ठळक मुद्देउपनगरीय लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये  बसण्याच्या जागेवरून प्रवाशांमध्ये होणाऱ्या मारहाणीचं स्तर सुरूच असल्याचं पाहायला मिळतं आहे. कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास मुबंईकडे जाणाऱ्या एक लोकलमध्ये महिला प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

डोंबिवली, दि. 13- उपनगरीय लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये  बसण्याच्या जागेवरून प्रवाशांमध्ये होणाऱ्या मारहाणीचं स्तर सुरूच असल्याचं पाहायला मिळतं आहे. कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास मुबंईकडे जाणाऱ्या एक लोकलमध्ये महिला प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये डोंबिवलीमधून बसून डाऊन-अप जाण्यासाठी (डोंबिली-कल्याण-मुबंई असा प्रवास करण्यासाठी) आधीच जागा अडवल्याचा राग आल्याने कल्याण स्थानकातील महिलांनी एका महिलेला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. महिलेला झालेल्या या मारहाणी संदर्भात पोलिसांना काहीही माहीत नसल्याने कुठलीही तक्रार नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  

डोंबिवलीच्या चारुशीला वेल्हाळ या महिला रेल्वे प्रवाशाला कल्याणच्या महिलांनी मारहाण करत जागा सोडण्यासाठी धक्काबुकी केली. त्याची तक्रार मुंबईत रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस दलाकडे करण्याचे काम सध्या सुरू आहे. सुरेखा माने या प्रत्यक्ष दर्शी महिला प्रवाशाने ही माहिती खास लोकमतला दिली. डोंबिवली स्थानकातून सकाळी 8.21 ला कल्याणासाठी ही लोकल डाऊनच्या दिशेने धावते. कल्याण येथुन तीच लोकल सकाळी 8.36 ला सीएसटीसाठी निघते, पण बुधवारी ही लोकल 10 मिनिटं उशिराने पोहोचल्याने गोंधळ झाला, लोकल खचाखच भरून आल्याने कल्याणच्या महिला संतापल्या आणि धक्काबुक्की मारहाणीचा प्रकार घडल्याचे माने यांनी सांगितले.मुबंईतील रेल्वे पोलीस ती तक्रार कल्याण रेल्वे पोलीसंकडे वर्ग करत असून पुढील तपास, चौकशी तिथून होणार असल्याचे संगण्यात आलं आहे.

लोकल ट्रेनमध्ये सातत्याने आशा घटना घडत असल्याने कल्याण, दिवा, ठाणे, आसनगाव आदि ठिकाणच्या महिला रेल्वे प्रवाशांनी प्रवासी संघटनाच्या पदाधिकार्याना याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. लोहमार्ग पोलीस काहीही ऐकत नाहीत, त्यामुळेच घटना वाढत असल्याचा आरोप प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे यांनी केला. कल्याण रेल्वे स्थानकात आणि बदलापूर मध्ये अशा घटना सातत्याने होत असतात, त्याची नोंद रेल्वे पोलिसांनी घ्यावी आणि बुधवारच्या घटनेची चौकशी करावी, जे कोणी असतील अशा दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी लोकमतशी बोलताना केली.

दोन दिवसांपूर्वी कल्याणहून अंबरनाथला जाणा-या लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला होता. 7 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून सात मिनिटांनी कल्याणहून अंबरनाथच्या दिनेशे जाणा-या रेल्वे गाडीत एक प्रवासी चढला होता. चौथ्या सीटवर बसण्याच्या वादातून उपरोक्त तीन जणांनी त्याच्याशी वाद घातला. त्याचा गळा धरून त्याला उल्हासनगर रेल्वे स्थानकात उतरण्यास भाग पाडलं. प्रवाशासोबत दादागिरी करून त्याला उतरण्यास भाग पाडण्याचा हा सगळा प्रकार अन्य एका सह प्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. ही व्हिडीओ क्लिप ऑनलाइन लोकमतच्या हाती लागली होती. ही क्लिप ऑनलाइन लोकमतने दाखवली होती. प्रवाशांकडून होत असलेल्या दादागिरीचा लोकमतनं पर्दाफाश केला होता. त्यामुळे रेल्वे पोलिसांनाही याची गंभीर दखल घ्यावी लागली. त्यांनी दादागिरी करणा-या त्या प्रवाशांचा शोध सुरू केला. लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाण केली होती. कमतनं दाखवलेल्या त्या व्हिडीओची रेल्वे प्रशासनानंही गंभीर दखल घेतली आहे. अंबरनाथला जाणा-या धावत्या रेल्वे गाडीत बसण्याच्या जागेवरून वाद करून प्रवाशाचा गळा धरणा-या त्या तीन जणांच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.