युनूसची हत्या करणा-या पोलिसांना साक्षीदाराने ओळखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 04:41 AM2018-01-19T04:41:01+5:302018-01-19T04:41:04+5:30

सॉफ्टवेअर इंजिनीअर ख्वाजा युनूस कोठडी मृत्यू प्रकरणाच्या खटल्यातील पहिल्या महत्त्वाच्या साक्षीदाराने ख्वाजा युनूसला मारहाण करणाºया चार पोलिसांना ओळखून त्यांची नावे सत्र न्यायालयाला सांगितली

The witness identified the police in the murder of Younus | युनूसची हत्या करणा-या पोलिसांना साक्षीदाराने ओळखले

युनूसची हत्या करणा-या पोलिसांना साक्षीदाराने ओळखले

Next

मुंबई : सॉफ्टवेअर इंजिनीअर ख्वाजा युनूस कोठडी मृत्यू प्रकरणाच्या खटल्यातील पहिल्या महत्त्वाच्या साक्षीदाराने ख्वाजा युनूसला मारहाण करणाºया चार पोलिसांना ओळखून त्यांची नावे सत्र न्यायालयाला सांगितली. या चार पोलिसांना आरोपी करण्यासाठी सरकार अर्ज करेल, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
प्रफुल्ल भोसले (आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त), राजाराम व्हनमाने (दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक), अशोक खोत (आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, युनिट ५चे वरिष्ठ पोलीस अधीक्षक) आणि हेमंत देसाई (शस्त्र विभागाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक) या चार जणांनी ख्वाजा युनूसला मारहाण केल्याचे साक्षीदाराने न्यायालयाला बुधवारी सांगितले. ख्वाजा युनूसला पोलिसांनी घाटकोपर २००२ बॉम्बस्फोटाप्रकरणी ताब्यात घेतले होते. २७ वर्षीय ख्वाजाला पोलिसांनी कोठडीत इतकी मारहाण केली, की त्यात त्याचा मृत्यू झाला. या बॉम्बस्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या सात जणांमध्ये औरंगाबादच्या खासगी रुग्णालयातील एका प्राध्यापकाचाही समावेश होता. २००५मध्ये या केसमधून त्याची व अन्य आरोपींची सुटका करण्यात आली. या प्राध्यापकाने न्यायालयात बुधवारी साक्ष दिली. त्याच्या साक्षीनंतर सरकारी वकील धीरज मिरजकर यांनी या चारही पोलिसांना या प्रकरणी आरोपी करण्यासाठी पुढील सुनावणीत अर्ज करू, असे सांगितले.
सध्या हा खटला चार पोलिसांविरुद्ध आहे. त्यात तत्कालीन साहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन वझे, हवालदार राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांचा समावेश आहे. राज्य सरकारने एकूण १४ आरोपींपैकी चार पोलिसांवरच खटला चालविण्यासाठी मंजुरी दिली. सीआयडीने दोषारोपपत्रात उल्लेख केलेल्या उर्वरित १० आरोपींवर खटला चालविण्यासाठी मंजुरी देण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका युनूसची आई आसीया बेगम यांनी केली होती. उच्च न्यायालयाने ती फेटाळली होती.
साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार, २७ डिसेंबर २००२ रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. ६ जानेवारी २००३ रोजी पोलिसांनी त्याच्यासह ख्वाजा युनूस, शेख झहीर यांनाही घाटकोपरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिटमध्ये नेले. त्याला व शेखला बाहेर बसविण्यात आले. तर युनूसला छोट्या रूममध्ये नेले. तेथे त्याला ओरडण्याचा, पट्ट्याने मारण्याचा आवाज येत होता. थोड्या वेळाने त्यालाही तिथे नेले. ‘युनूसचे हात एका खुर्चीला बांधले. त्याला केवळ अंडरवेअरवर ठेवले होते. त्याच्या बाजूला पोलीस बसले होते. एक हवालदार त्याला पट्ट्याने मारत होता. एका पोलिसाने युनूसच्या कानशिलात लगावली. त्याच्या छातीवर व पोटावर प्रहार केले. या प्रहारामुळे युनूसने रक्ताची उलटी केली. या पोलिसांची मी नावे सांगू शकतो, असे म्हणत साक्षीदाराने प्रफुल्ल भोसले, राजाराम व्हनमाने, अशोक खोत, हेमंत देसाई यांची नावे न्यायालयाला सांगितली.

Web Title: The witness identified the police in the murder of Younus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.