्यांना घोस्ट नेट (एडीएलएफजी) असे संबोधले जाते. घोस्ट नेट हे समुद्रात कुठेही अडकून राहते. त्यात मासे सतत अडकत असतात. तसेच या जाळ्यात मोठ्या प्रमाणात कासवे अडकतात. त्यामुळे समुद्रातील माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.


१७५० च्या म्हणजे औद्योगिकीकरण सुरू होण्याच्या काळाच्या तुलनेत पृथ्वीच्या सरासरी तापमानात २ अंश सेल्सिअसची वाढ होईल तेव्हा फक्त शहरे नाही, सर्व किनारपट्ट्यांना धोका आहे. सध्या ०.२० अंश सेल्सिअस प्रतिवर्षी सरासरी वाढ सुरू आहे. हे सलग तिसरे वर्ष आहे. २ अंश सेल्सिअसची पॅरिस कराराची मर्यादा आपण फक्त चौथ्या वर्षी पार करत आहोत. ही पृथ्वीवरील आणीबाणी आहे.
- डॉ. गिरीश राऊत,
पर्यावरणतज्ज्ञ

मच्छीमारांना समुद्रात आता ५ टक्केही मासे सापडत नाहीत. माशांसाठी खोलवर जाऊन जाळे टाकावे लागते. समुद्रकिनाºयापासून ८ ते ९ नॉटिकलमध्ये दूषित पाणीच आहे. तसेच समुद्राच्या किनाºयाजवळ मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वाढल्या आहेत. यांच्यावर आळा घातला पाहिजे.
- भगवान भानजी, मच्छीमार, वर्सोवा

मढ जेट्टीच्या बोटी या पाच ते सहा किलोमीटर आत गेल्यातरी जाळ्यात प्लॅस्टिक आढळून येते. तसेच थोडे पुढे गेलो तर प्लॅस्टिक सापडायेच प्रमाण कमी होते. समुद्राच्या खोलवर कोणतीच वस्तू राहत नाही, ती कालांतराने लाटेच्या माध्यमातून किनाºयालगत येते.
- कृष्णा कोळी, मच्छीमार, मढ जेट्टी

Web Title:  World Ocean Day Special: 'Plastic Trash' in the ocean stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई