शबरीमाला मंदिर महिलांनीच बंद पाडावे - प्रेमानंद गज्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 03:48 AM2019-01-06T03:48:49+5:302019-01-06T03:49:15+5:30

प्रेमानंद गज्वी : तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका पक्षपाती

Women should shut Shabarimala Temple - Premanand Gajvi | शबरीमाला मंदिर महिलांनीच बंद पाडावे - प्रेमानंद गज्वी

शबरीमाला मंदिर महिलांनीच बंद पाडावे - प्रेमानंद गज्वी

Next

डोंबिवली : केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही. आपल्या घरी आई, बहीण आणि बायको आहे. त्यांनादेखील मासिकधर्म येतो. ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. महिलांना मंदिरप्रवेश करण्यास विरोध असेल, तर त्या शबरीमाला मंदिरात जातात तरी कशाला? महिलांनी प्रवेशासाठी आग्रह धरण्याऐवजी हे मंदिरच बंद पाडावे, असे खळबळजनक विधान नागपूर येथे होणाºया ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी शनिवारी येथे केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने आदित्य मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी ‘एक किमयागार, एक संध्याकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. याप्रसंगी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गज्वी यांनी उपरोक्त विधान केले. याप्रसंगी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित होते. गज्वी यांची मुलाखत ज्येष्ठ नाटककार आनंद म्हसवेकर यांनी घेतली. गज्वी म्हणाले की, सरकारने महिलांबाबतीत भेदभाव केला आहे. तीन तलाकच्या बाबतीत एका धर्माच्या महिलांना वेगळा न्याय आणि हिंदू धर्माच्या महिलांना वेगळा न्याय दिला जात आहे. जो न्याय एका धर्माच्या महिलेला दिला जातो, तोच न्याय अन्य प्रकरणात अन्य धर्माच्या महिलेला असला पाहिजे. शबरीमाला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आलेल्या महिलांना न्याय का नाही. त्याचे कारण धर्माचा प्रभाव मोठा आहे. त्यातून सत्तासंघर्ष झालेले आहेत. धर्माने जगभर किती नुकसान केलेले आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही, याकडे गज्वी यांनी लक्ष वेधले. गज्वी यांनी सांगितले की, कविता, अभिनय आणि गाणे ही माझी आवड होती. अपघाताने मी नाट्यलेखक झालो. ‘गहाण’ या एकांकिका मला सुचल्या. माझ्या नाटकाचे प्रयोग किती झाले, हे मी कधी मोजत बसलो नाही. प्रयोग कमी झाले तरी माझ्या नाटकांचे कौतुक ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी केले. देवनवरी ही एकांकिका लिहिली. ती १४ भाषांत अनुवादित होणार होती. मात्र, या एकांकिकेतील देवनवरी ही देवाची मूर्ती फेकून देते, असा शेवट होता. हा शेवट मला बदलण्याची सूचना केली गेली. मी तो बदलण्यास नकार दिला. मी कधी तडजोड केली नाही. त्यामुळे आज मी या ठिकाणी आहे.

शफाअत खान, जयंत पवार भयाखाली?
मला समाजातील प्रश्नांतून विषय मिळतात. समाजात जोपर्यंत प्रश्न आहेत, तोपर्यंत मी लिहीत राहणार आहे. मलादेखील बीअर प्यावी, सिगारेट ओढत आयुष्यात मजा करावी, असे वाटते. पण, मला समाजातील प्रश्न स्वस्थ बसू देत नाहीत. सामाजिक प्रश्नांवर शफाअत खान, संजय पवार, जयंत पवार आणि राजीव नाईक हे चांगले लिखाण करत होते. त्यांची नाटकेही गाजली. मात्र, त्यांचे लेखन अचानक का थांबले? त्यांना सामाजिक प्रश्नावर लिहू नका म्हणून भय घातले आहे का, असा सवाल मला पडला असल्याचे गज्वी यांनी सांगितले.

Web Title: Women should shut Shabarimala Temple - Premanand Gajvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.